फेशियलचं तंत्र (Better Applications Of Facial)

फेशियलचं तंत्र (Better Applications Of Facial)

सध्या लॉकडाऊनमुळे आपल्याला चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी बाहेर पार्लरमध्ये जाता येत नाहीये. आणि हे स्थिरस्थावर व सुरक्षित होईपर्यंत अजूनही बराच काळ जाईल असंच दिसतंय तेव्हा आपण घरीच राहून आपल्या सौंदर्याची काळजी घ्यावयास हवी. चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी फेशियलचं महत्त्व जाणून घेऊ.
फेशियलचं तंत्र हा नव्या युगाचा मंत्र झाला आहे आणि तो आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. चेहर्‍यावरील काळे डाग, वांग, वयोमानानुसार येणार्‍या समस्या, काही विशिष्ट औषधांची अ‍ॅलर्जी येऊन बिघडलेला चेहरा, हार्मोनल इंबॅलन्समुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम या सर्वांसाठी औषधोपचारांबरोबरच फेशियलचा मेळ घातला तर अतिशय चांगले व टिकाऊ परिणाम दिसून येतात.

घरच्या घरी फेशियल केल्याने स्वच्छतेची व शुद्धतेची हमी असते. परंतु त्यापूर्वी आपणास काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी काही टीप्स
–  आपली त्वचा कशी आहे, हे स्वतःच तपासून पाहा व त्याप्रमाणे फेशियलची निवड करा.
–  ऋतू व फेशियल यांची योग्य सांगड घाला.
–  चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी नियमित थोडासा व्यायाम करा. जसे – गाल खूप फुगवणे, दोन्ही ओठ एकत्र जुळवून एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे वळवणे, चेहर्‍यावर ताण येईल अशी हास्यमुद्रा करणे, गाल आत ओढून घेऊन ओठांचा चंबू करणे.
–   अति खारट, अति तेलकट पदार्थाऐवजी ताजी फळे, कोशिंबिरी याचा उपयोग जेवणामध्ये जास्त असावा.
–   आठवड्यातील एक दिवस उपवास करून पोट, मन व शरीराला विश्रांती द्यावी.
–   फेशियलचा मसाज शास्त्रशुद्ध व माफक असावा. मसाज कमी झाला तर फारसे बिघडणार नाही. परंतु जास्त झाला तर घर्षणामुळे उष्णतेची निर्मिती जास्त होऊन फोड येऊ शकतात.
–   उन्हाळ्यात प्रथम क्रीम मसाज करून नंतर वाफ घ्यावी. तर थंडीच्या दिवसात क्लिन्झींग नंतर वाफ घ्यावी व नंतर मसाज करावा.
–   वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्वचा पूर्ण विकसित नसते. त्यामुळे तत्पूर्वी फेशियल करू नये.
–   वयाच्या तिशीनंतर दर महिन्याला, चाळिशीनंतर दर पंधरवड्याला तर पन्नाशीनंतर दर आठवड्याला फेशियल करावे.
–  फेशियल केव्हाही केले तरी फायदेशीरच असते.
–   चेहर्‍यावर केव्हाही वाफ घेतली, की लगेच बर्फ फिरवावा. वाफ घेतल्यावर त्वचेची सूक्ष्म रंध्रे उघडी होतात. ती तशीच उघडी राहिली तर त्यात धूळ जमा होऊन ब्लॅकहेड्स वाढण्याची शक्यता असते.
–   एखादा पॅक अथवा बर्फ वापरून ही रंध्रे बंद करावी लागतात. म्हणजे त्वचेचा नैसर्गिक ताण व इलॅस्टीसिटी कायम राहते.
–   घराच्या खिडकीमधून येणारे सकाळचे कोवळे ऊन किमान दहा मिनिटे चेहर्‍यावर घ्यावे. या कोवळ्या ऊनामध्ये नैसर्गिक ड जीवनसत्त्व मुबलक असते. या जीवनसत्त्वाच्या प्राप्तीमुळे स्नायूंना पुष्टी व बळकटी येते.

–   चेहरा नेहमी थंड पाण्याने धुवावा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्वचा घट्ट राहते व चेहरा तजेलदार दिसतो.
–  चेहर्‍यावरील त्वचेवर सतत अथवा जास्त घाम येत असेल तर एखादा जाड नॅपकीन थंड पाण्यात भिजवून चेहर्‍यावर 10-15 मिनिटं ठेवा व श्‍वासोच्छवासासाठी नाक व तोंडाची जागा मोकळी सोडावी. नंतर फेशियलसाठी मसाज करावा.
–  चेहरा धुतल्यानंतर कधीही टॉवेलने वरून खालच्या दिशेने जोर लावून पुसू नये. त्यामुळे त्वचा सैल पडून ओघळते. एकतर पाणी तसेच त्वचेवर जिरून जाऊ द्यावे अथवा चेहरा फक्त टिपून घ्यावा.
–   चेहर्‍यावर भाजलेली जखम असेल तर फेशियल करू नये.
फेशियल हे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहे. तरीही वयपरत्वे, प्रकृतीपरत्वे, व्यक्तीपरत्वे, स्थलकालऋतू परत्वे याचे परिणाम भिन्न असू शकतात. म्हणून फेशियल करण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्यावी. काही त्रास वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.