नातं बिघडवणारा अबोला (Avoid Reticence, Maintain...

नातं बिघडवणारा अबोला (Avoid Reticence, Maintain Healthy Relations)

मौन बाळगल्यानं, अबोला धरल्यानं काही दिवसांनी भांडण मिटते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. तरीपण जेव्हा जोडीदार एकमेकांशी अबोला धरतात, तेव्हा त्यांच्या नातेसंबंधात दरी निर्माण होत असते…

वैवाहिक जीवनात भांडणतंटा, रुसवे-फुगवे हे असावेच, असा बहुधा ईश्‍वरी संकेत आहे. म्हणूनच पुरातन काळापासून लोक बोलतात की, भांडणतंटा झाल्याशिवाय संसारात मजा नाही. संसारात पडल्यावर भांड्याला भांडं लागणार नाही, हे असंभव. मात्र हे भांडण पराकोटीचं नसावं. काही लोक अगदी टोकाला जाऊन नको ते निर्णय घेतात, पण हे प्रमाण फारच कमी आहे.  काही भांडणं एकतर्फी असतात. म्हणजे नवरा कचाकचा भांडतो नि बिचारी बायको निमूटपणे ऐकून घेते. तर काही ठिकाणी बायको कडाकडा भांडते नि गरीब बिचारा नवरा मुकाटपणे ते ऐकून घेतो. भांडणामध्ये जशास तसे वागणारी जोडपी आहेतच, पण बव्हंशी घरात भांडणाचा परिपाक म्हणजे अबोला धरणं असतो. उलटून उत्तरे देऊन पराचा कावळा करण्यापेक्षा तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाही, हे जोडीदाराला दाखवून देण्याचा सर्वमान्य मार्ग म्हणजे अबोला! शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो, अशी म्हण आहे. तर भांडणार्‍याला मौनाचा मार, अशी नवी म्हण या संदर्भात म्हणावीशी वाटते. मौनाचं हे अस्त्र मोठी कामगिरी करतं. भांडकुदळ माणसाला ते वठणीवर आणतं. जास्त करून महिलावर्ग हे मौनाचं हत्यार वापरताना आढळतात. अन् मग ‘अजुनि रुसुनी आहे, खुलता कळी खुलेना…’ हे गाणं आळवण्याची वेळ पुरुषांवर येते.

मौन बाळगल्यानं, अबोला धरल्यानं काही दिवसांनी भांडण मिटते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. तरीपण जेव्हा जोडीदार एकमेकांशी अबोला धरतात, तेव्हा त्यांच्या नातेसंबंधात देखील खामोशी निर्माण होते अन् नाती बिघडतात, असं काही मानसिक चिकित्सा करणार्‍या संशोधकांचं मत आहे. अबोला धरल्याने नात्यांवर नेमका काय परिणाम होतो आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करता येईल, ते जाणून घेणं रोचक ठरेल.

नाती निःशब्द का होतात?
भांडण झालं, एकाने रुसवा धरला की हट्टाने दुसराही रुसतो. दोघंही एकमेकांशी बोलेनासे होतात. साहजिकच त्यांच्या घराला निःशब्द क्षण अनुभवायला मिळतात. त्यांचे संबंध दुरावतात. नाती निःशब्द होतात. एकाच घरात राहूनही बोलाचाली होत नसल्याने मनं जुळत नाहीत. सुसंवाद राहत नाही. महत्त्वाचं काही बोलायचं तर कसं बोलावं, हा प्रश्‍न पडतो. काही घरात एकमेकांना कागदावर निरोप ठेवले जातात, तर काही घरात मुलांमार्फत बोलणं केलं जातं. त्याला काही अर्थ नसतो. हेनिःशब्द वातावरण निर्माण होण्याची अन्य काही कारणंही आहेत.
स्वभाव : काही माणसं स्वभावतः शांत असतात. त्यामुळे त्यांच्याशी कोणी भांडलं तरी ते प्रत्युत्तर देण्याऐवजी किंवा भांडण वाढवण्याऐवजी गप्प राहणं पसंत करतात. ते तोंड उघडत नाहीत पण मनातल्या मनात स्वतःशी बोलून जीव रमवतात.

