पैसा हाच परमेश्वर नव्हे! (Beware: Greed For Mon...

पैसा हाच परमेश्वर नव्हे! (Beware: Greed For Money May Ruin Relations)


पैसा हा कितीही जीवनावश्यक असला तरी तो कमावताना नातीगोती पणाला लागावीत, इतकं महत्त्वंही त्यास असू नये. मैत्री, नातेसंबंध यांच्या आड पैसे आले की, दुरावा निर्माण होतो. वैवाहिक जीवनात देखील पैशांवरून बिनसलं, अशी अनेक उदाहरणे आहेत.
पैसा हाच परमेश्वर, अशी म्हण जुन्या जमान्यापासून प्रचलित आहे. तिची सत्यता वारंवार पटत आली आहे. मैत्री, नातेसंबंध यांच्या आड पैसे आले की, दुरावा निर्माण होतो. काही अपवाद वगळता, पैशांपायी नात्यागोत्यांचा विसर पडतो. दुकानदार, भाजीवाले, मोठ्या कंपन्या आणि पैशांची देवाणघेवाण करणारे लोक एक पैसा देखील सोडायला तयार नसतात. आपण व्यवहारात चोख आहोत, हेच त्यांना दाखवून द्यायचे असते.
वैवाहिक जीवनात देखील पैशांवरून बिनसलं, अशी अनेक उदाहरणे आहेत. कधी कधी तर पैशांवरून जोडप्यांमध्ये इतके वितंडवाद होतात की, त्याचे परिणाम वाईट होतात. त्यामुळेच नवविवाहित दांपत्यांना सावधगिरीची सूचना द्याविशी वाटते की, त्यांनी पैशांच्या बाबतीत फार ताणून घेऊ नये. लोकांनी केलेल्या चुका करू नये. अन् आपल्या संसाराची गोडी कायम ठेवावी.

पैशाला अधिक महत्त्व
आत्ताच्या महागाईच्या काळात पैसा महत्त्वाचा आहे, हे मान्य. पण त्यासाठी आपली नातीगोती पणाला लावली पाहिजे, असं थोडंच आहे. अशी काही जोडपी दुर्दैवाने आपल्या सभोवती आढळतात, जी नात्यांपेक्षा पैशांना अधिक मानतात. काही तरुण मुली तर, आपण पैशांसाठी लग्न करतो, असं खुलेआम बोलतात. लग्न झाल्यावर, माझ्या नवर्‍याच्या सर्व कमाईवर केवळ माझाच हक्क आहे; अशी त्यांची विचारधारा असते. अशा मुलीचा नवरा जर त्याचे आई-बाप किंवा भाऊ-बहिणींसाठी काही खर्च करू लागला, तर त्यांना खटकते.
त्याचप्रमाणे कमावत्या बायकोच्या पैशांवर केवळ आपलाच हक्क आहे, असं मानणारे पण काही नवरे आहेत. त्यांनाही लग्नानंतर आपल्या बायकोने तिच्या माहेरच्या लोकांवर पैसे खर्च करावेत, हे आवडत नाही. मग भांड्याला भांडं लागतं. या विचारधारा अत्यंत चुकीच्या आहेत. त्यामुळे नवरा-बायको, दोघांनीही असा विचार करू नये. आपला जोडीदार असा खर्च करत असेल, तर त्याचे समर्थन करावे. अन् संसार समंजसपणे करावा.

जॉईन्ट अकाऊन्ट उघडणे
आता आपले लग्न झाले आहे, तेव्हा बँकेत आपला जॉईन्ट अकाऊंट उघडावा, या उद्देशाने लगोलग अकाऊंट उघडू नये. कारण दोघांपैकी एकाला मनातून तसं वाटत नसेल, तरी तो मन राखण्यासाठी, मर्जीविरुद्ध या गोष्टीला तयार होईल. त्याला काही अर्थ नाही. लग्नानंतर घरखर्च दोघांनीही चालवला पाहिजे, असा सर्वसाधारण संकेत असतो. त्यावर आधी दोघांनी शिक्कामोर्तब केले पाहिजे. तसेच कोणता खर्च कोणी उचलायचा, हे आपापसात मसलत करून ठरविले पाहिजे. खर्चाची अगदीच समसमान जबाबदारी घ्यायची असेल, तर असा अकाऊंट उघडायला हरकत नाही. कारण असा एकत्र अकाऊंट उघडला जातो अन् एक जोडीदार, दुसर्‍याला अंधारात ठेवून त्यातील रक्कम उचलत राहतो. हे बरोबर नाही. एकत्र अकाऊंट उघडून खर्चाची जबाबदारी जर एकत्र घ्यायची, हा उद्देश असेल, तर रकमेची उचल एकमेकांना सांगून, त्याची कारणे देऊन केली पाहिजे. हा व्यवहार एकतर्फी असता कामा नये.

कमाई वाढविणे
आयुष्यात यश मिळविणे, नोकरीधंद्यात प्रगती करणे व आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी पैसा कमावणे, यात गैर काहीच नाही. पण खूप पैसे मिळविण्यासाठी, अहोरात्र कामात गुंतून राहणं आणि त्यासाठी घरातील लोकांकडे दुर्लक्ष करणं, हे चुकीचे आहे. ऐषारामाच्या वस्तू, चैनीची इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करुन दिली की, आपली जबाबदारी संपली, असं मानणारे काही महाभाग आहेत. या गोष्टींचे घरच्यांना गुलाम करून टाकायचे अन् आपण स्वतः पैशांचे गुलाम व्हायचे; ही पद्धत बरी नव्हे. लग्न झाल्यावरच नव्हे, तर पुढे सर्व आयुष्यभर आपली पत्नी, मुलांसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. तुम्हाला चैनीच्या वस्तू घेऊन दिल्या आहेत, ना मग मौज करा. मला पैशांच्या मागे धावू द्या, हा दृष्टिकोन बाळगू नका. त्याने तुम्ही पैसे भलेही कमवाल. पण जिव्हाळा, प्रेम गमावून बसाल. त्यामुळे तुम्ही घरच्यांसाठी जेवढा वेळ द्याल, तितके तुमचे भावबंध टिकून राहतील.

वाद टाळा
पैशांमुळे वाद होतात. अन् ते टोकाला जाऊ शकतात. त्यामुळे असे वाद होणार नाहीत, हे काळजीपूर्वक जपा. तसेच एकमेकांना पैसे खर्च करण्यावरून वारंवार टोकू नका. लग्नापूर्वी काही कर्ज अंगावर असेल, तर त्याची स्पष्ट कल्पना जोडीदाराला द्या. म्हणजे वाद उत्पन्न होणार नाहीत. सिनेमा-नाटकाचा आस्वाद घेताना, त्याची मर्यादा आखून घ्या. कारण आजकाल या करमणुकीची तिकीटे महागडी आहेत. एक कुटुंब असे आहे की, महिन्यातून एकेक सिनेमा व नाटक पाहतात. तर एक कुटुंब असे आहे की, ते दर आठवड्याला एक सिनेमा पाहतातच. हे नियमन योग्य आहे. ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे करमणुकीचा खर्च उचलावा.