चंपी… गुणाची की ! (Benefits Of Head Massage)

चंपी… गुणाची की ! (Benefits Of Head Massage)

चंपी… हेड मसाज ही लाख दुखो की एक दवा हैं…असं म्हणतात. ते खोटं नाही पण ही चंपी शास्त्रोक्त पद्धतीने केली गेली पाहिजे. नाहीतर ती अहितकारक ठरू शकते.
आहा… चंपी म्हणजे आराम, दिवसभराचा थकवा, डोकेदुखी यावर उत्तम उपाय. चंपी करून घेतल्यावर कसं अगदी बरं बरं वाटतं. डोळे जड होतात…छान झोप लागते. पण चंपी करून घेतल्यामुळे वाटणारं हे बरं खरंच हितकारक असतं का अहितकारक?

खरं पाहता, शास्त्रीयदृष्ट्या आणि वैद्यकीयदृष्ट्या डोक्याला मालिश करणं अतिशय चांगलं समजलं जातं. कारण शास्त्रोक्त पद्धतीने मालिश केल्यामुळे केवळ केसवृद्धी होत नाही, तर बुद्धीही तल्लख होते. स्मरणशक्ती वाढते आणि विचारांनाही गती मिळते. मनःशांती लाभते आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते, पण हे सर्व लाभ कधी होतील, तर व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने
मालिश केल्यावरच.

शरीरातील सर्वात प्रभावी आणि महत्त्वाचा अवयव म्हणजे मेंदू. अत्यंत महत्त्वाचा असा हा अवयव संपूर्ण शरीराला अहोरात्र नियंत्रित करत असतो. अशा या कंट्रोलिंग सिस्टमचं संरक्षण करणं आवश्यक आहेच. मेंदूला संरक्षित करणारं आवरण म्हणजे डोकं. डोक्याच्या कवटीवरील त्वचेवर लहान बल्ब येतात. या बल्बमधून केसांची निर्मिती होत असते. मेंदी आणि कवटी यांमध्ये असणारं मांसपेशी, रक्तवाहिन्यांचं जाळं अत्यंत नाजूक असतं. यांना धक्का पोहोचल्यास अर्धांगवायू, तसेच स्मृती, वाचा, दृष्टी यांची हानी होण्याचाही संभव असतो. म्हणजे पाहा, चुकीच्या पद्धतीने मालिश केल्यास त्याचा दुष्परिणाम काय होऊ शकतो ते.
मग प्रश्‍न येतो की, असं मालिश अहितकारक असल्यास ते करून घेतल्यानंतर आराम कसा वाटतो? याचं कारण म्हणजे, एक तर डोक्यावर असा दाब वा मार दिल्यामुळे रक्तप्रवाह जोरात होतो आणि दुसरं म्हणजे, एवढे आघात (स्ट्रोक्स) झेलल्यामुळे मेंदुवर ताण येतो आणि हा ताण वाढल्यावर आपोआप झोप येते. तसेच डोळ्यांच्या पेशींवरील रक्तप्रवाह वाढल्याने डोळ्यांवर ताण येऊन डोळे जड होतात. थोडक्यात, मालिशच्या फायद्यांमुळे झोप येत नाही, तर तो मालिश न पेलवल्याने शरीराला झोपेची आवश्यकता जाणवते.

शास्त्रीय मसाज कसा करायचा?
– तेल लावण्यापूर्वी डोकं स्वच्छ धुवून टर्किश टॉवेलने कोरडं करून घ्या.
– केसांचे दोन भाग करा. दोन कानांच्या मधून केसांचे भाग करा. पहिल्या डोक्याच्या मागचा भाग, तर दुसरा दोन कानांच्या पुढचा भाग जिथे भांग पाडला जातो तो. आता पुढच्या भागाचे कंगव्याने उभे समान चार भाग करा.
– टोक असलेल्या चमच्याच्या मागच्या बाजून केसांच्या पुढच्या चार भागांतून टाळूवर तेल सोडा. तेल जास्त पडले तरी चालेल.
– आता केस दाबून बसवा.
– डोकं पुढे झुकवून टाळूच्या मध्यभागी (किमान तीन चमचे) तेल सोडा आणि दोन्ही हातांनी ते केसांच्या खालच्या भागात चोळा.
– पुढच्या केसांप्रमाणे मागचे केससुद्धा दाबून बसवा.
– आता दोन्ही कानांच्या मागून हाताची बोटं केसात घुसवून मध्यभागापर्यंत आल्यावर वर उचलून एकमेकांत अडकवल्याप्रमाणे करा. या स्ट्रोकमुळे केसांच्या मुळापासून टोकापर्यंत तेल पसरते.
– याचप्रमाणे केसांच्या मागच्या भागातही स्ट्रोक द्या.
– आता बोटं मोकळी करून हलक्या हाताने डोक्यावर थोपटावा.
– किमान दहा मिनिटं केसांतून हाताची बोटं खालून वर आणि बाजूला अशी फिरवा. (या क्रियेमध्ये आवाज येतो.)
– नंतर केसांवर शॉवर कॅप लावून वरून टॉवेल बांधा.
– कपाळावर तेल लागलेले असल्यास ते साबणाने धुवून त्यावर टाल्कम पावडर लावा.
– साधारण अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने केस धुवून घ्या.
– साधारण पंधरा मिनिटं ते अर्ध्या तासात होणारा हा मसाज अनेक बाबतीत फायदेशीर आहे.
असा शास्त्रोक्त मसाज डोक्याला शांतता देतो.  मन एकाग्र करून मनःशांती देऊन स्मरणशक्ती वाढवतो.
टाळूवर तेल मुरल्यामुळे त्वचेला पोषणद्रव्यं मिळतात.  केसांच्या मुळाशी तेल पोहोचल्यामुळे केस बळकट होतात.  केस गळायचे थांबतात. रक्ताभिसरण वाढल्यामुळे केस वाढण्यात मदत होते. केस चमकदार होतात.
आता तुम्हीच ठरवा, पार्लर वा सलूनमध्ये जाऊन डोक्याची आणि सोबत आरोग्याची हजामत करून घ्यायची की घरी स्वतः योग्य शास्त्रोक्त पद्धतीने चंपी करायची?
– स्वप्निल वाडकर (स्पा थेरपिस्ट)