वादविवादात अडकलेले विनोदवीर (Bharti Singh To Ka...

वादविवादात अडकलेले विनोदवीर (Bharti Singh To Kapil Sharma : Controversies Of Famous Comedians)

आज जागतिक हास्य दिवस आहे. तेव्हा मनोरंजन क्षेत्रातील चर्चेत असलेल्या विनोदवीरांची आम्ही तुमच्याशी गाठ घालून देत आहोत. भारती सिंह, कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक आणि सुनिल ग्रोव्हर हे कॉमेडियन्स प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पण प्रत्यक्ष जीवनात त्यांच्यावर गंभीर प्रसंग ओढवले आहेत. म्हणजे ते अशा भानगडीत अडकले आहेत की, ज्याची कल्पनासुद्धा यायची नाही.

भारती सिंह

काही दिवसांपूर्वी हास्यसम्राज्ञी भारती सिंहचे नाव अमली पदार्थाच्या प्रकरणात आले आणि सिनेसृष्टीत खळबळ माजली. भारती सिंह ड्रग्ज घेत असेल याची प्रेक्षकांना शंका आली नव्हती. नोव्हेंबर महिन्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने भारतीच्या मुंबईतील घरावर छापा घातला. तेव्हा तिच्या घरात गांजा सापडला. भारती व तिचा नवरा गिरफ्तार झाला. चौकशी केल्यावर भारतीने आपण नशापाणी करत असल्याची कबुली दिली.

कृष्णा अभिषेक

कपिल शर्मा शो चा प्रमुख कॉमेडियन कृष्णा अभिषेक वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ‘कॉमेडी नाइटस्‌ बचाओ’ या कार्यक्रमात कृष्णाने जॉन अब्राहमच्या ‘पाप’ या चित्रपटाची खिल्ली उडवली होती. ते जॉनला आवडलं नाही आणि नाराज होऊन त्याने कार्यक्रमातून काढता पाय घेतला. नंतर कृष्णाने जॉनची माफी मागितली.

कपिल शर्मा

विनोदवीर म्हणून खूपच लोकप्रिय असलेला कपिल शर्मा अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. २०१५ साली एका मराठी चित्रपटाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात, त्याने एका अभिनेत्रीशी गैरवर्तन केले होते. तो तिच्यासोबत डान्स करू इच्छित होता. पण ती त्याला ओळखत नसल्याने तिने नकार दिला होता.

सुनील ग्रोव्हर

कपिल शर्माच्या कार्यक्रमात गुत्थी हे पात्र साकारून सुनील ग्रोव्हरने प्रेक्षकांकडून खूपच हशा मिळवला होता. पण तोही एका वादात अडकला. विमान प्रवास करत असताना दारू पिऊन कपिल शर्माने धिंगाणा घातला. सुनील ग्रोव्हरला शिव्या घातल्या. अन्‌ त्याच्याशी झोंबाझोंबी पण केली. सुनीलने कपिलला खूप समजावले, पण नशेत धुंद असलेल्या कपिलने त्याचे ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी नशा उतरल्यावर कपिलने सोशल मीडियावर ट्वीट करून सुनीलची माफी मागितली खरी, पण सुनीलने त्याला माफ केले नाही. अन्‌ कार्यक्रमातून अंग काढून घेतले.

राजपाल यादव

संयत विनोद करत राजपाल यादवने चित्रपटांमधून प्रेक्षकांना खूप हसविले आहे. पण वादाचा भोवरा त्याला चुकला नाही. राजपालने ५ कोटी रुपये कर्ज घेतले होते. जे त्याला ३ महिन्यात चुकते करायचे होते. पण दिलेल्या मुदतीत तो पैसे फेडू शकला नाही. त्यासाठी त्याला जेलमध्ये जावे लागले.