वास्तुशांती केल्यानं काय होतं? (Benefits of Hou...

वास्तुशांती केल्यानं काय होतं? (Benefits of House Warming)

फेंगशुईशास्त्र ब्रह्मस्थान मानतं का? वास्तुशांती केल्यानं काय होतं?
वास्तुपुरुष हा प्रत्येक वास्तूचा आत्मा असतो. प्रत्येक वास्तूत त्याचं वास्तव्य असतं. ईशान्य दिशेला वास्तुपुरुषाचं डोकं असतं, म्हणून तिथे देव्हारा असावा. वास्तुशांती करताना भटजींकडून वास्तुपुरुषाची प्रतिमा पुजून घेतली की ती आग्नेय दिशेला ईशान्येकडे डोकं करून पुरावी. त्यावर कुठलीही जड वस्तू ठेवू नये. वास्तुशांती केल्याने वास्तूमधील अशुभ ऊर्जांचा नाश होतो. वास्तुपुरुष प्रसन्न राहतो. घरात आणि उद्योगधंद्यात यश प्राप्ती होते. घरात सुख समाधान नांदते. आपल्या घरातील मध्यस्थान म्हणजे ब्रह्मस्थान हे घराचं हृदय असतं. हे ब्रह्मस्थान मोकळं असावं. त्यावर जड वस्तू, भिंत वगैरे असल्यास त्याचे दुष्परिणाम अनुभवावे लागतात.

घराबाहेर दारावर गणपतीचा अथवा पंचमुखी मारुतीचा फोटो लावण्यास सांगतात. फेंगशुईशास्त्रामध्ये यासाठी काही वेगळा पर्याय आहे काय? असल्यास तो कोणता? त्यामुळे काय परिणाम साधतो?
घराबाहेर दारावर गणपतीचा, पंचमुखी मारुतीचा किंवा इतर कुठल्याही देवाचे फोटो लावणे चुकीचं आहे, असं फेंगशुईशास्त्र सांगते. कारण यामुळे तुमच्या इष्ट देवतांची दृष्टी घराच्या बाहेर जाते. त्याउलट तुम्ही घराच्या आतल्या बाजूला मुख्य दारावर तुमच्या इष्ट देवतांचे फोटो लावा. त्यामुळे त्यांची कृपादृष्टी घरामध्येच राहील. फेंगशुईशास्त्र घराबाहेर दारावर पाकुआ मिरर लावण्यास सांगते. हा मिरर लावल्याने बाहेरील अशुभ शक्ती किंवा अशुभ ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून अडवली जाते. आणि घरातील शुभ ऊर्जा घरातच स्थिरावते.

राशी आणि फेंगशुई यांचा काही संबंध येतो का? म्हणजे घरातील एखाद्या अडचणीवरील तोडग्यासाठी कुटुंबप्रमुखाची राशी पाहिली जाते का?
आपल्या जन्मराशी या जन्म नक्षत्र आणि वेळ पाहून काढल्या जातात. परंतु फेंगशुईच्या 12 राशी वेगळ्या आहेत. ज्या आपल्या जन्मतारखेवरून काढल्या जातात. फेंगशुईच्या या कुंडलीमध्ये तुमची रास आणि तुमचं तत्त्व (तुम्ही अग्नी, पाणी, धातू, माती की लाकूड) कळतं. त्यानुसार तुमच्या घराचं परीक्षण करताना घरातील कुटुंब प्रमुखाची फेंगशुई रास आणि तत्त्व पाहिलं जातं. व त्या तत्त्वावरून घरातील अडचणीवरील तोडगे सांगितले जातात.

मुलं अभ्यास करायचा कंटाळा करतात. त्यांची समजूत घातली की तेवढ्यापुरते ऐकतात नि सोडून देतात. त्यांचे अभ्यासात लक्ष लागावे यासाठी काय करावे?
आपल्या घरातील ईशान्य कोपरा हा अभ्यासाचा कोपरा आहे. ही दिशा जास्तीत जास्त ऊर्जाशील बनवा. तिथे अडगळ किंवा अस्वच्छता असू नये. फेंगशुईच्या काही वस्तू ठेवून ईशान्य कोपरा क्रियाशील बनवा. तिथे आठ क्रिस्टल बॉल्सचा (स्फटिकाचे गोळे) बंच (संच), एज्युकेशन पिरॅमिड (शिक्षणाचा मनोरा) आणि  ग्लोब (पृथ्वीची प्रतिकृती) ठेवा. मुलांना अभ्यासाला बसवताना ईशान्य दिशेकडे तोंड करून बसवा. त्यामुळे त्यांची अभ्यासाची आवड, स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.