उसाचा रस गुण सरस (Benefits Of Sugar Cane Juice)

उसाचा रस गुण सरस (Benefits Of Sugar Cane Juice)

उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखी अत्यंत महत्त्वाची पोषक तत्त्वं असतात. त्यामुळे मौसम कोणताही असो, उसाचा रस हा आपल्या शरीरास सरसच ठरतो. उन्हाळ्यात शरीरास डिहायड्रेट होण्यापासून वाचवण्यासाठी उसाचा रस आवर्जून प्यायला हवा. याचबरोबर कावीळसारख्या गंभीर आजारासाठीही उसाचा रस औषधी आहे.
यामुळे हाडांना मजबुती मिळते, तसंच दातांच्या तक्रारीही दूर करता येतात. पाहूया उसाच्या रसाचे आणखी काही गुण…

कॅन्सरपासून सुटका करतो
उसाच्या रसामधील कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि
मॅग्नेशियम यांसारखी पोषकतत्त्वं कॅन्सरशी लढण्यास मदत करतात. मुख्यत्वे, प्रोस्टेट आणि स्तनाच्या कॅन्सरसाठी उसाचा रस अधिक परिणामकारक ठरतो.

पचनक्रिया सुधारतो
उसाच्या रसामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही. तसंच पोटात इन्फेक्शन होऊ नये, यासाठीही उसाचा रस पिणं फायदेशीर ठरतं.

हृदय रोगांपासून लांब ठेवतो
हा रस प्याल्याने हृदयाच्या झटक्यासारख्या हृदय रोगांना लांब ठेवता येतं. उसाच्या रसामुळे शरीरातील कॉलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड यांचा स्तर कमी होतो. शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होत नाही आणि रक्ताभिसरण सुरळीत चालू राहतं.

वजन कमी करतो
उसाच्या रसामधून शरीरास आवश्यक असणारी शर्करा मिळते आणि वाईट कॉलेस्टेरॉल कमी करून आपलं वजन कमी करण्यास मदत मिळते.

मधुमेहींसाठी वरदान ठरतो
उसाच्या रसामध्ये साखर ही निसर्गतःच असते. त्यामुळेच तो खाण्यास गोड लागतो. उसाच्या रसामधील ग्लायसेमिक इंडेक्समुळे हा रस मधुमेही व्यक्तीही पिऊ शकतात. परंतु, हा रस संतुलित प्रमाणात प्यायला हवा.

त्वचा तेजाळतो
उसाच्या रसामध्ये अल्फा हायड्रॉक्सी अ‍ॅसिड असतं, ज्यामुळे त्वचेसंबंधीच्या तक्रारी दूर होतात. हा रस त्वचेस आर्द्रता देऊन, सुरकुत्या कमी करतो. यासाठी उसाचा रस त्वचेवर लावून, सुकल्यानंतर पाण्याने धुवा. असं केल्याने त्वचा स्वच्छ आणि नितळ बनते.

लक्षात ठेवा
रस्त्यावरील हातगाड्यांवर किंवा कोणत्याही दुकानात उसाचा रस पिऊ नका. यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
उसाचा रस पिण्यापूर्वी दुकानातील स्वच्छतेकडे कटाक्ष टाका. जास्त माश्या बसलेल्या दिसतील, अशा ठिकाणचा रस पिऊ नका.
उसाचा रस काढण्यासाठी दुकानदार मशीनचा वापर करतात. तुम्हाला माहीत आहे का की, ही मशीन चालवण्याकरिता दुकानदार जे तेल वापरतात, ते तेल पोटात गेल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर
वाईट परिणाम होऊ शकतो.

उसाचा रस कधी पिऊ नये?
उसाचा रस केव्हाही ताजा प्या, फ्रिजमध्ये ठेवलेला पिऊ नका.
उसाचा रस पिताना त्यामध्ये अन्य काही मिसळू नका.
उसाचा रस पिण्यापूर्वी दुकानात ठेवलेल्या इतर उसांवरही नजर टाका. कारण दुकानदार तुम्हाला फसवून एखादा खराब झालेला ऊस देण्याची शक्यता नाकारता येत नाही.