हर हर महादेव मधील सळसळत्या ऊर्जने भरलेलं ‘...

हर हर महादेव मधील सळसळत्या ऊर्जने भरलेलं ‘बाजी रं बाजी रं’ गाणं प्रदर्शित (‘Baji Re Baji Re’ Is The Dynamic Song From Historical Film ‘Har Har Mahadev’ Glorifying The Greatness Of Warrior Bajiprabhu Deshpande)

हर हर महादेव ही शिवगर्जना सध्या सर्वत्र दुमदुमत आहे. यासाठी कारणही तसं विशेषच आहे ते म्हणजे झी स्टुडियोजची निर्मिती आणि प्रस्तुती असलेला आगामी ‘हर हर महादेव’ हा चित्रपट. या चित्रपटाच्या टिझरने आणि ट्रेलरने यापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आता यातील गाणीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरप्रमाणेच या गाण्यांमधूनही रोमहर्षक असाच अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. यातील वाह रे शिवा हे गाण्याचा यापूर्वीच विविध म्युझीकल ॲप्सवर चार्टबस्टर लिस्टमध्ये समावेश झाला आहे. युट्युबवरही हे गाणे लाखो प्रेक्षकांनी बघितले असून त्याला आपल्या पसंतीची पावती देत भरभरून प्रतिक्रियाही दिल्या आहेत. या गाण्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ‘बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं’ हे गाणं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या शिलेदार वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बाणेदार व्यक्तिमत्वाची आणि पराक्रमाची महती सांगणारं हे गाणं आहे. मंदार चोळकर यांचे धारदार शब्द असलेल्या या गाण्याला संगीत दिलं आहे हितेश मोडक यांनी तर आपल्या बुलंद आवाजाने ते सजवलं आहे मनिष राजगिरे या गायकाने. अभिनेते शरद केळकर हे या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत असून हे गाणं त्यांच्यावरच चित्रीत झालं आहे. अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला ‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून झी स्टुडियोजच्या माध्यमातून भारतभरात प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटाला अधिक धारदार आणि भरजरी बनवतात ती त्या चित्रपटातील गाणी. ‘हर हर महादेव’ चित्रपटातील गाणीही याला अपवाद नाहीयेत. बाजी रं बाजी रं हे गाणंही असंच सळसळतं आणि नवी उर्जा निर्माण करणारं झालं आहे.

छाताडाचा कोट करून रणी उभा

संहाराचा रंग चढे दाही दिशा

बाजी रं बाजी रं झुंजार बाजी रं

बाजी रं बाजी रं अंगार बाजी रं अशा जबरदस्त शब्दांत गीतकार मंदार चोळकर यांनी बाजीप्रभूंचं वर्णन यात केलं आहे. पारंपरिक वाद्यांसह आधुनिक वाद्यांचा मेळ असणारं हे गाणं संगीतप्रेमी आणि शिवप्रेमींची मने जिंकेल असा विश्वास संगीतकार हितेश मोडक यांनी व्यक्त केला.