मालिकेतील मल्लिका (Bad Portrayal Of Woman Chara...

मालिकेतील मल्लिका (Bad Portrayal Of Woman Characters In T.V. Serials)

मालिकेतील मल्लिका

खरं म्हणजे घरी असणार्‍या गृहिणींच्या मनोरंजनाच्या दृष्टीने त्यांची आवड लक्षात घेऊन, त्या पठडीतल्या मालिका प्रत्येक चॅनेलोचॅनली दाखवल्या जात आहेत. परंतु, एकंदरच या मालिकांमधील मल्लिका पाहिल्या तर मनोरंजनाचा भाग सोडून, त्यामधील इतर गोष्टींचाच जास्त प्रभाव आपल्या प्रेक्षकांवर असल्याचं चित्र दिसत आहे.

1972 साली आपल्याकडे दूरदर्शन सुरू झालं. त्यावेळेस मोजक्याच वाहिन्या होत्या आणि ठरावीक कार्यक्रम ठरावीक वेळीच दाखवले जायचे. हळूहळू दूरदर्शनची लोकांना चटक लागली आणि निर्मात्यांना सुगीचे दिवस आले. प्रेक्षक मुठीत आलेले पाहताच अगणित वाहिन्या सुरू झाल्या. टी.व्ही. मालिकांचं नवं युग सुरू झालं. बघता बघता हिंदी, मराठी, गुजराती अशा वेगवेगळ्या भाषेतून प्रसारित होणार्‍या या मालिका रोजच्या जीवनाचा एक भाग बनल्या.

सूडबुद्धीचा खेळ सारा
जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी किंवा सहज विरंगुळा किंवा निखळ मनोरंजनासाठी टी.व्ही. लावावा, तर मालिकेतल्या नकारात्मक गोष्टीच नजरेस पडतात. संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस एखादी मालिका लावावी अन् त्यामध्ये रडारड, भांडणं नजरेस पडतात. नाहीतर मग कुणाचं तरी निधन झालेलं पाहण्यास मिळतं. मालिकेत पात्राचं निधनही साजरं होतं. पांढर्‍या शुभ्र कपड्यात वावरणारी माणसं; परंतु चेहर्‍यावर मात्र काळे कुचकट भाव!
आपल्या संस्कृतीत स्त्रीला आदराचं स्थान आहे. तिथे ती क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. अन् इथे मालिकेमध्ये मात्र ती प्रत्येक वेळी सूडबुद्धीने पेटलेली असते. सतत विविध डावपेच आखत असते. विवाहबाह्य संबंध, विषप्रयोग करणारी, याचा काटा काढेन, त्याला रस्त्यावर आणेन, अमक्याला भिकेला लावेन, माझे पाय धरायला लावेन इत्यादी. नीतिमूल्यांचा त्यात लवलेशही नसतो. आपण एखाद्या व्यक्तीला फोन करताना खूप विचार करतो. परंतु, या मालिकेतील मल्लिका मात्र खुशाल, बिनधास्त एखाद्या दादाच्या, भाईच्या अड्ड्यावर फोन करून आपल्या शत्रूला खतम करण्याची किंवा त्रास देण्यासाठीची सुपारी देतात. पिस्तूल तर मोबाईल वापरावा तशी वापरतात. इथं पुरुष मात्र नावालाच! इतर पात्रांनी केलेले अन्याय उघड्या डोळ्यांनी बघत मूग गिळून गप्प बसलेले असतात. काय करणार बिच्चारे पुरुष! बहुतांश मालिकांमध्ये सगळा कारभार हा स्त्रियांकडेच असतो.

