भार्गवी चिरमुलेचा भन्नाट मॉडर्न लूक (Bhargavi C...

भार्गवी चिरमुलेचा भन्नाट मॉडर्न लूक (Bhargavi Chirmule Looks Stunned In Unbelievable Modern Look)

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आई मायेचं कवच’  या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली आहे. सुरुवातीला नावावरून इतर मालिकांप्रमाणेच आई व मुलीमधील नात्याची ही मालिका असेल असं वाटत होतं. परंतु काहीच भागांनंतर या मालिकेने आपलं वेगळेपण दाखविलं. जरी आई आणि मुलीमधील नात्यावर भाष्य करणारी ही कथा असली तरी सध्या ती वेगळ्याच वळणावर आली आहे आणि मालिकेचा प्रत्येक भाग हा तेवढाच उत्सुकता वाढवणारा आहे.

आई असणं हा एक विलक्षण अनुभव आहे. आई आणि आईचं प्रेम हे शब्दांमध्ये मांडता येत नाही. सगळं जग एकीकडे आणि आईची माया एकीकडे. आपल्या लेकारावर जर कोणी निःस्वार्थपणे माया करत असेल तर ती आईच असते. पण, आजच्या धकाधकीच्या आयुष्यात मुलांना हे प्रेम कळत नाही किंवा कळून देखील न कळल्याचा ते आव आणत असतात. कारण, स्वतःचं स्वातंत्र्य मुलांना अधिक महत्वाचं वाटत असतं. लेकरू कुठे वाट चुकलं तर पुन्हा त्यास मार्गावर आणणारी आईच असते हे ते विसरतात. असंच काहीसं या मालिकेतील मीनाक्षीची मुलगी सुहानीसोबत घडताना दिसत आहे.

जन्मदात्या आईवर विश्वास न ठेवता सुहानीला बाहेरच जग प्रिय होतं. या वयात चुका होतातच. पण आता सुहानीच्या नकळतच तिच्यावर ओढवलेल्या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी आईचा मात्र कस लागतो आहे. वाट चुकलेल्या मुलीला परत सुखरूप घरी आणण्यासाठी मिनाक्षी जीवाचं रान करते आहे. अनेक पुरावे हाती लागून सुध्दा सुहानी मिळत नाहीये. बऱ्याचदा जवळची व्यक्तीच संशयित म्हणून समोर येते. अशा सर्व कठीण प्रसंगी मिनाक्षी धीर न सोडता त्या संकटांना सामोरी जाताना दिसत आहे.

असं सर्व मालिकेत घडत असतानाच आता मात्र मालिकेला नवं वळण मिळणार आहे. आपल्या नवऱ्यापासून वेगळं राहून आपल्या मुलीची जबाबदारी पार पाडणारी साधी, सरळमार्गी मीनाक्षी ही सुरुवातीपासून या मालिकेत एक आदर्शवत व जबाबदार स्त्री म्हणून आपण पाहिली आहे. परंतु आपल्यापासून दूर गेलेल्या आपल्या मुलीला परत मिळवण्यासाठी मिनाक्षीमधील आई आता आपल्याला वेगळ्या रुपात दिसणार आहे. सरळ मार्गाने जर एखादी गोष्ट सापडत नसेल तर दुसरा मार्ग अवलंबावा लागतो आणि म्हणूनच मिनाक्षीने सुहानीला शोधण्यासाठी आपला लुक बदलला आहे. साध्या मिनाक्षीची आता भन्नाट मॉडर्न मिनाक्षी झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सर्व कशासाठी? मीनाक्षी सुहानीपर्यंत कशी पोहचेल? तिला परत आणेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला हळूहळू सापडतीलच, तोपर्यंत तुमची उत्सुकता ताणून धरा.