कडू कारल्याचे गोड फायदे (Benefits of bitter gourd)

कडू कारल्याचे गोड फायदे (Benefits of bitter gourd)

कारलं म्हटलं की, बहुतांश लोकं कडू लागल्यासारखं  तोंड करतात. कडू चवीमुळे कारलं काही घरांमध्ये क्वचितच आणलं जातं. परंतु, ज्यांनी याचे गुण जाणले आहेत, त्यांच्या घरी हे वरचेवर आणलं जातं. एक चव सोडली, तर कारलं आरोग्याच्या दृष्टीने आपल्या जीवनात गोडवा आणतं, हेच खरं.

Benefits of bitter gourd

कारल्यामध्ये आपल्या शरीराला अतिशय उपयोगी अशी पोषणतत्त्वं असतात. ही पोषणतत्त्वं केवळ आजारच नव्हे, तर सौंदर्यविषयक समस्याही कमी करण्यास मदत करतात. कारल्यामध्ये अ जीवनसत्त्व, कॅरोटीन, बीटा कॅरोटीन, लोह, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मँगेनीज अशी शरीराला आवश्यक सर्वच पोषणतत्त्वं असतात.

कारल्याचा गोडवा

–    मधुमेही व्यक्तींनी रोज कारल्याचा रस प्यायल्यास त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं.

–    कारल्याचा रस प्यायल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढतं.

–    ज्यांना मूतखड्याचा त्रास आहे, त्यांनी कारल्याच्या हिरव्या पानांचा रस दह्यामध्ये घालून सकाळ-संध्याकाळ प्यायल्यास खडा पडून जातो.

–    पोटात जंत झाल्यामुळे ज्यांना पोटदुखी होते, त्यांनी सलग तीन दिवस कारल्याचा रस प्यावा. जंत नाहीसे होतील.

–    गळ्याला सूज आली असेल, तर सुकं कारलं वाटून त्याचा लेप गळ्यावर लावल्यास सूज कमी होते.

–    गाठ झाली असल्यास त्यावर, तसंच दुखणार्‍या सांध्याना कच्च्या कारल्याचा रस गरम करून लावा, दुखणं कमी होतं.

–    लघवी होताना जळजळ होत असेल, तर कारल्याचा रस प्या. त्यामुळे जळजळ कमी होईल.

–    ताजी कारली नियमितपणे खाल्ली, तर अस्थमा, तसंच सर्दी-खोकल्यासारखे आजार जवळ येणार नाहीत.

–    कारलं खाल्ल्याने रक्ताचं शुद्धीकरण होतं. त्यामुळे चेहर्‍यावरील डाग, मुरुमं तसंच त्वचेचा संसर्ग यांसारख्या समस्या सतावत नाहीत. यासाठी रोज रिकाम्या पोटी कारल्याच्या रसामध्ये लिंबाचा रस मिसळून प्या.

–    ज्या व्यक्तींना यकृताचा त्रास आहे, त्यांनी रोज एक ग्लास कारल्याचा रस प्यावा. एका आठवड्यात फरक दिसून येतो.

–    कोणतंही इन्फेक्शन होऊ नये, यासाठी कारलं किंवा कारल्याची पानं पाण्यामध्ये उकळून, ते पाणी प्यावं. यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

–    कारलं फायबरने परिपूर्ण असतं, त्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. अपचन व बद्धकोष्ठता यांसारखे त्रास होत नाहीत.

–    कारल्यामधील अँटी-ऑक्सिडंटच्या गुणामुळे शरीराची चयापचय आणि पचन क्रिया सुधारते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. 

स्वादिष्ट कारलं

कारलं जरी कडू असलं तरी कारल्याचे मसालेदार पदार्थ मात्र स्वादिष्ट होतात. करून बघा.

Benefits of bitter gourd

कारलं फ्राय

साहित्य: 300 गॅ्रम कारली, 2-3 टेबलस्पून मोहरीचं तेल, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून जिरं, दीड टीस्पून धणे पूड, दीड टीस्पून बडीशेप पूड, अर्धा टीस्पून आमचूर पूड, 4-5 हिरव्या मिरच्या दोन भाग केलेल्या, स्वादानुसार मीठ.

कृती: कारली स्वच्छ धुऊन गोलाकार चिरा. आता एका कढईमध्ये तेल गरम करून, त्यात हिंग आणि जिरं घाला. जिरं तडतडलं की, त्यात धणे पूड, बडीशेप पूड आणि हळद घालून चांगलं परता. मग त्यात हिरव्या मिरच्या, कारली आणि आमचूर पूड घाला. नीट एकत्र करून मंद आचेवर 3-4 मिनिटं झाकण लावून वाफ काढून घ्या. कारली नरम झाली की, आच मोठी करून दोन मिनिटं चांगलं ढवळा. हे कारलं फ्राय तुम्ही चपाती, पराठा किंवा भात-डाळ यांसोबतही खाऊ शकता. हे दोन-तीन दिवस टिकतं, त्यामुळे प्रवासाला जाताना सोबत घेणयासाठीही चांगला पर्याय आहे.

कारल्याची भाजी

साहित्य: 250 ग्रॅम कारली, 1 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून हळद, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून दाण्याचं कूट, अर्धा टीस्पून खवलेलं खोबरं, अर्धा टीस्पून आमचूर पूड, 1 टीस्पून साखर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती: कारली स्वच्छ धुऊन, सालीसकट गोलाकार चिरा. त्यावर मीठ घालून अर्धा तास बाजूला ठेवा. नंतर ती चांगली मळून घ्या. यामुळे कारल्यातील कडवटपणा कमी होतो. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात कारली चांगली भाजून घ्या. नंतर त्यात हळद आणि मीठ घाला. कारलं थोडं शिजलं की, त्यात दाण्याचं कूट, खवलेलं खोबरं, आमचूर पूड आणि साखर घालून, झाकण ठेवून तीन-चार मिनिटं शिजू द्या. भाजी शिजल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि गरमागरम चपातीसोबत सर्व्ह करा.