जपून राहा!… या सवयी अंगाशी येऊ शकतात! (Be...

जपून राहा!… या सवयी अंगाशी येऊ शकतात! (Be Careful :These Bad Habits May Land You In Trouble)

आजकालच्या धावपळीच्या, व्यस्त जीवनशैलीच्या युगात आपल्या अंगी काही वाईट सवयी लागल्या आहेत. शाळा-कॉलेज असो की, करिअर – ऑफिसचे काम असो; आपण शरीराकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत. काही वाईट सवयींचे आपण असे गुलाम झालो आहोत, ज्या आपल्याच अंगाशी येऊ शकतात. तेव्हा जपून राहा.

ठिय्या मारून बसणे
ऑफिसातील कामाचे तास किंवा घरून काम करण्याचे तास जास्तीत जास्त आठ तास असायला पाहिजे. पण आजकाल या दोन्ही ठिकाणी यापेक्षा जास्त तास काम पडते. त्यासाठी एकाच जागी ठिय्या मारून बसणे क्रमप्राप्त ठरते. संशोधकांनी असं मत मांडलं आहे की, सलग काही तास एकाच जागी बसून काम केल्याने आपल्या पाठीच्या कण्यावर 40 टक्के जास्त ताण पडतो. तो अतिशय हानिकारक असू शकतो. कधी कधी कामात आपण इतके मग्न होतो की, खाण्यापिण्याचे भान राहत नाही. त्यामुळे अ‍ॅसिडिटी, अपचन या समस्या उद्भवतातच, पण आपली मान आणि पाठ पुढे झुकते. बसण्याची स्थिती चुकीची होऊन बसते. अन् रात्री झोपतेवेळी किंवा पुढील काही दिवसात मान, पाठ आणि कंबर यांचे दुखणे सुरू होते. अन् वेदनेने ठणाणा करायची वेळ येते.
उपाय
*    तुम्ही कितीही कामात मग्न असलात तरी, आपली बसण्याची स्थिती नीट ठेवा. मान आणि पाठ पुढील बाजूस जास्त झुकणार नाही, याची काळजी घ्या.
*    अलिकडे जास्त करून काम कॉम्प्युटरवर करायचं असल्याने, खुर्चीवर पाठ ताठ टेकवू नका. किंवा जास्त झुकू नका.
*    तासन्तास बसून राहू नका. तासाभराने खुर्चीवरून उठा. पाय मोकळे करून या. नजर अन्य ठिकाणी वळवा. जमल्यास एखाद्या कोपर्‍यात किंवा जिन्यात जाऊन हात सरळ वर करून शरीराला ताण द्या.

व्यायाम न करणे
कित्येक डॉक्टर्स व संशोधकांनी वारंवार प्रतिपादन केलं आहे की, तुम्ही जर व्यायाम केला नाहीत, तर शरीराचे स्नायू आखडतात आणि वेदना होऊ लागतात. पण बव्हंशी लोक व्यायामाच्या बाबतीत आळस करतात. किंवा वेळ मिळत नाही, असे कारण दाखवतात. ही कारणे दूर ठेवून नियमितपणे व्यायाम करणे, आवश्यक असते. म्हणजे शरीरातील दुखणी दूर पळतील.
उपाय
*    मान, पाठ, पाय किंवा कंबर यांचे दुखणे लागले असेल तर अंथरुणावर पडून राहू नका. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. पण जोडीला झेपेल इतका व्यायाम करा. सगळ्यात सोपा म्हणजे चालण्याचा व्यायाम करा. त्यामुळे ताठर झालेले, दुखावलेले स्नायू मोकळे होतील. अन् वेदना कमी होतील.
*    व्यायामाचे अन्य प्रकार करून पाहायला हरकत नाही. कथ्थक, भरतनाट्यम् हे शास्त्रीय नृत्यप्रकार किंवा पाश्चात्य नृत्यप्रकार शिका किंवा मैदानी खेळात भाग घ्या. कबड्डी, खो-खो, क्रिकेट, बॅडमिंटन असे खेळ खेळा. त्याच्याने खूपच फायदा होईल.
*    सर्व प्रकारची दुखणी घालविण्यासाठी योगासने हा सर्वोत्तम व्यायाम होय. प्रशिक्षित शिक्षकाच्या योगसाधना वर्गात नाव नोंदवा आणि शरीर व मनाची तंदुरुस्ती राखा.

