सहज परतावा देणारी गुंतवणूक (Benefits Of Zero Ri...

सहज परतावा देणारी गुंतवणूक (Benefits Of Zero Risk Investment)

आपल्या स्त्रियांना सगळ्यात जास्त हौस असते ती दागिन्यांची त्यातही सोन्याचे दागिने अत्यंत आवडीने घातले जातात. लग्नसमारंभ असो की, अक्षय तृतीया अथवा गुरुपुष्यामृत योग्य; सोने-सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा रिवाज आपल्याकडे आहे. राजेरजवाड्यांपासून ते गोरगरीबांपर्यंत लग्नकार्यात सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा व ते अंगावर मिरवण्याचा सोस स्त्रियांना असतो. अलीकडे तर पुरुषांच्या अंगावर देखील सोन्याने स्थान मिळवले आहे. कानात भिकबाळी घालण्यापासून ते अंगठी चेन व ब्रेसलेट्सचे पिवळेपण पुरुष मंडळी मोठ्या दिमाखात अंगावर मिरवताना दिसतात. त्यातूनच गोल्डमॅन हि नवी उपाधी प्रचलित झालेली आहे.

दागिन्यांच्या या हौसेपायी आपल्या देशात सोन्याला प्रचंड मागणी आहे. अन ती कधीच कमी होत नाही. सोन्याचे भाव गगनाला भिडले तरी त्याची मागणी तसूभर देखील कमी झाली आहे, असं म्हणता येणार नाही. आता कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सराफा दुकाने सक्तीने बंद ठेवण्याची वेळ आल्याने या तीन-चार महिन्यात दागिन्यांची विक्री आणि सोने खरेदी मध्ये मंदी आली असेल. पाचशे व हजारांच्या नोटांवर विद्यमान सरकारने बंदी आणली तेव्हा सोने बाजारात मंदीचे वारे वाहू लागले होते. पण ते तात्पुरतेच होते. काही वर्षांपूर्वी सुवर्ण नियंत्रण कायदा, तत्कालीन सरकारने लागू केला होता, तेव्हाही सोन्याच्या बाजारात मंदीचे वारे वाहिले होते पण तेही तात्पुरतेच. एकूणच काय तर सोन्याचा सोस आणि ते अंगावर मिरवण्याची हौस यामध्ये भारतीयांचा हात कुणीही धरणार नाही.भारतीयांना, त्यातही स्त्रियांना सोन्याच्या दागिन्यांची हौस मोठ्या प्रमाणात आहे; म्हणून आपल्या देशात सोन्याची मागणी जास्त आहे. पण एकूणच जगभरात सोन्यालाच अधिक भाव आहे व त्याचा वापर जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे सोन्याच्या वापरावरच श्रीमंती तोलली जाते. त्यात पुन्हा भारत आणि चीन या दोन देशात, जगातील इतर देशांपेक्षा सोन्याला अधिक मागणी आहे. सोन्याचा भाव दर दिवशी वाढत असला तरी 2008 साली झाली त्याच्या मंदी व तेजीने विक्रमी आकडे वाढले होते. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर गडगडले आणि जून महिन्यात साधारणपणे 10 ग्रॅमला 25 हजार रुपये असा भाव झाला होता. पण ऑगस्ट महिन्यात त्याने अचानक उसळी घेत 10 ग्रॅमला साधारणपणे 31 हजार दोनशे रुपयांची पातळी गाठली अन 2 महिन्यांपेक्षा कमी काळात सोन्याच्या भावात 25 टक्के उसळी दिसून आली होती. त्या काळातील सोन्याचा वापर 310 टन झाला होता. तो एकूणच मागील 10 वर्षातील वापरापेक्षा, फक्त 2 महिन्यातच सर्वोच्च ठरला होता.

