बेडरुम लावणी : मराठी सिनेमात नवा प्रयोग (Bed Ro...

बेडरुम लावणी : मराठी सिनेमात नवा प्रयोग (Bed Room Lavani : New Style Of Lavani In Marathi Cinema)

‘लावणी’ महाराष्ट्राच्या लोककलेतील एक महत्वाचा भाग. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनीच भल्या मोठ्या रंगमंचावर लावणी सादर करताना पाहिलंय, अगदी चित्रपटात सुद्धा असंच काहीसं आपण पाहिलं असेल. आता मात्र आपण हीच लावणी एका ‘बेडरूम’ मध्ये साकार होत असताना बघणार आहोत. ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ या चित्रपटाच्या निमित्ताने फुलवा खामकर हीने अत्तराचा फाया ही लावणी एका छोट्या बेडरूममध्ये बसवली आहे. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या अभिनयाने सज्ज अशा या चित्रपटात ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेची प्रमुख अभिनेत्री योगिता चव्हाण ‘अत्तराचा फाया’ ही लावणी सादर करत आहे.

या चित्रपटाचा नायक अंकुश चौधरी साकारत असलेल्या ‘वासू’ला आपल्या मोहक अदांनी योगिता काबीज करू पाहत आहे. या लावणीचे नृत्यदिग्दर्शन करणारी फुलवा खामकर म्हणते, “आपण नेहमीच काही ना काही वेगळं करायच्या विचारात असताना अनेकवेळा आपण नेहमीच्याच गोष्टी करून बसतो, पण या लॉकडाऊनमध्ये मी खरंच काहीतरी वेगळं केलं; ते म्हणजे ही बेडरूम लावणी. पहिल्या लॉकडाऊननंतर माझं हे पहिलंच काम होतं. ही लावणी चित्रपटामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावते हे मला चित्रपटाची कथा ऐकून कळलं होतं. मग तिची चित्रपटातील मांडणीसुद्धा तशीच असावी, त्याचबरोबर चित्रपटाच्या कथेला तिचा हातभार लागणार होता म्हणून आपण तिला न्याय देणं गरजेचं आहे हे मी समजून होते.”

पुढे ती म्हणते, “चित्रपटाची कथा एकाच घरात घडत आहे. त्यामुळे ही लावणीसुद्धा घरातच हवी हे मी ओळखलं होतं. मग ती एकाच खोलीत साकारायची आम्ही ठरवलं. या लावणीचं दिग्दर्शन करताना संपूर्ण खोलीचं मोजमाप घेऊन ठेवलं होतं. सुरुवात, मध्य आणि शेवट कुठे करायचं हे ठरवल्यानंतर योगिताचं विशेष योगदान म्हणावं लागेलं या लावणीसाठी की, तिने उत्तम पद्धतीने कमी जागेत लावणी साकारली. या नृत्याचं दिग्दर्शन करत असताना गाण्याच्या बोलाला साजेशा असेच हालचाली आम्ही दिल्या.”

अत्तराचा फाया गाण्याचे बोल आणि योगिताची नृत्य शैली या गाण्याच्या मोहात पाडते. या गाण्याचे बोल रवींद्र मठाधिकारी यांनी लिहिले असून मैथिली जोशी यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध झाले आहे आणि ह्याचे संगीत अविनाश विश्वजित यांचे आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून अंकुश आणि प्राजक्ताला एकत्र पाहण्यास प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार, अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची आहे. केतन महांबरे आणि रवी थोपटे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मितीची धुरा स्मिता खरात यांनी सांभाळली आहे. तर चित्रपटाचं छायाचित्रण दिग्दर्शन धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे तर संकलन परेश मांजरेकर यांचे आहे. चित्रपटाचे लेखन रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजित यांचं आहे तर चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.