नायिकांविरुद्ध खलनायिका
मालिकेतील खलनायिका नेहमीच गडद साड्या अन् भडक मेकअपमध्ये असते. भरपूर दागिन्यांनी मढलेली, कपाळावर टिकल्यांचे विविध प्रकार, चेहर्‍यावर येणारी केसांची एखादी बट मुद्दाम मागे-पुढे उडवत राहते. काजळ भरलेले डोळे गरागरा फिरवते. तोंडावर गोड बोलून, मागून लोकांची निंदा करते. चोरून ऐकण्यात यांना खूप रस असतो. फरशीवर तेल किंवा साबणाचं पाणी सांडून आपल्या गरोदर सुनेला किंवा जावेला त्यावरून घसरवण्यात यांना फार धन्यता वाटते. कपटाचं राजकारण खेळण्यात भल्याभल्यांना पुरून उरेल अशी ही खलनायिका!
या उलट नायिका. चेहर्‍याने खूपच सोज्ज्वळ दाखवतात. तिचं बोलणं नाजूक, सावकाश, चालणंही तसंच. सतत आनंदी, हसत राहणं. रागावणं यांना माहीतच नसतं. नेहमी स्वतः पडतं घेणं, कामाचे डोंगर उपसणं, घळाघळा रडणं, व्रतवैकल्यं साग्रसंगीत पार पाडणं.
शिक्षित असून, नोकरी करूनसुद्धा विनाकारण स्वतःला कमी समजणं आणि खूप काही. विशेष म्हणजे, लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्याच बायका नखशिखांत नटलेल्या… अगदी झोपतानाही!

एकत्र राहून भांडू सारे
सासू-सून, नणंदा, जावा-जावा, भाऊ-भाऊ, पिता-पुत्र यांची सत्तेसाठी सतत भांडणं होत असतात. मग त्यातून खून, मारामार्‍या, व्यभिचार अशा कुकर्मांची यादी वाढत जाते. एकत्र कुटुंबपद्धती र्‍हास पावू नये याकरिता मुद्दाम एकत्र कुटुंबपद्धतीवर आधारलेल्या मालिका दाखवतात. पण यातही गंमत अशी आहे की, एकत्र कुटुंब म्हटलं की त्यात अनेक स्त्रिया आल्या. मग हवं ते दाखवायला भरपूर संधी. स्त्रीभोवती फिरणार्‍या या मालिका प्रत्यक्ष मालिकेत त्यांचा चांगुलपणा कमी आणि विद्रूपपणाच अधिक दाखवतात. सासू सहज आपल्या सुनेच्या थोबाडीत मारते, मग सून सर्वांदेखत सासूचा हात धरते, स्वतःच्या जावेवर हात उगारते…
आज बहुतांशी बायका नोकरीच्या निमित्तानं बारा-बारा तास घराबाहेर असतात. त्यांना घरातील धुणी-भांडी, स्वयंपाक, पोळ्या अशी कामं करायला बायकाच मदत करतात. बायका पाळणाघरं चालवतात. काही घरांमध्ये आजी-आजोबा आपल्या नातवंडांना सांभाळतात. मग एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीची शत्रू असते, असं दाखवण्यात या मालिकावाल्यांना जास्त रस का आहे?

टीआरपी रेटचा मामला
बर्‍याच वेळा मालिकेचं शीर्षकगीत हे स्त्री-शक्तीचा महिमा गाणारं हृदयस्पर्शी असतं. प्रत्यक्षात मात्र कपटी स्त्रीचं चित्रण जास्त दाखवलेलं असतं. अनैतिक संंबंधांना जास्त महत्त्व दिलं जातं. प्रत्येकाला दोन बायका, घरवाली आणि बाहरवाली. त्याशिवाय त्यांच्या मालिकेला चटपटीतपणाच येत नाही. सुरुवातीच्या 25-30 भागात सगळं छान चाललंय, मालिका छान आहे असं वाटतंय. आपण त्या मालिकेतील कुटुंबाचा एक भाग होऊन जातो. याहून कहर म्हणजे त्या मालिकेतील समस्यांवर आपण घरामध्ये चर्चा करू लागतो. आपापसात सल्लामसलत करतो. या पात्रांनी असं करायला हवं, असं वागायला हवं, असा विचार करू लागतो. इथपर्यंतची स्थिती आल्यानंतर मग दुसर्‍या चॅनेलपेक्षा किंवा दुसर्‍या मालिकेपेक्षा आपण सरस ठरावं, आपला टीआरपी वाढावा यासाठी चॅनेलवाल्यांच्या वेगळ्या करामती सुरू होतात. मग कारणाशिवाय प्रेक्षकांच्या आवडीच्या मालिकेतील नायकाचा अपघात घडवला जातो. एखाद्याला मारलं जातं, कुटुंबाला बेघर केलं जातं. नाहीतर एखाद्या प्रसिद्ध कलाकाराचं आगमन दाखवून कथेमध्ये ‘ट्विस्ट’ आणलं जातं.