आपल्या देशातील सोन्याचा दर दोन गोष्टींवर अवलंबून असतो. आंतराष्ट्रीय बाजारात त्याची डॉलर्समध्ये असलेली किंमत आणि आपल्या रुपयाला डॉलरमध्ये मिळणारा दर, दुर्दैवाने दिवसें दिवस आपल्या रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग होत चालला आहे. त्यामुळे सोन्यासाठी आपल्याला जास्त किंमत मोजावी लागत आहे. सोन्याच्या या चढया दरामुळेच ती आजच्या घडीला सर्वोत्कृष्ट गुंतवणूक ठरत आहे. तसं पाहिलं तर स्थावर आणि जंगम मालमत्ता, शेअर्स, म्युच्युअल फ़ंड आणि मुदत ठेवी या सर्वांपेक्षा सोन्याची गुंतवणूक हि आधीपासूनच सर्वश्रेष्ठ गुंतवणूक मानली जाते. कारण सोन्याला असलेली प्रचंड मागणी आणि दिवसेंदिवस त्यात होणारी दरवाढ. गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना सोन्याचा मोठा आधार वाटतो. कारण आर्थिक परिस्थिती बिघडली तर सोन्याचा दागिना सोनाराला विकून अथवा गहाणकर्‍याकडे गहाण ठेवून लगेच रोख पैसे मिळतात व अर्थव्यवस्था सावरता येते. लहानमोठ्या व्यावसायिकांना तर सोने ही डगमगत्या परिस्थितीत सावरण्याची खाण वाटते. कारण व्यावसायिक अडीअडचणीला सोन्याचे दागिने गहाण टाकून अथवा बँकेत ठेवून झटपट कर्ज मिळविता येते. लहानसा जमिनीचा तुकडा किंवा फ्लॅट आपल्याकडे असला तरी अडीअडचणीला तो तितकासा कामी येत नाही. कारण त्याचे गहाण अथवा विक्री सोन्याइतकी झटपट होऊ शकत नाही. या स्थावर मालमत्ता विकायच्या म्हटल्या तर घेणारी व्यक्ती कायद्यानुसार व्यवहार करत असते. हा व्यवहार वेळखाऊ असतो. तर सोनेनाणे विकून पैशांचे घबाड पटकन हाती येते. सध्याच्या परिस्थितीत सरकारच्या कडक निर्बंधांमुळे कित्येक बिल्डरांचे फ्लॅट्स, व्यावसायिक जागा विक्रीची वाट पाहत आहेत. शेअर मार्केटमध्येही तीच परिस्तिथी आहे. पुरवठा जास्त अन मागणी कमी असे दृश्य दिसत आहे. गरजुंना घर हवं आहे, पण पैश्यांची तजवीज होऊ शकत नाही म्हणून ते गप्प आहेत. त्यामुळे बांधकामे तयार असली तरी ती गिर्‍हाईकांची वाट पाहत आहेत. त्यामुळे एकेकाळी चार पैसे गाठीशी असले की घरांमध्ये गुंतवणूक करण्याची जी प्रथा रूढ झाली होती, ती आता मागे पडली आहे . म्हणूनच सोन्यामध्ये गुंतवणूक हि तेव्हाही चांगली होती व आत्ताही चांगलीच आहे.

पूर्वीच्या काळी, नोकरदारांना दिवाळीला भरघोस बोनस मिळायचा तेव्हा कपडेलत्ते व इतर चैनीच्या वस्तू खरेदी करून बाकीची रक्कम सोने विकत घेऊन गुंतविली जात असे. कित्येक घरात दिवाळीला व अक्षय्यतृतीयेला गुंजभर किंवा तोळाभर सोने घेण्याची पद्धत होती. आता ज्यांच्या हाती जास्त पैसे खुळखुळतात त्यांनी ही पद्धत अंगिकारायला हरकत नाही. कारण याचा परतावा सहज आणि भरघोस आहे. शिवाय ही पूर्वीपासूनच अतिशय सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. शेअर्स, म्युच्युअल फंडस् किंवा बॉण्ड्स यामध्ये असलेली जोखीम यात नाही. यात दराचे चढउतार नाहीत. ह्याचा दर सदैव चढाच आहे. सेन्सेक्स अतिशय गडबडला तरच या चढउतारात फरक दिसून येतो. तरीपण सोने विकले जाण्याची हमी आहेच. अन गुंतवणूक केलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे मिळण्याची पण सुवर्णसंधी आहेच. ही सुवर्णसंधी साधताना खबरदारी अशी घ्यावी की आपल्या उत्पन्नाच्या 12 टक्के गुंतवणूक याच्यात करावी असं तज्ज्ञांचं आग्रही मत आहे. शिवाय सोन्याचे डाग (दागिने, बिस्किटे, लगडी) हे प्रतिष्ठित, दर्जेदार सराफा कडून घ्यावेत. त्याच्या पावत्या जपून ठेवाव्यात. दर सहा महिन्यांनी सोन्याचा दर किती वाढलाय त्याचा डोळसपणे आढावा घ्यावा. अन ऐपत असल्यास पुन्हा सोने घ्यावे. ही गुंतवणूक भविष्यात तुम्हाला काही कमी पडू द्यायची नाही