या 15 नियमांचं पालन, उन्हाचं करतील क्षालन! (Bea...

या 15 नियमांचं पालन, उन्हाचं करतील क्षालन! (Beat The Summer Heat And Remain Cool By Following These 15 Rules)

दिवसेंदिवस उन्हाळ्याचा दाह वाढतच चालला आहे. कडक उन्हामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत तर काही ठिकाणी उष्माघाताचे बळीही जाऊ लागले आहते. अशा परिस्थितीत स्वतःची नीट काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही नेहमीच्या वाटल्या तरी आवर्जून पाळाव्या अशा गोष्टी आम्ही सांगत आहोत. ज्या तुम्हाला तापत्या उन्हातही ठेवतील एकदम कूल.
*    सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवा. ते कमी होऊ देऊ नका. त्यासाठी भरपूर पाणी प्या. याशिवाय लिंबू पाणी, ताज्या फळांचा रस, नारळ पाणी, सूप इत्यादी पर्यायांचाही वापर करू शकता.

*    आहारात ताकाचा नेहमी समावेश ठेवा. त्याने शरीराला थंडावा मिळेल. लस्सी करून प्यायली तरी चालेल.
*    गरमीच्या दिवसांत शरीरास पित्ताचा त्रास होऊ लागतो. त्यासाठी सकाळीच थंड दूध प्या. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो चहा-कॉफी यांचे सेवन करणे टाळाच, कारण त्यामुळे शरीराला नुकसान पोहोचते.
*    सकाळी लवकर उठून हिरव्यागार गवतावरून चाला. सोबत एका बॉटलमध्ये लिंबाचे सरबत घ्या. त्यामुळे तात्काळ ऊर्जा मिळेल.

*    आहारात सॅलेड आणि फळांचा समावेश करा. फळं खाल्ल्याने आपली पचनशक्ती उत्तम राहते.
*    तेलकट आणि तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळा. जंक फूडपासूनही दूर राहा.
*    उन्हाळ्याच्या दिवसांत भरपूर घाम येतो. या घामाच्या दुर्गंधीपासून वाचण्यासाठी डिओ किंवा सुगंधित पावडरचा वापर करा. दिवसातून दोन वेळा आंघोळ केल्यास ताजेतवाने वाटेल.
*    दिवसभर काम केल्याने थकवा जाणवत असेल तर संध्याकाळी थंड पाण्यात पाय बुडवून ठेवा. त्याने पायांना आराम मिळेल.
*    दिवसा 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत सूर्याच्या अति नील किरणांचा प्रभाव अधिक असल्याने त्याने त्रास होऊ शकतो. तेव्हा शक्यतो घरातच राहा. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा.

*    उन्हाळ्यातही त्वचेस मॉइश्चरायजर लावण्यास विसरु नका. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायजर लावणे गरजेचे आहे.
*    या दिवसात मद्यपान करू नका. त्याने शरीर आतून शुष्क बनते आणि त्वचाही कोरडी होते.
*    हलका व्यायाम करा. योग वा प्राणायाम करु शकता, याने ऊर्जा मिळते. बराच वेळ वा घाईघाईने व्यायाम करणे टाळा कारण त्याने ऊर्जा लवकर कमी होते. घाम येत असल्याने शरीरातील पाणी कमी होते आणि आपल्याला थकवा येतो.

*    तहान भागविण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स नाही तर नैसर्गिक पेये प्या.
*    हलके, सैलसर आणि सुती कपडे वापरा. त्यामुळे त्वचेस व्यवस्थित श्वास घेता येईल.

*    घराबाहेर पडल्यास उन्हापासून बचावासाठी छत्री, गॉगल यांचा वापर करा. केसांना स्कार्फ बांधा. उन्हाने केसही कोरडे होतात. सोबत पाण्याची बाटली ठेवा.
*    हलका मेकअप करा. घाम आणि चेहर्‍यावरील अतिरिक्त तेल यासाठी ओले आणि सुके टिशू जवळ बाळगा.