गुलाबी थंडीत सौंदर्य कसे खुलवावे? (Beauty Care ...

गुलाबी थंडीत सौंदर्य कसे खुलवावे? (Beauty Care Tips In Winter Season)

थंडीच्या दिवसांतील वातावरण मनाला अतिशय आल्हाददायक वाटते. अंगाला झोंबणारा थंडगार वारा शहारे आणतो, तरीही तो आपल्याला हवाहवासा वाटतो. थंडीच्या दिवसांची चाहूल लागताच पहिला मोठा सण येतो दिवाळी, त्या मागोमाग लग्नसराईचा मौसम सुरू होतो. अर्थात या सगळ्यासाठी नटणं, मुरडणं, सजणं आलंच. आणि हे सगळं मेकअपशिवाय शक्य होणे नाही. हिवाळ्यातील गुलाबी थंडी कितीही आवडली तरी या दिवसांत त्वचा हमखास कोरडी पडते. त्यामुळे मेकअप करताना त्वचेची थोडी काळजी घेतल्यास तसेच सौंदर्यप्रसाधनांचा योग्य वापर केल्यास आपलं सौंदर्य अधिक खुलून येण्यास मदत होते.

थंडीच्या दिवसात मेकअपची सुरुवात कशी करावी?
–    मेकअप करण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ करून घ्या. म्हणजे चेहर्‍यावरील मृत त्वचा पूर्णपणे निघून जाईल आणि चेहरा नितळ दिसेल. हे करताना लक्षात ठेवायचं की कोरड्या त्वचेस साबण वापरायचा नाही. साबणामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेलही निघून जाईल आणि चेहरा अधिकच कोरडा होईल. तेव्हा चेहरा स्वच्छ करण्यासाठी सौम्य फेसवॉशचा वापर करा.
–   कोरड्या त्वचेवर मेकअप करताना आधी चेहर्‍यास 4 ते 5 मिनिटं मॉइश्चरायजरने मॉइश्चराइज करा. असे केल्याने त्वचा ओलसर आणि मुलायम होईल.
–    कोरड्या त्वचेसाठी लिक्विड वा क्रीमी कन्सीलर वापरा. चेहर्‍यावरील डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळं, पिंपल्स लपवण्यासाठी कंसीलरचा वापर केला जातो. मेकअप करताना लाइट शेडच्या फाउंडेशनचे कंसीलर वापरा.
–    मेकअपचा बेस अर्थात फाउंडेशन वापरतानाही कोरड्या त्वचेसाठी क्रीमी किंवा ऑईल बेस्ड फाउंडेशन वापरा. त्यामुळे ग्लोइंग त्वचा मिळेल.
–    कोरड्या त्वचेवर आय मेकअप करताना नेहमी क्रीमी आयशॅडोजचा वापर करा. पावडर बेस्ड आयशॅडोपेक्षा क्रीमी आयशॅडोज जास्त चांगला लूक देतात.
–   तसेच आय मेकअप करताना पेन्सिल आयलायनर किंवा काजळ न वापरता लिक्विड आयलायनर वापरा. हे जास्त उठून दिसते.
–   कोरड्या त्वचेस ब्लशर वापरतानाही ते क्रीमी वा जेल स्वरूपातील असावे. त्यामुळे चेहर्‍यास चमक येते.
–    लिप मेकअप करताना ग्लॉसी लिपस्टिकचा वापर करा. ग्लॉसी लिपस्टिकमुळे ओठ कोरडे दिसणार नाहीत. तुम्ही ओठांसाठी नुसतंच लिप ग्लॉस किंवा लिप बामही वापरू शकता.

लक्षात ठेवा.
–    हिवाळ्यात मेकअप करण्यापूर्वी चेहर्‍यास व्यवस्थित मॉइश्चराइज करून मुलायम बनवा.
–    वॉटर बेस्ड किंवा ऑईल बेस्ड मेकअप प्रोडक्टचा वापर करा.
–    मॅट, पावडर व ऑईल फ्री मेकअप प्रोडक्ट चुकूनही वापरू नका. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहर्‍यास टाल्कम पावडर लावू नका. त्यामुळे त्वचा आणखी कोरडी होईल.