वीरांगना : जेष्ठ महिला क्रांतिकारी भोगेश्वरी फु...

वीरांगना : जेष्ठ महिला क्रांतिकारी भोगेश्वरी फुकनानी (Bhogeshwari Fuknani: The Senior Most Lady Freedom Fighter)

  • अनघा शिराळकर
    महिलांना अबला संबोधले जाते, पण जेव्हा याच महिला विशिष्ट ध्येयाने प्रेरित होतात तेव्हा त्या समाजात क्रांती घडवून आणतात. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांमध्ये आणि बलिदान देणार्‍यांमध्ये अनेक महिला होत्या. आसाममधील देखील अगदी छोट्याशा गावापासून ते शहरांपर्यंत महिलांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. या सर्व महिला स्वातंत्र्य सेनानींमध्ये जिचे नाव मानाने घेतले जाते ती म्हणजे भोगेश्वरी फुकनानी.
    ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य चळवळींच्या अंतर्गत भारतीयांच्या विविध बंडाळी व बंडखोरी चालू होत्या आणि त्याचे पडसाद देशाच्या कानाकोपर्‍यात उमटत होते. या स्वातंत्र्य सेनानींच्या रूपाने धैर्य, निर्धार आणि त्याग यांची मूर्तिमंत उदाहरणेच जणू आपल्या देशाला पाहायला मिळाली. स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधातील भारतीयांचे नेतृत्व, धाडस, सहनशक्ती आणि बलिदान यांची गाथाच होय. यामध्ये विविध वयोगटातील, स्तरांमधील व जाती-जमातींच्या पुरुषांबरोबर महिलांनीही आपले योगदान दिले आहे. स्वातंत्र्य संग्रामात बर्‍याच पुरुष सैनिकांना तुरुंगात जावे लागले होते. तेव्हा देशात महिलांनी स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत तेवत ठेवली होती. त्याला कारण म्हणजे त्यांचे देशाप्रति असलेले जाज्वल्य प्रेम.
    महिलांना अबला संबोधले जाते, पण जेव्हा याच महिला विशिष्ट ध्येयाने प्रेरित होतात तेव्हा त्या समाजात क्रांती घडवून आणतात. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांमध्ये आणि बलिदान देणार्‍यांमध्ये अनेक महिला होत्या. या महिलांमध्ये साध्या गृहिणी देखील होत्या. पुरुष सेनानींपेक्षा एक पाऊलही त्या मागे नव्हत्या. अतिशय निर्भयपणे आणि मनापासून महिला सेनानी लढत राहिल्या. यामध्ये अनेकींना ब्रिटिश पोलिसांचा लाठीमार सहन करावा लागला, गोळीबाराला तोंड द्यावे लागले तर काहींना मृत्यूलाही कवटाळावे लागले. पण या महिला ना घाबरल्या ना त्यांनी हार मानली. असे असूनही यातील बर्‍याच महिलांच्या योगदानाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही आणि त्यांची इतिहासात नोंदही झाली नाही.
    इतर राज्यांप्रमाणेच आसाममधील देखील अनेक महिला स्वातंत्र्य सेनानींनी लढा दिला होता. अगदी छोट्याशा गावापासून ते शहरांपर्यंत महिलांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. या सर्व महिला स्वातंत्र्य सेनानींमध्ये जिचे नाव मानाने घेतले जाते ती म्हणजे भोगेश्वरी फुकनानी.

भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग
भोगेश्वरीचा जन्म 1885 साली आसाममधील नागांव जिल्ह्यातील बरहामपूर येथे झाला. तिचा विवाह भोगेश्वर फुकनान यांच्याशी झाला. तिच्यासह सहा मुले व दोन मुली आणि पती असे दहा जणांच्या कुटुंबाची ती गृहिणी होती. अत्यंत साधे असे तिचे कुटुंब. महिलांनी फक्त चूल आणि मूल सांभाळून आपला संसार करावा अशी समाजाची अपेक्षा असलेल्या काळात भोगेश्वरीने मात्र स्वातंत्र्य संग्रामाच्या भारत छोडोफ या आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. भोगेश्वरीने ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड पुकारले आणि त्याचा प्रसार संपूर्ण ईशान्य आसाममध्ये करून त्याच्या नेतृत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ब्रिटिश प्रशासनाचा स्थानिक स्तरावरील निषेध तसेच महिलांच्या संघटनांचे कार्यक्रम यामध्ये भोगेश्वरीचा सहभाग अग्रेसरी असायचा. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेण्यासाठी तिने स्वतःच्या मुलांनाही प्रोत्साहन दिले.

अहिंसात्मक मोर्चा
भोगेश्वरी ही आसामच्या नांगाव जिल्ह्यातील बेहरामपूर, बाबाजिया आणि बारपुजिया या भागात सक्रिय होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची कार्यालये स्थापन करण्यास तिची मोलाची मदत झाली. 1930साली भोगेश्वरीने भारतीय नागरिकांसाठी असलेल्या ब्रिटिशांच्या कायद्यांचा भंग करण्यासाठी अहिंसात्मक मोर्चा काढला. या मोर्चातील स्वातंत्र्य सेनानींनी धरणे धरले. त्यासाठी भोगेश्वरीला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. तरीही तिने स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणे सोडले नाही. तसेच तिने अहिंसेचा मार्गही सोडला नाही.
1942 मध्ये बेहरामपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यालयावर ब्रिटिश अधिकार्‍यांनी जप्ती आणली होती. 18 सप्टेंबर 1942 रोजी भोगेश्वरी व तिच्या मुलांसह इतर क्रांतिकारींचा जमाव हातात तिरंगा घेऊन व वंदे मातरम्चा नारा देत त्या कार्यालयाचा ताबा परत मिळवला. क्रांतिकारकांनी हा विजय उत्सवासारखा साजरा करण्याचे ठरवले. तथापि ब्रिटिश अधिकार्‍यांनी तसे होऊ दिले नाही. उलट याचा बदला घेण्यासाठी कॅप्टन फिंच यांनी लष्करी सैन्य पाठवून त्या उत्सवाच्या वातावरणाचा बेरंग केला आणि ते कार्यालय परत ताब्यात घेण्याचा किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण क्रांतिकारींचा जमाव काही मागे हटला नाही. रत्नमाला या महिला सेनानी सोबत भोगेश्वरीने या जमावाचे नेतृत्व केले. वंदे मातरम्च्या घोषणांनी क्रांतिकारकांच्या जमावाने सारा परिसर दुमदुमून सोडला. जेव्हा हा जमाव कॅप्टन फिंच यांना भिडला तेव्हा स्वातंत्र्य सेनानी रत्नमाला हिच्या हातातला तिरंगा त्याने जोरात हिसकावून घेतला. त्यामुळे रत्नमाला खाली जमिनीवर कोसळली. तिरंग्याच्या झालेल्या अपमानाने भोगेश्वरी संतापली आणि तिने तो तिरंगा कॅप्टन फिंचच्या हातातून हिसकावून घेऊन त्याच्या दांडक्याने फिंचच्या डोक्यावर वार केला. यामुळे भयंकर संतप्त झालेल्या फिंचने भोगेश्वरीवर पिस्तुलीच्या गोळ्या झाडल्या. ती खाली जमिनीवर कोसळली. घायाळ झालेली भोगेश्वरी तिसर्‍या दिवशी गतप्राण झाली. तो दिवस होता 20 सप्टेंबर 1942. अशा प्रकारे भोगेश्वरीने भारतमातेसाठी आपले बलिदान दिले.