टी.व्ही.चे दुष्परिणाम
काही स्त्रिया कितीतरी वेळ सलग टी.व्ही.समोर बसून असतात. मुलं स्वतःहून बोलवायला येत नाहीत, तोवर त्यांच्या हातून रिमोट सुटत नाही. मुलं काय नि वृद्ध काय, सगळेच मग जेवणाचं ताट घेऊन कार्यक्रम पाहत जेवतात. मालिका चालू असताना कोणाचं घरी येणंही यांना नको असतं. त्यांचं आतिथ्य जेवढ्यास तेवढं केलं जातं किंवा प्रसंगी टाळलंही जातं. अगत्यकर्मे ही एखादा महत्त्वाचा प्रसंग संपेपर्यंत दाबून ठेवली जातात. सलग एका जागेवर तासन्तास बसल्यामुळे लठ्ठपणा, डोळ्यांवर परिणाम होतो.
कुटुंबातील व्यक्तींंचा एकमेकांमधील संवादही या इडियट बॉक्समुळे कमी होत चाललेला आहे. मुलं निरागस असतात. विचित्र नातेसंबंध, गुंतागुंतीच्या भावभावना हे सगळं बघत असताना मुलं मनानं कधी प्रौढ होतात, हे आपल्याला कळतही नाही. त्यांच्यावर या मालिकांचा काय परिणाम होत असतो, हे कुणाच्या लक्षातही येत नसतं. पालकांनाही त्याची विशेष गरज वाटत नाही. सगळं काही योग्यच चाललंय, अशा समजुतीने त्या आनंदातच असतात. परंतु, मालिकांमुळे जीवन समृद्ध होण्याऐवजी ते आणखी मागास होताना दाखवलं जातंय, अंधश्रद्धांना खतपाणी घातलं जातंय. अर्थहीन, हिंसक, मालिका विकृत मानसिकता निर्माण करत आहे, हेही लक्षात घ्यायला हवं.
काही वृत्तपत्रांच्या संपादकांचं आणि प्रादेशिक वाहिन्यांच्या संचालकांचं असं म्हणणं आहे की, टी.व्ही.वर प्रसारित होणारे कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊनच बनवले जातात. लोकांनीच ठरवावं की त्यांना काय पाहायचंय ते. बुद्धी प्रगल्भ करणार्‍या मालिका पाहण्यात प्रेक्षकांना फारच कमी रस असतो. नॅशनल जिओग्राफिक, डिस्कव्हरी, हिस्टरी इत्यादी ज्ञानवर्धक मालिका किती प्रेक्षक पाहतात? तरीही हल्ली मालिकांच्या विषयांमध्ये बदल होताना दिसतोय. निखळ मनोरंजन करणार्‍या मालिकाही प्रसारित होत आहेत. ही सुखद बातमी आहे.
टी.व्ही. हे केवळ आणि केवळ मनोरंजनाचं साधन आहे. तेव्हा त्याच्या आहारी जाऊ नका. जोपर्यंत पाहणारे आहेत, तोपर्यंत हे असंच सुरू राहणार. तेव्हा आपणच आपली लक्ष्मणरेषा आखून घ्यायला हवी.

  • अनुजा सावंत