‘गॉडफादर’ प्रदर्शनाची पन्नाशी : बॉल...

‘गॉडफादर’ प्रदर्शनाची पन्नाशी : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप व राम गोपाल वर्मा यांनी प्रकट केल्या भावना (Ballywood Directors Anurag Kashyap And Ram Gopal Verma Express Their Gratitude Towards Hollywood Block Buster “Godfather’ On Its 50 Years Of Release)

हॉलिवूडच्या चित्रपटांना वेगळे वळण देणारा व कित्येक चित्रपटकर्मींचा अविरत प्रेरणा स्रोत ठरलेला ‘गॉडफादर’ हा अप्रतिम चित्रपट आज त्याच्या प्रदर्शनाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. १४ मार्च १९७२ रोजी या चित्रपटाचा प्रिमियर संपन्न झाला होता. आज त्याला ५० वर्षे होत आहेत.

मारियो पुझो यांच्या विक्रमी खपाच्या कादंबरी वरून तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांनी केले होते व डॉन कार्लियानीची प्रमुख भूमिका मार्लन ब्रँडो यांनी साकार केली होती.

गुन्हेगारी विश्वाचे सखोल चित्रण करणाऱ्या या चित्रपटामध्ये इटालियन माफियांच्या कारनाम्यांचे प्रकटन आहे. या चित्रपटाने माफिया हा शब्द रूढ केला व कित्येक चित्रकर्मींना त्याने मोठी प्रेरणा दिली.
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी एका वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या लेखातून कबुली दिली आहे की, ‘गॉडफादर’चा माझ्यावर झालेला परिणाम इतका मोठा होता की, चित्रपटातून कथा सांगण्याची प्रेरणा मला यातून मिळाली ही एक अत्यंत ताकदीने तयार केलेली व मांडण्यात आलेली कलाकृती आहे.
राम गोपाल  वर्मा यांनी देखील याच वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, “कथा सांगण्यात मला जो रस निर्माण झाला तो ‘द गॉडफादर’ हे पुस्तक व त्यावरील चित्रपटामुळेच! मी जेव्हा दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा मी अनेकदा ‘गॉडफादर’, त्यातील दृश्ये, संवाद किंवा एखाद दुसरा क्षण हा संदर्भ म्हणून वापरला आहे. वापरतो आहे.”

‘गॉडफादर’ ही अत्यंत क्रूर, गुंड व माफियांना मानवी चेहरा देणारी पहिलीच फिल्म असावी. या चित्रपटातील प्रत्येक पत्रावर एकेक स्वतंत्र चित्रपट तयार केला जाऊ शकतो….” असेही वर्मा म्हणतात.
अभिनेता-दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी देखील हा चित्रपट म्हणजे अभिनयाची पाठशाळा, असल्याचे आपल्या लेखात म्हटले आहे. अन त्यातल्या सर्व कलावंतांनी अभिनयातील जी सहजता दाखवली आहे, तो आजही समस्त कलावंतांसाठी वस्तुपाठ ठरावा, असं प्रतिपादन केलं आहे. ‘गॉडफादर’, पन्नाशीत पोहचला असून येणाऱ्या ५० पिढयांवर हा आपलं गारुड सुरूच ठेवणार…  असेही देशपांडे म्हणतात.