जंक फूड खाणे
बर्‍याच लोकांना घरच्या पौष्टिक, रुचकर खाद्यपदार्थांपेक्षा बाहेरील चटपटीत, पचायला जड खाद्यपदार्थ खाण्याची सवय असते. गरजेला, एखादवेळेस असे बाहेरचे पदार्थ खायला हरकत नाही. पण सदैव ते तळलेले, चमचमीत पदार्थ; जंक फूड खाण्याने पोटदुखी सुरू होते. पोट बिघडते, अ‍ॅसिडिटी होते. कधी कधी जुलाब सुरू होतात. पिझ्झा, बर्गर, पास्ता या पाश्चात्य पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात मैदा असतो. इतर पदार्थ प्रोसेस्ड फूड असतात किंवा त्यात टिकाऊपणा राहण्यासाठी रसायने मिसळली असतात. ती पोटाला व एकूणच शरीराला हानिकारक असतात.
उपाय
*    बाहरेच्या पदार्थांमध्ये जंक फूड अजिबात घेऊ नये. पोहे, उपमा, शिरा किंवा अन्य पचायला हलके पदार्थ देखील बाहेर मिळतात. ते खावेत. किंवा जंक फूड व तळलेले चमचमीत पदार्थ टाळून त्या जागी फळे, उकडलेल्या भाज्या, अंडी किंवा सुकामेवा खावा.
*    पांढरा ब्रेड खाण्याऐवजी ब्राऊन ब्रेड अथवा व्हिट ब्रेड खावा.

वजनी सामान उचलणे
संसाराचा भार वाहता वाहता, गृहोपयोगी वस्तुंचे वजन उचलणे; हे कित्येक गृहिणींच्या जणू अंगवळणी पडले आहे. भाजीपाला, किराणा सामान किंवा अन्य सामान खांद्यावर उचलून त्या आणतात. असं वजनी सामान वारंवार उचलण्याने पाठदुखी, कंबर व मान धरणे असे विकार जडू शकतात. तेव्हा ही कामे करण्याची सवय जर वेळीच आवरली नाही तर अंगाशी येऊ शकते. स्पॉन्डिलायटिस, मणक्याचे आजार निर्माण होऊ शकतात.
उपाय
*    एकतर आता सर्वच दुकानदार होम डिलिव्हरी देण्यास तत्पर असतात. त्यांची सेवा घ्या. किराणा सामान, भाजी यांची एकाच वेळी यादी करून ते सामान घरपोच मागवून घ्या. अन् आपल्या घराच्या जवळपास अशी सेवा मिळत नसेल तर एकाच वेळी जास्त वजनाचे सामान उचलू नका. आपल्या शरीराच्या वजनापेक्षा फक्त 10 टक्के वजनाएवढे सामान उचला. खांद्यावरील बॅगांची अदलाबदल करा.

जुन्या गाद्या वापरणे
कित्येक लोकांना असा अनुभव येतो की, सकाळी झोपून उठल्यावर पाठ किंवा कंबर दुखते. आपली झोप अपूर्ण झाली असेल किंवा झोपच लागली नसेल, असे तर्क मग त्यावर सुरू होतात. प्रत्यक्षात याचे कारण असते, ते आपण झोपतो, त्या जुन्या झालेल्या गाद्या किंवा मॅट्रेस. वर्षानुवर्षे त्यांचा वापर झाल्याने त्या एकतर पातळ झाल्या असतात किंवा उंचसखल झाल्या असतात. हे आपल्या दुखण्याचे कारण असते.
उपाय
*    या दुखण्याचा इलाज म्हणजे आपल्या जुन्या झालेल्या गाद्या अथवा मॅट्रेस बदलणे. दर 7 ते 8 वर्षांनी हा बदल केला पाहिजे. म्हणजे या समस्या येणार नाहीत.
*    नव्या गाद्या अथवा मॅट्रेस बनविताना ही पण काळजी घेतली पाहिजे की, त्या जास्त सॉफ्ट असू नये. किंवा हार्ड देखील असू नयेत. मध्यम स्वरुपाच्या असाव्यात. कारण अशा हार्ड गादीवर झोपण्याने पाठीच्या कण्यावर ताण पडतो. अन् कंबरेत दुखू लागते.

हाय हिल्स वापरणे
आजकाल तरुण मुलींमध्ये फारच हाय हिल्स चप्पल अथवा सॅन्डल्स् घालण्याची क्रेझ आहे. या हिल्समुळे आधुनिक फॅशन केल्याचे समाधान मिळत असले तरी शरीराचे दुखणे मात्र निर्माण होते. हे या वापरकर्त्या मुलींच्या लक्षात येत नाही. सतत हाय हिल्सचे चप्पल वा सॅन्डल्स् वापरल्याने पाय मुडपतात. कंबरेवर ताण पडतो. पाठीच्या कण्याचा ओळंबा बदलतो. त्याचा परिणाम कंबर व पाठ दुखण्यावर होतो. अगदी फ्लॅट पादत्राणे देखील हानी पोहचवू शकतात.
उपाय
यावर उपाय म्हणजे एकदम फ्लॅट वा अती हाय हिल्सची पादत्राणे घालणे बंद करा. मध्यम उंचीची पादत्राणे वापरा. हाय हिल्सची पादत्राणे क्वचित प्रसंगी, पार्टी – समारंभाला जायचं असेल तेव्हा वापरा. दररोज नाही. जास्त चालायचं असेल, तेव्हा तर हाय हिल्स अजिबात वापरू नका. मागे स्ट्रॅप असलेले फूटवेअर वापरणे जास्त हिताचे असते.