तीळ खावेत वर्षभर (Benefits Of Sesame Consumption)

तीळ खावेत वर्षभर (Benefits Of Sesame Consumption)

संक्रांत आणि तीळ हे समीकरण इतकं घट्ट बसलं आहे की, संक्रांतीशिवाय आपण बहुधा तिळाचा आहारात वापरच करत नाही. मात्र अनेक आरोग्यदायी गुणधर्म असलेल्या तिळाचं सेवन वर्षभर नियमितपणे करायला हवं.

नुकतीच संक्रांत होऊन गेली. संक्रांतीनिमित्त सर्वांनी तिळाचे नानविध पदार्थ पोटभर खाल्ले असतील. इतके की, आता पुढच्या वर्षी संक्रांत येईपर्यंत कुणीही तिळाच्या पदार्थांकडे डुंकूनही पाहणार नाही. हो, कारण संक्रांत आणि तीळ हे समीकरणच इतकं घट्ट बसलं आहे की, संक्रांतीशिवाय बहुधा आपण आहारात तिळाचा वापरच करत नाही. खरं तर, थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता मिळावी, या उद्देशाने आपल्या पूर्वजांनी संक्रांतीच्या निमित्ताने तीळगूळ आणि तिळाचे नानाविध पदार्थ बनवण्याची-खाण्याची परंपरा सुरू केली. मात्र शरीर उष्ण करणं-ठेवणं याव्यतिरिक्तही तिळाचे अनेक गुणधर्म आहेत. आकाराने लहान असला तरी, तिळात पौष्टिकता मात्र भरपूर आहे. तिळात कॅल्शियम, मॅगनीज, लोह, फॉस्फरस, सॅलेनियम, जीवनसत्त्व ब आणि तंतुमय पदार्थ आहेत. म्हणूनच तिळाचं सेवन वर्षभर नियमितपणे करायला हवं. अर्थात, दररोज साधारण 1 ते 2 चमचे तीळ आहारात घ्यायला हवेत.
–    तिळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं आहेच, सोबत त्यातील झिंक हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करतं. लोह आणि तांबे संधिवातासारख्या विकारांवर उपयुक्त ठरतं.
–    सांधेदुखीसाठी तिळाचं तेल गरम करून, त्याने कंबर, सांधे सर्वांना अभ्यंग (मालीश) करून शेकावं. त्यामुळे दुखणं कमी होण्यास मदत होते.

–    कोमट तिळाच्या तेलाने शरीराला मसाज करून, तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं आणि ताणही कमी होतो.
–   रोज तीळ चावून खाल्ल्यास शरीराचं बळ वाढतं, दात मजबूत, शुभ्र होऊन, त्यातील बॅक्टेरियाचाही नाश होतो.
–   नैसर्गिकरीत्या त्वचेला पोषण आणि कोमलता देण्यासाठी तिळाचं तेल फायदेशीर ठरतं. त्यासाठी तिळाच्या तेलाने सर्वांगाला मसाज करावा.
–    केसांच्या वाढीसाठी तिळाचं तेल केसांच्या मुळाशी लावावं. 
–   तिळातील तंतुमय पदार्थांमुळे भूक कमी लागते. पोट लगेच भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल, तर आहारात योग्य प्रमाणात तिळाचा समावेश करावा. त्यामुळे वजन कमी होण्यासोबतच शरीराला उपयुक्त क्षार आणि जीवनसत्त्वंही मिळतील.
–    पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी, तिळाच्या तेलाने मसाज करावा.
–    महिलांना पाळीत कमी रक्तस्राव होत असेल, तर लसूण, खोबरं घालून केलेली तिळाची चटणी खावी.

–    स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी तिळाच्या तेलाने मसाज करावा.
–   तीळ बाळंतिणीचं दूध वाढवतात. म्हणून बाळंतिणीला तिळाचे लाडू, भाजलेले तीळ द्यावे.
–    लहान मुलांना पांढरे तीळ भाजून वाटून खाण्यासाठी दिल्यास त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते.
–    लहान मुलांना अपचन होऊन पोटात दुखत असेल, तर त्यांच्या बेंबीभोवती गोलाकार तीळ तेल चोळावं आणि शेक घ्यावा.
–    शरीरातील उष्णता टिकून राहण्यासाठी, अर्धा चमचा तीळ खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावं.
–    मूळव्याधीच्या त्रासात रक्त पडत असल्यास लोणी-खडीसाखर, नागकेशर यांच्यासमवेत तिळाचं सेवन करावं.
–    लघवी स्वच्छ होत नसेल, तर तीळ, दूध आणि खडीसाखर एकत्र करून प्यावं.

–    भाजलेल्या जागेवर तीळ वाटून लावल्यास आराम पडतो. श्र    तीळ कुटून, गरम करून सुती कापडात बांधावेत. या पुरचुंडीने मुका मार लागल्यामुळे किंवा मुरगळल्यामुळे दुखावलेला शरीराच्या भागावर शेकल्यास आराम मिळतो.