नियमित व्यायामाचे असेही फायदे (Benefits of Regu...

नियमित व्यायामाचे असेही फायदे (Benefits of Regular Exercise)

व्यायाम हा केवळ वजन कमी करण्यासाठीच करावा, हा गैरसमज दूर करायला हवा. त्यासाठी वजन कमी करण्याव्यतिरिक्तही व्यायामाचे काय-काय फायदे आहेत, ते जाणून घ्यायला हवं.

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायलाच हवा, हे वाक्य आपल्या मनावर इतकं बिंबवलं गेलं आहे की, व्यायाम हा केवळ वजन कमी करण्यासाठीच करायला हवा, असं आपल्याला वाटू लागलं आहे. सर्वप्रथम हा गैरसमज दूर करायला हवा. त्यासाठी वजन कमी करण्याव्यतिरिक्त व्यायामाचे काय-काय फायदे आहेत, ते जाणून घ्यायला हवं.

 • व्यायामामुळे स्टॅमिना वाढतो, तरतरी जाणवते.
 • शरीरातील रक्ताभिसरण जलद गतीने झाल्यामुळे हृदय आणि फुप्फुसांचं सामर्थ्य वाढतं. एका सर्वेक्षणानुसार असं लक्षात आलं आहे की, हृदयविकाराच्या झटक्यानंतर ज्या व्यक्ती नियमित व्यायाम करतात, त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा दुसरा झटका येण्याची शक्यता 5 टक्के असते. तेच ज्या व्यक्ती अकार्यक्षम राहतात त्यांच्यामध्ये ही शक्यता 22 टक्के असते.
 • थकवा आला असल्यासही व्यायाम केल्यानंतर मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने होतात. तनामनात नवा उत्साह संचारतो. तेव्हा पुढच्या वेळी थकवा आलाय, त्यामुळे व्यायाम नको, ही सबब सांगू नका.
 • झोप न येण्याच्या समस्येतही व्यायाम उपयुक्त ठरू शकतो. नैसर्गिकरीत्या चिंता कमी करून व्यायाम आपल्या शरीर-मनाला शांत करतो आणि त्याचे कोणतेही दुष्परिणामही नसतात. तेव्हा निद्रानाशाची समस्या सतावत असल्यास हे औषध अजमावून पाहाच.
 • व्यायामामुळे त्वचेखालील रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरणही उत्तम प्रकारे होतं. त्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसू लागते. नियमितपणे व्यायाम केल्यास स्ट्रेच मार्क्स, डाग, व्रण आणि अ‍ॅक्ने यांसारख्या त्वचेच्या समस्याही दूर होऊ शकतात. अर्थात, व्यायामामुळे तुमचं मूळ रूप बदलणार नसलं, तर कायापालट नक्कीच होऊ शकतो.
 • नियमितपणे व्यायाम केल्यास वयानुसार हाडं कमकुवत आणि ठिसूळ होण्याची प्रक्रिया मंदावते. अगदी संधिवाताची समस्या असल्यासही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करणं लाभदायी ठरतं. व्यायामामुळे हाडांमधील कॅल्शियमच्या नुकसानासही प्रतिबंध होतो. नियमितपणे व्यायाम केल्यास पाठदुखी आणि स्नायूंवरील ताण कमी होऊ शकतो.
 • निराशा किंवा राग यांसारख्या भावना मनातून काढून टाकायच्या असतील, तरी व्यायामाचा उपाय रामबाण ठरतो. तेव्हा पुढच्या वेळी निराशा किंवा राग अशा भावनांनी मनाचा ताबा घेतला की, शरीराला व्यायाम करायला लावा.
 • निरीक्षणातून असंही निदर्शनास आलं आहे की, व्यायामामुळे रक्तदाब कमी होऊन सामान्य होऊ शकतो.
 • हृदयविकार, लठ्ठपणा यांसारख्या आरोग्य समस्यांसाठी चालण्याचा व्यायामही अतिशय उपयुक्त आहे. मुख्य म्हणजे, हा सोपा व्यायाम कुणीही करू शकतं. ब्रिस्क वॉक केल्यास तुम्हाला शांतीसोबतच ऊर्जाही मिळेल. हाडंही मजबूत होतात.

