हक्काचे पैसे बेवारस होऊ नयेत म्हणून घेण्याची का...

हक्काचे पैसे बेवारस होऊ नयेत म्हणून घेण्याची काळजी (Be Careful Before Your Hard Earned Money Becomes A Dormant Account)

Dormant Account

आपण प्रत्येकाने आपली संपत्ती, मालमत्ता, पैशांचे व्यवहार पारदर्शी ठेवले पाहिजेत. आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती सर्व कुटुंबियांना विश्वासात घेऊन करून द्यावी. म्हणजे कष्टाने कमावलेला पैसा धूळ खात पडून राहणार नाही.

मध्यंतरी केंद्र सरकारने काही धक्कादायक आकडेवारी प्रसिद्ध केली होती. देशभरातील बँकांमध्ये कित्येक खाती अशी आहेत, ज्यांना कुणी वाली नाही. म्हणजे बचत, चालू किंवा मुदत ठेव खाती अशी आहेत की, वर्षानुवर्षे कुणीही ती चालवत नाही. (सुप्त खाते) बँकेच्या भाषेत त्याला ‘डॉर्मन्ट अकाऊंट’ असे म्हणतात. त्यामुळे त्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. म्हणजे किती कोटी? तर 18,381 कोटी रुपये या बँक खात्यांमध्ये न वापरता पडून आहेत.
कोट्यवधी बेनामी पैसे
इतकंच नव्हे तर 15,167 कोटी रुपये इन्शुरन्स कंपन्यांकडे देखील पडून आहेत. म्हणजे देय असून त्यावर कुणी हक्कच अद्याप सांगितलेला नाही. म्युच्युअल फंडाचीही तीच तर्‍हा आहे. 17,880 कोटी रुपये तिथे बेनामी पडून आहेत. भविष्य निर्वाह निधी हा कामगार-कर्मचार्‍यांच्या निवृत्ती पश्चात हक्काचा पैसा असतो. त्या विभागात देखील खातेदारांची अशीच बेफिकीरी (की नाइलाज?) दिसून येते आहे. कारण तिथेही तब्बल 26,497 कोटी रुपये बेनामी पडून आहेत. आयईपीएफ मध्ये 4100 कोटी रुपये पडून आहेत. हा सर्व रोखीचा मामला झाला. परंतु देशभरात रोख रक्कम, शेअर्स व स्थावर आणि जंगम मालमत्ता यामध्ये गुंतवणूकदारांचे 82 हजार कोटी रुपये बेनामी पडून आहेत.
वरील आकडेवारी छाती दडपायला लावणारी आहे. कारण या पैशांचा विनियोग झाला तर लोकांचेच काय, पण देशाचेही अर्थकारण व राहणीमान उंचावेल. कारण हा सर्व पैसा नागरिकांचा आहे. नागरिकांनी गुंतवलेला आहे. आता मात्र तो कुजतो आहे.
जबाबदार कोण?
या सर्व कोटीच्या कोटी रुपयांना गंज चढण्यास संबंधित नागरिक, खातेदार जबाबदार आहेत. कित्येक एकापेक्षा जास्त बँकांमध्ये पैसे ठेवतात. एकापेक्षा अनेक योजनांमध्ये पैसे गुंतवतात. काळाच्या ओघात किंवा आजारपणामुळे अन् मृत्यू आल्याने ती खाती वापरली जात नाहीत. अन्यही बरीच कारणे याला जबाबदार आहेत. कधी परदेशात स्थायिक होणे किंवा जॉईंट अकाऊंट असतो. अन् पती-पत्नी विभक्त होतात किंवा कर्ता पुरुष मरतो नि त्याचा वारस असलेली व्यक्ती या खात्याकडे दुर्लक्ष करते. कधी आळस तर कधी कायद्याच्या कचाट्यात ही खाती अडकतात. अन् कोटीच्या कोटी रुपये अशा रीतीने बेनामी पडून राहतात. या बेफिकीरी किंवा आळशी वृत्तीने त्या व्यक्तीचे नुकसान तर होतेच, पण देशाचीही अपरिमित हानी होते.
या गोष्टी टाळण्यासाठी आपण प्रत्येकाने आपली संपत्ती, मालमत्ता, पैशांचे व्यवहार पारदर्शी ठेवले पाहिजेत. आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली पाहिजे. काही लोक लपवाछपवीचे व्यवहार करतात. तसे आपण करू नयेत. आपण सर्व कुटुंबियांना विश्वासात घेऊन त्यांना आपल्या व्यवहारांची माहिती करून द्यावी. म्हणजे कष्टाने कमावलेला पैसा असा धूळ खात पडून राहणार नाही. आपला पैसा बेवारस अथवा बेनामी पडून राहणार नाही.
नोंदी करून ठेवा

Dormant Account


यासाठी एक डायरी तयार करावी. त्यामध्ये आपली गुंतवणूक कसकशी केली आहे, त्याच्या नोंदी कराव्या. म्हणजे बँक खाते क्रमांक, बँक लॉकर क्रमांक, मुदत ठेव रक्कम आणि त्यांचा तपशील. इन्शुरन्स पॉलिसी, हेल्थ पॉलिसी यांचा तपशील व असल्यास म्युच्युअल फंडाचा तपशील नोंदवून ठेवावा. सर्व खात्यांचे नॉमिनी द्यावे. एकापेक्षा अधिक नॉमिनीज् नोंदवावेत व त्याची माहिती त्या त्या व्यक्तीला द्यावी. एकापेक्षा अधिक बँकांमध्ये खाती ठेवू नयेत. काही विशिष्ट कारण असेल तर केवळ दोन बँकांची मर्यादा ठेवावी. याच डायरीत आपले इन्शुरन्स एजंट, टॅक्स कन्सल्टंट, स्टॉक ब्रोकर, फॅमिली डॉक्टर, यांचे नाव, पत्ते व संपर्क क्रमांक लिहून ठेवावेत. आता सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने डायरी ऐवजी आपला कम्प्यूटर किंवा लॅपटॉपमध्ये ही माहिती भरून ठेवावी. आपल्या गैरहजेरीत, आपल्या पत्नीला, मुलांना किंवा वारसाला ते सहज उपलब्ध होतील, अशा रितीने ही माहिती संग्रहित करून ठेवावी. आपली शेअर्स, बॉण्डस्, डिबेंचर्स मधील गुंतवणुकीचे तपशील देखील नोंदवून ठेवावे. प्रॉव्हिडंट फंड खाते, पेन्शन खाते यांचे नंबर्स तपशील न चुकता ठेवावेत.
घरातील लोकांना माहिती द्या
पुष्कळ प्रकरणांमध्ये असं आढळून आलं आहे की, मूळ गुंतवणुकदारांचे हे व्यवहार, त्याच्या मृत्युनंतर, तपशील माहीत नसल्याने वारसदारांना क्लेम करता आलेले नाहीत. तर काही बाबतीत मूळ मालकाचे आधार कार्ड, पॅन कार्ड अथवा पासपोर्ट न मिळाल्याने किंवा त्यांचे ज्ञात नसल्याने, त्याच्या पश्चात क्लेम करता आलेले नाहीत. या बरोबरच जन्माचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, लग्नाचे प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र, घराचे करारपत्र इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे एका ठिकाणी व्यवस्थित ठेवून त्याची माहिती घरातील सगळ्यांना किंवा ज्या व्यक्तीवर विश्वास असेल, त्याला द्यावी. या सर्व मालमत्तेचा गोषवारा मृत्युपत्र किंवा आपल्या हयातीत देखील आपले कष्टाचे पैसे बेवारस पडून राहणार नाहीत.