निवृत्तीनाथांना अनाथ न करणारी अर्थयोजना (Benefi...

निवृत्तीनाथांना अनाथ न करणारी अर्थयोजना (Beneficiary Saving Schemes For Retired Personnel)

पेन्शन अर्थात् सेवा निवृत्ती वेतन हा पेन्शनरांना मोठा आधार असतो. नोकरीत असताना दरमहा मिळणार्‍या वेतनापेक्षा पेन्शन कमी मिळत असली तरी उतारवयातील गरजांचा विचार करता, ती दैनंदिन खर्चाला पुरते; असा सर्वसाधारण अनुभव आहे. सरकारी नोकरीत असणार्‍यांना सरकारतर्फे या पेन्शनीची तरतूद करून दिली जाते. परंतु, खासगी नोकरीत असणार्‍यांना ती स्वतःच करावी लागते. तेव्हा अशा लोकांसाठी किंवा ज्यांना पेन्शन मिळते, त्यांना दरमहा जादा निश्‍चित रक्कम मिळविण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना
सरकारी पोस्ट खाते व खासगी बँका यांच्यामार्फत ही सिनिअर सिटीझन सेव्हींग स्कीम राबविली जाते. 60 वर्षावरील नागरिक याचा फायदा घेऊ शकतात. या योजनेत आपण 15 लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवू शकतो. 5 वर्षांसाठी ही रक्कम ठेवायची असते. आपण जी रक्कम गुंतवाल, त्यावर दर 3 महिन्यांनी व्याज मिळते. व्याजाचे दर जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होतात. हे बदलू शकतात. मात्र तशी घोषणा सरकार करते. 1 एप्रिल 2020 पासून हा व्याजदर 7.40 टक्के झालेला आहे. म्हणजे आपल्याला 3 महिन्यांच्या अंतराने, आपल्या पैशांवर व्याजरुपाने पेन्शन मिळते.
बँकेत आपण एफ.डी. ठेवतो, साधारणपणे त्याचेच नियम या योजनेस लागू आहेत. म्हणजे इन्कम टॅक्स कायद्याच्या 80 सी कलमानुसार, या योजनेत गुंतवलेली 1.50 लाखापर्यंतची रक्कम वजावटीस पात्र आहे. मात्र त्यावर मिळणारे, मर्यादेबाहेरील व्याज करपात्र आहे. शिवाय 15 जी फॉर्म देऊन टीडीएस न कापण्याची सूचना देता येते. गुंतवणुकीची कमाल मर्यादा 5 वर्षे आहे. काही कारणांनी ती आधी बंद केल्यास गुंतवणुकीच्या दीड टक्के दंड घेतला जातो.


मासिक उत्पन्न योजना
वरील योजनेत 3 महिन्यातून एकदा व्याज मिळते. परंतु दरमहा उत्पन्न देणारी एक योजना आपल्या पोस्ट ऑफिसमार्फत चालवली जाते. 60 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना पोस्ट खात्याच्या या मन्थली इन्कम स्कीममध्ये साडेचार लाख रुपये गुंतविता येतात. यावर दरमहा 6.80 टक्के व्याज मिळते ही केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याची योजना असल्याने 100 टक्के सुरक्षित आहे

पंतप्रधान वय वंदन योजना
ही पण सरकारी योजना आहे. जी आयुर्विमा महामंडळातर्फे (एलआयसी) चालवली जाते. 60 वर्षाहून अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक यामध्ये 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. गुंतवलेल्या रकमेवर 7.40 टक्के परतावा दिला जातो. मात्र या योजनेत 10 वर्षे ही गुंतवणुकीची मुदत आहे. समजा 15 लाख रुपये गुंतविले तर दरमहा 9,250 रुपये पेन्शन सारखी रक्कम मिळू शकते. ही पेन्शन दरमहा किंवा तिमाही, सहामाही, वार्षिक अशा मुदतीची पण घेता येते. या पेन्शनवर टीडीएस कापला जात नाही. 10 वर्षे मुदत असली तरी गरज लागल्यास ती मुदतीआधी बंद करता येते. मात्र त्यावर गुंतवलेल्या रकमेच्या 2 टक्के दंड आकारला जातो. देशव्यापी एलआयसीची ही योजना असल्याने 100 टक्के सुरक्षित आहे.


निवृत्तीनंतर शिल्लक रजा वेतन, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी याद्वारे बरीच रक्कम हाती येत असते. हे पैसे बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटला ठेवून त्यावर व्याज मिळविण्याकडे बव्हंशी निवृत्तीनाथांचा कल असतो. त्यात थोडीफार रक्कम ठेवून इतर योग्य रक्कम वर दिलेल्या योजनांमध्ये गुंतवायला हरकत नाही. म्हणजे घरखर्चाला, स्वखर्चाला हातभार लावणार्‍या पेन्शन सोबतच हे मासिक पेन्शन मिळू शकते. मोठ्या राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा सहकारी बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवले तर व्याज जास्त मिळते. म्हणून काही लोक तिकडे वळतात. परंतु, आजकाल सहकारी बँकांमध्ये अफरातफरीचे प्रकार जास्त प्रमाणात आढळून येत असल्याने त्या लिक्विडेशनमध्ये गेल्या आहेत. बँका बंद पडल्याची उदाहरणे आहेत. सी.के.पी. सहकारी बँकेला तर 100 वर्षांची परंपरा असून ती नादान, भ्रष्टाचारी संचालकांमुळे बुडीत खात्यात गेली आहे. तेव्हा आयुष्यभर कष्ट करून साठवलेला पैसा कमी जोखीम असलेल्या योजनेत, सावधगिरी बाळगून गुंतविणे योग्य ठरेल.