तुमचं मूल खोटं बोलत असेल तर वेळीच सावध व्हा (Be...

तुमचं मूल खोटं बोलत असेल तर वेळीच सावध व्हा (Be Careful When Your Child Is A Liar)

Child Is A Liar

3-5 वर्षे या वयोगटात मुलं नकळत अगदी लहान सहाण खोटं बोलू लागतात. त्यामुळे कोणाला त्रास होईल असे नाही. पण नंतर हेच खोटे बोलणे गंभीर होऊ लागते. मुलांना वेळीच आवर न घातल्यास त्यांना खोटं बोलण्याची सवय लागते आणि मग त्यांचे खोटे बोलणे फार निरागस नसते.
अनेकदा पालक आपल्या मुलांच्या खोटं बोलण्याच्या सवयीमुळे त्रस्त असतात. मुलांनी ही वाईट सवय सोडावी यासाठी ते मुलांना ओरडतात, धमकावतात. परंतु, खरं म्हणजे धाक दाखवून, मारून-मुटकून मुलं ऐकत नाहीत, त्यांना समजावून सांगण्याची गरज असते. पालकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न केल्यास मुलांची ही सवय निश्चितच सोडवता येऊ शकते.
लहान मुलं खरंच फार गोड आणि निरागस असतात. पण एका ठरावीक वयानंतर त्यांच्यात होणारे बदल वेळीच लक्षात घ्यायला हवेत. म्हणजे 3-5 या वयोगटात ती नकळत अगदी लहान सहाण खोटं बोलू लागतात. त्यामुळे कोणाला त्रास होईल असे नाही. पण मी नाही ते खेळणं तोडलं, मी नाही केक खाल्ला किंवा हे मी केलं नाही. यासारख्या साध्या साध्या गोष्टीत ते खोटं बोलतात. सुरुवातीला आपल्याला त्याची गंमत वाटते. पण नंतर हेच खोटे बोलणे गंभीर होऊ लागते. 3-5 वर्षांची मुले त्यांना काही हवं असेल तरच खोटं बोलतात किंवा तुम्ही ओरडू, रागावू नये म्हणून ते अशी शक्कल लढवतात. तुम्ही त्यांचे खोटे बोलणे पकडल्यावर पालकत्वाच्या नात्याने त्यांना समजवता. प्रामाणिक राहण्याचा सल्ला देता. पण त्याचा फारसा परिणाम होत नाही.
मुलांना वेळीच आवर न घातल्यास त्यांना खोटं बोलण्याची सवय लागते. आणि मग त्यांचे खोटे बोलणे फार निरागस नसते. म्हणजे होमवर्क केला असे खोटे सांगणे, शाळेतल्या गोष्टी घरी न सांगणे किंवा लोकांबद्दल खोटे बोलणे. जर तुमचं मूल अशाप्रकारे खोटं बोलत असेल तर वेळीच सावध व्हा. मुलांची खोटं बोलण्याची ही सवय घालवण्याकरिता त्यांना मारून, त्यांना रागावून चालणार नाही तर त्यांच्याशी बोलून, त्यांना समजावून, ते का खोटं बोलतात हे समजून घेऊन त्यांच्या वर्तणुकीत बदल करा.

Child Is A Liar

मुलं खोटं बोलायला लागल्यावर काय करावे?
स्वतःची वर्तणूक तपासा
बरेचदा दैनंदिन जीवनात आपल्या नकळत आपण खोटे बोलतो. सर्वेक्षणानुसार दीड वर्षाच्या मुलालाही कळतं की आपले पालक आपल्याशी खोटं बोलतात. आपली मुलं आपलं निरीक्षण करत असतात. त्यातूनच ती शिकत असतात. याचं आपल्याला भान नसतं. ट्राफिक सिग्नल तोडणे, गॉसिपिंग करणे, मी घरी नाहीये असं मुलांना सांगायला लावणे अशा प्रकारचं खोटं आपण बोलत असतो. एवढंसं खोटं बोलून कोणाला काय त्रास होणारं आहे, असं म्हणत स्वतःची समजूत घालतो. परंतु मुलांना त्याविरुद्ध शिकवत असतो.
तुमच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवा
बरेचदा पालकांनी रागावू नये म्हणून मूल खोटं बोलतं. मुलाला खोटे बोलणे चुकीचे आहे किंवा ते का बोलू नये याची समज नसते. जर त्याच्या एखाद्या चुकीवर तुम्ही खूप जोरात ओरडलात किंवा रागावलात तर पुढच्या वेळी मुलाकडून एखादी चूक झाल्यास ते नक्कीच खोटं बोलेल.
स्पष्ट पण सौम्य शब्दात बोला
मुलांकडून चूक झाल्यावर त्यांना ओरडायचे, रागवायचे नाही तर काय करायचे? त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव कशी करून द्यायची? हा प्रश्‍न सर्वच पालकांना पडतो. यासाठी महत्त्वाचा नियम म्हणजे स्पष्ट पण सौम्य शब्दात बोला. तुम्हाला मुलाला काय शिकवायचे आहे, त्याबाबत स्पष्ट राहा आणि त्या शिकवणुकीत सातत्य पाळा. पण ते शिकवताना सौम्य शब्दांत बोला. त्यांना जवळ घेऊन समजवा की काय योग्य आहे काय अयोग्य. शिस्तीचे महत्त्व पटवून द्या.
मुलांना त्यांच्या कोणत्याही चुकीसाठी शिक्षा करण्यापूर्वी पालकांनी आधी स्वतःला तपासून पाहिले पाहिजे. जोपर्यंत पालक आपल्या चुका सुधारत नाहीत, तोपर्यंत मुलंही त्यांच्या चुका मान्य करणार नाहीत, हे पालकांनी चांगलंच लक्षात ठेवलं पाहिजे.