बाधणार्‍या उन्हाळ्यासाठी सब्जा (Beat The Summer...

बाधणार्‍या उन्हाळ्यासाठी सब्जा (Beat The Summer Heat With Sabja)

जगभरामध्ये सब्जा ही वनस्पती आणि विशेषतः तिचं बी औषधी म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. बाधणार्‍या उन्हाळ्यासाठी सब्जा ही संजीवनी आहे.
अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरू झाला आहे. सकाळचं कोवळं ऊनही आता बोचरं झालं आहे. या उष्ण आणि दमट वातावरणामध्ये बर्‍याच मंडळींना ऊन बाधतं आणि विविध उष्णताजन्य विकार त्रस्त करू लागतात. जसं- मूत्रविसर्जन किंवा मलविसर्जन करताना दाह किंवा वेदना होणं, अंगावर पित्त उठणं, तोंड येणं, त्वचेवर उष्णतेच्या पीटिका येणं, नाकातून किंवा गुदावाटे रक्त पडणं वगैरे. या सर्व तक्रारींना प्रतिबंध म्हणून, तसंच अगदी घरच्या घरी करण्याजोगा सुरक्षित उपचार म्हणजे, सब्जा.
सब्जा ही तुळशीच्या बीसारखीच एक लहानशी, तरीही तुळशीच्या बीपेक्षा किंचित मोठ्या आकाराची आणि काळसर-करड्या रंगाची बी असते. या बिया पाण्यामध्ये भिजवल्यावर फुगतात आणि पाणी शोषून पांढरट रंगाच्या आणि बुळबुळीत बनतात. भिजून फुगल्यानंतर या बिया पाण्यामधून, दुधातून किंवा सरबतातून घेतल्यास, ते सर्व प्रकारच्या उष्णताजन्य विकारांवर अतिशय गुणकारी ठरतं.

सब्जा बीचं सेवन कसं करावं?
या बिया चघळणं कठीण जातं, म्हणून त्या पाण्यात भिजवून ठेवून खाणं अधिक उत्तम आहे. या बियांचा लाभ घेण्यासाठी दररोज किमान दोन चमचा बियांचं सेवन करावं. तुम्ही एक कप गरम पाण्यात सुमारे 15 मिनिटं दोन चमचे सब्जा भिजवून ठेवा. या सुवासिक बियांची वेगळी अशी काही चव नाही. परंतु, पोषक असल्यामुळे या बिया विविध पेयांमध्ये वापरतात. सब्जाचं बी फालुद्यामध्येही मिसळलं जातं.

निरोगी त्वचा व केसांसाठी उपयुक्त

सब्जा बीचे फायदे
सब्जाच्या बिया शरीरातला थंडावा वाढवून उष्मा कमी करतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही जणांना वारंवार मूत्रमार्गाच्या जंतुसंसर्गाचा (युरिन इन्फेक्शनचा) त्रास होतो. अशा वेळी सब्जाच्या बिया सकाळ-सायंकाळ घेतल्यास आराम पडतो. व्यायाम, कसरती केल्यानंतर जाणवणारा थकवा कमी करण्यासाठी सब्जा प्या. यामुळे शरीरास ऊर्जा मिळते.
वजन कमी करण्यासाठीही सब्जा फायदेशीर ठरतो.
यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे अनावश्यक भूक लागत नाही. आपण या बिया दही किंवा फ्रुट सॅलेडमध्येही वापरू शकतो.
सब्जा बिया पोटातील जळजळ कमी करतात आणि शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकतात. तसंच शरीरातील एचसीएलचा आम्ल प्रभाव नाहीसा करून आराम देतात.
सब्जा आपल्या शरीराला नैसर्गिकरीत्या डिटॉक्स करतं. झोपायला जाण्यापूर्वी एक ग्लास दुधाबरोबर काही सब्जा बिया घ्याव्यात. हे पोट साफ करण्याचं काम करतं.
पूर्वीच्या काळी अपचनावर औषध म्हणून सब्जाचा वापर केला जात असे. बद्धकोष्ठावर, तसंच डायरिया झाल्यानंतर सब्जायुक्त औषधं वापरण्याची पद्धत होती.
सब्जा बीमध्ये अँटी-स्पास्मोडिकचा गुणधर्म आहे. त्यामुळे डांग्या खोकला कमी होण्यास मदत होते. तसंच शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते.
दक्षिण अमेरिकेत सब्जाला ‘चिया सिडस्’ असं म्हणतात आणि त्याचा वापर काही औषधांमध्ये केला जातो.
थायलंडमध्ये या बियांवर केल्या गेलेल्या एका संशोधनात सब्जाच्या सरबताचा उपयोग शरीरातील कॉलेस्टेरॉल कमी होण्यासाठी होऊ शकेल, असं दिसून आलं आहे.
मधुमेह प्रकार 2 साठीही सब्जा उपयुक्त मानला जातो. कारण तो शरीराचं चयापचय कमी करून कार्बोहायड्रेट्सचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्यास नियंत्रित करतो.
जावा, सुमात्रा, मलेशिया या देशांत सब्जाचा वापर स्वयंपाकामध्येही करतात. ते सब्जाचे बी वाळवून त्याची पूड करून ठेवतात. ही पूड निरनिराळ्या खाद्य पदार्थांत मिसळतात. त्यामुळे सब्जा शरीरात जाऊन रक्तप्रवाह वाढतो, असा त्यांचा विश्‍वास आहे.


सब्जा बी निरोगी त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त ठरतं. सब्जाच्या बिया बारीक करून खोबरेल तेलातून प्रभावित भागाला लावा. यामुळे एक्झिमा आणि सोरायसिससारखे त्वचाविकार बरे होण्यास मदत होते.
सब्जा बी हे लोह, जीवनसत्त्व के आणि प्रथिनं यांनी भरलेलं आहे. यातील खनिजं लांब आणि मजबूत केसांसाठी आवश्यक असतात. तर प्रथिनं व लोह केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात आणि केस दाट करतात.

सब्जा बी कोणी खाऊ नये?
लहान मुलं आणि गर्भवती महिलांनी सब्जा बी खाणं टाळावं. या बिया पाण्याबरोबर व्यवस्थित मिश्रित न झाल्यास लहान मुलांच्या गळ्यात अडकू शकतात, तर गर्भवती महिलांच्या बाबतीत, या बिया शरीरात इस्ट्रोजेनचं प्रमाण कमी करतात. सब्जा अपायकारक नाही, तरीही सब्जाचं सेवन करण्याआधी गरोदर स्त्रिया किंवा इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.