व्यायामामुळे नुकसान होऊ नये म्हणून…

 • अति व्यायाम, तसंच आपल्या शरीरासाठी योग्य नसलेला, शरीरावर अत्याधिक ताण आणणारा व्यायाम टाळलेलाच बरा. व्यायामामुळे इजा होऊ नये, असं वाटत असेल तर शरीराचं ऐका. शरीर दुखण्याच्या माध्यमातून आपल्याला संकेत देत असतं. म्हणूनच शरीराचं कोणतंही दुखणं सतावत असेल, तर व्यायाम करू नका.
 • वॉर्म-अपची पायरी वगळून थेट व्यायामावर उडी मारू नका. यामुळे शरीराला इजा होण्याची शक्यता असते. वॉर्म-अपमुळे स्नायू लवचीक होऊन शरीर व्यायाम करण्यास तयार होतं. जॉगिंग, स्ट्रेचिंग यांसारखा सांध्यांना सोपा व्यायाम देणारा वॉर्म-अप जरूर करा. तसंच व्यायामानंतर शरीर शांत होण्यासाठी शांत पडून राहणं किंवा थोडं हळुवार चालणं, असा कुल-डाऊन व्यायामही करा.
 • व्यायामास सुरुवात करण्यापूर्वी किंवा दोन व्यायाम प्रकारांमध्ये घोटभर पाणी पिण्यास हरकत नाही. घामामुळे शरीरातील पाण्याची झालेली झीज याद्वारे भरून काढता येईल. उष्ण हवामानात तर व्यायामादरम्यान पाणी पिणं गरजेचंच आहे. थकवा दूर करण्यासाठी त्यात थोडं मीठही मिसळता येईल. मात्र व्यायामास सुरुवात करण्यापूर्वी ग्लुकोजमिश्रित गोड पाणी मुळीच पिऊ नका.
 • व्यायाम करताना कोणताही विशेष पोशाख करण्याची गरज नाही. मात्र हालचाल सहज करता येईल, असा हलका पोशाख करणं सोयीस्कर ठरेल. तसंच योग्य बूट आणि कॉटनचे मोजे जरूर घाला.
 • सकाळी किंवा संध्याकाळी, जेव्हा वातावरण तुलनेत थंड असतं तेव्हा व्यायाम करा. सकाळी उठल्यावर किमान अर्ध्या तासानंतर व्यायाम करा, म्हणजे शरीर योग्य प्रकारे हालचाल करू लागेल.

कोणत्याही वेळी रिकाम्या पोटी व्यायाम करू नका. व्यायाम करण्याच्या साधारण अर्ध्या तासापूर्वी अगदी हलका आहार घ्या. जेवणापूर्वी व्यायाम करणं चांगलं मानलं जातं. कारण व्यायामामुळे शरीराची कॅलरीज बर्न करण्याची क्षमता वाढते, त्याचा फायदा अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी होऊ शकतो.
नऊ ते सहाची नोकरी आणि प्रवासाचे तास-दोन तास, असा दिनक्रम असणार्‍या नोकरदार वर्गासाठी व्यायामासाठी दररोज काही तासांचा वेळ काढणं शक्य होत नाही. हरकत नाही. आठवड्यातून किमान तीन दिवस किमान अर्धा तास व्यायामासाठी काढला तरी चालेल. मात्र नियमित व्यायाम जरूर करा. वय, लिंग, वजन असा कोणताही भेद न मानता नियमितपणे व्यायाम करा. तसंच व्यायामासोबतच संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात आरामही गरजेचा आहे. म्हणूनच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात आराम या त्रिसूत्रीची कास जरूर धरा.