करिअरला हानी पोहचविणार्या वाईट सवयी (Beware : T...

करिअरला हानी पोहचविणार्या वाईट सवयी (Beware : These Bad Habits May Damage Your Career)

ऑफिसात काम करताना, वावरताना, सहकार्‍यांशी वागताना काही चालीरिती सांभाळायच्या असतात. पण दुर्दैवाने काही लोकांना याचे भान राहत नाही. ते ऑफिसात कसेही वागतात. त्यांच्या या वाईट सवयींनी करिअरला हानी पोहचू शकते. अशाच वाईट सवयी जर तुम्हाला असतील तर वेळीच सावध व्हा!
1)  कटकट करणे
काही लोक सतत कटकट करत असतात. काम जास्त पडलं तरी कटकट. बॉसने खरडपट्टी काढली तर मग बघायलाच नको. अशा कटकट्या लोकांना मग काही बॉस मुद्दाम त्रास देतात. तेव्हा कटकट करू नका. या वागण्याने कदाचित मिळणारी बढती देखील पुढे ढकलली जाईल.

2)  स्वच्छतेकडे दुर्लक्ष
काही लोकांना ऑफिसात कचरा करण्याची वाईट सवय असते. कागदाचे कपटे डस्टबीनमध्ये नीट टाकत नाहीत. त्यामुळे ते बाहेर पडतात. चहाचे कप टेबलावर तसेच ठेवून देतात. सांडलेले पाणी साफ करत नाहीत. टॉयलेटमध्ये देखील स्वच्छतेचे नियम पाळत नाहीत. यामुळे लोक त्यांच्या समक्ष किंवा अपरोक्ष टीका करतात. नावे ठेवतात. तेव्ही ही सवय घालवली पाहिजे.

3) ई मेल एटिकेट
आजकाल प्रत्येक ऑफिसात कॉम्प्युटर शिवाय पान हलत नाही. ई मेलची देवाणघेवाण त्यावर चालू असते. परंतु काही लोक हा ई मेल तपशीलवार करत नाहीत. ई मेल पाठवताना ते एसएमएसची भाषा वापरतात. तसेच स्पेलींग चुकले तरी ते दुरुस्त करत नाहीत. यामुळे आपण ज्याला हे पत्र पाठवतो, त्याच्या मनातून आपण उतरतो. त्याला मजकूर नीट समजत नाही. हे टाळा. ज्याला ई मेल एटिकेटस् म्हणतात, ते पाळा.

4) वायफळ गप्पा
कित्येक लोकांना ऑफिसात वायफळ गप्पा मारण्याची वाईट खोड असते. काम सोडून ते इतर विषयांवर जास्त बोलतात. एकमेकांची उणीदुणी काढतात. कागाळ्या करतात. जो या पंथातला असतो, तो त्यात सहभागी होतो. अन् आपली भर टाकतो. पण बव्हंशी सहकारी तसे नसतात. त्यांना या वायफळ गोष्टीत रस नसतो. शिवाय त्यातून तुम्ही कधी अडचणीतही येऊ शकता. तेव्हा ही सवय सोडून द्या.

5) कामात टाळाटाळ
काही लोक कामात टाळाटाळ करण्यात पटाईत असतात. आपल्याला नेमून दिलेलं काम दुसर्‍यावर ढकलून देण्यात वाकबगार असतात. कामापेक्षा त्यांचा जास्त वेळ चहा पिणे, सिगारेट ओढणे, टवाळक्या करणे, पेपर वाचणे यात जातो. जणू ते ऑफिसात टाइम पास करायला येतात. त्यांच्या या वागण्याने ते स्वतःचा आणि दुसर्‍याचा वेळ वाया घालवतात. असं कधी करू नये.

6)  वेळेचं महत्त्व
बरेच लोक वेळेचं महत्त्व समजत नाहीत. ऑफिसात उशीरा येणे, त्यांच्या अंगवळणी पडले असते. त्यावर वेगवेगळ्या सबबी त्यांच्याकडे तयार असतात. ऑफिसची वेळ संपताच, मात्र ते वेळेवर निघतात किंवा कधी कधी आधीही सटकतात. त्यांच्या या अशा वागण्याचा इतर कर्मचार्‍यांवर परिणाम होतो. कामाचा खोळंबा होतो. सगळेच जण असं वागू लागले तर ऑफिसला शिस्त कशी लागणार? हे वेळेचं महत्त्व न जाणणार्‍यांनी लक्षात घेतलं पाहिजे.

7)  टोमणे मारणे
कुणी काही चूक केली किंवा कामात टंगळमंगळ केली, तर त्याला तशी स्पष्ट जाणीव करून दिली पाहिजे. पण काही लोकांकडे ते धारिष्ट्य नसतं. म्हणून मग ते टोमणे मारतात. तिरकस बोलतात किंवा सूचक संवाद करतात. त्यावरून स्वतः हसतात अन् दुसर्‍यांना हसायला लावतात. ही सवय वाईटच. कारण आपण ज्याला टोमणे मारतो, तो मनाने खचतो, हे लक्षात घ्यायला हवे.
8)  ऑफिसची निंदा
काही लोक जातायेता ऑफिसची निंदा करत असतात. ऑफिसचे नियम, गैरहजेरीचा पगार कापणे, चहापानाची सवय, साफसफाई इतकेच नव्हे तर वरिष्ठांबाबत नाराजी अशा गोष्टींवर ते सतत टीका करत राहतात. अशाने ते ऑफिसचा अनादर करतात व आपल्या सहकार्‍यांना पण चेतवतात. हे वागणं अजिबात योग्य नव्हे. आपल्याला या ऑफिसातील कामकाजाची पद्धत, नियम पटत नसतील तर खुशाल दुसरी नोकरी शोधावी. सध्या आपण जिथे काम करतो, तिथे निष्ठा ठेवावी.

9)  नाक खुपसणे
काही लोकांना दुसर्‍यांच्या खासगी जीवनात नाक खुपसण्याची वाईट सवय असते. कोणाचं घरी भांडण झालं, कोणाची फॅशन, कोणाची पगारवाढ या व अशा अनेक खासगी बाबीत ते अनाठायी लक्ष घालत राहतात. हे खूप लोकांना आवडत नाही. मग कुरबुरी सुरू होतात. ही वाईट सवय कायमची सोडली पाहिजे.
10)  सोशल मीडियाचा दुरुपयोग
काही लोकांना ऑफिसातील इंटरनेट कनेक्शनचा दुरुपयोग करण्याची वाईट खोड असते. ऑफिसातील कामापेक्षा ते इंटरनेटवर शॉपिंग करतात. फेसबुक वाचतात, त्यावर लिहितात. काही जण तर खासगी मेल पाठवतात अन् चक्क ब्लॉग लिहितात. हे अजिबात करू नये. यामध्ये कामाचा वेळ वाया जातोच. पण वरिष्ठांच्या लक्षात आले तर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. हे लक्षात ठेवावे.