‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील मलखान उर्फ दीपेश भ...

‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील मलखान उर्फ दीपेश भान, या अभिनेत्याचे वयाच्या अवघ्या ४१व्या वर्षी निधन (Bhabhiji Ghar Par Hai’ Malkhan Aka Deepesh Bhan Passes Away)

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘भाभीजी घर पर हैं’ मधील मलखान हे पात्र साकारणाऱ्या दीपेश भान या अभिनेत्याचे अचानक निधन झाले आहे. आपल्या अभिनयाने दर्शकांचे मन जिंकणाऱ्या दीपेशच्या अशा अचानक मृत्यूने त्याच्या कुटुंबियांनाच नव्हे तर त्याच्या शो ची टीम आणि चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

‘भाभीजी घर पर हैं’ या विनोदी मालिकेत मलखान हे पात्र साकारणाऱ्या दीपेश भान याचे आज सकाळी अचानक निधन झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपेश शुक्रवारी सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. तेथे मैदानात क्रिकेट खेळत असतानाच अचानक तो पडला. त्याला लगेचच इस्पितळात नेण्यात आले. परंतु तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत म्हणून घोषित केले.

शोमधील दीपेश भानची व्यक्तिरेखा खूप मजेदार होती. जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या अभिनेत्याच्या जाण्याने केवळ त्याचे कुटुंबच दु:खी नाही, तर शोची टीम आणि मालिकेचे चाहतेही शोकाकुल आहेत.

टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक हिने सोशल मीडियावर दीपेशच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. टीमने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की ‘मलखान’च्या आकस्मिक निधनाने खूप दु:ख झाले आहे आणि आम्हाला धक्का बसला आहे, तो आपल्या सर्वांनाच जाणवेल.” दीपेशची सहकलाकार चारू मलिक हिने देखील सोशल मीडियावर शोक व्यक्त करताना लिहिले की, ‘तू गेलास हे स्वीकारणे खूप कठीण आहे. तू डोळ्यांपासून दूर गेला असलास, तरी हृदयातून कधीच दूर जाणार नाही.

दीपेशच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांनाही धक्का बसला असून सोशल मीडियावर ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.