योग्य उपाय : शांत राहणार्‍या बर्‍याच लोकांची स्वतःची एक समजूत असते. जोडीदाराशी भांडण झाल्यावर ते मौनात राहतात. कारण त्यांना असं वाटत असतं की, मौन धारण केल्याने समस्या आपोआप सुटतील. आपला जोडीदार रागावला आहे म्हणून आपणही रागावलो अन् रागाच्या भरात आपल्या तोंडून जर काही अपशब्द निघाले तर समस्येचा गुंता आणखीनच वाढेल. त्यामुळे ते गप्प राहणं श्रेयस्कर समजतात. भांडण मिटविण्याचा हा सोपा उपाय आहे, असं त्यांना वाटतं.
अहंकार : कोणत्याही नात्यांमध्ये बिब्बा घालणारी ही मोठी प्रवृत्ती आहे. अहंकारापोटी कित्येक नाती बिघडतात. कित्येक संबंध मोडकळीला येतात. तरीही माणसांमधील अहंकारी वृत्ती नष्ट होत नाही. या वृत्तीमुळे पती-पत्नीमध्ये भांडण होतं तेव्हा अहंकारी व्यक्तीला वाटते की, सगळं विसरून आपण त्याच्यापुढे वाकलो असं त्याला वाटेल. मग आपण वाकायचंही नाही, अन् अहंकार सोडायचाही नाही, या स्थितीत ते अबोला धरतात. आपला ताठा कायम राखू इच्छितात. अन् जोवर आपला जोडीदार नरमाईचं धोरण स्वीकारत नाही तोवर ते अबोला धरतात. जोडीदाराशी एकही अक्षर न बोलण्याचा निर्णय घेतात. ही प्रवृत्ती पती-पत्नी यांच्या नात्यात घातक ठरते.

धडा शिकवणं : काही लोक आपल्या मौनव्रताचा शस्त्र म्हणून वापर करतात. आपण जर जोडीदाराशी फटकून वागलो तर त्याला आपली चूक उमगेल, आपल्या भांडणाची लाज वाटेल आणि तो नाक घासत आपल्याकडे येईल, असं अशा वृत्तीच्या लोकांना वाटतं. अन् म्हणून ते मौनव्रत हे शस्त्र समजतात. त्याचा वापर करून जोडीदाराला धडा शिकवू, ही त्यांना वाटतं.
अपशब्द : स्वभावाने रागीट असलेली काही माणसंदेखील एकमेकांशी भांडण झालं की, अबोला धरतात. कारण रागाच्या भरात आपल्या तोंडून भलतंसलतं काही निघेल, याची त्यांना जाणीव असते. मग शब्दाने शब्द वाढेल, या भीतीपोटी ते गप्प बसतात. आपल्या तोंडून अपशब्द निघून मोठा बखेडा निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी हा मार्ग स्वीकारला असतो.

निषेध : काही लोकांना अबोला हे निषेधाचं अस्त्र वाटतं. भांडण झालं की, मी त्याचा विरोध करतो हे दाखविण्यासाठी अशी माणसं अबोला धरतात. परस्परांशी बोलाचाली बंद करून ते आपला निषेध व्यक्त करतात.
भीती : स्वभावाने भित्री माणसं भांडणतंट्याला असेही घाबरून असतात. त्यातच मग भांडण झालं की, ते आपल्याकडून वाढू नये, अशी भीती त्यांना वाटते. या भीतीपोटी ते गप्प बसतात. अगदी ओठ गच्च मिटून घेतात. आपण काही बोललो तर शब्दाने शब्द वाढेल आणि नातं बिघडेल या भीतीपायी ते स्वतःच अबोल होतात.
भिडस्त : काही लोक स्वभावाने भिडस्त असतात. एखादी गोष्ट बोलावी की नाही, याबाबत त्यांच्या मनात भीड असते. आपण चांगलं काही बोलायला गेलो, पण त्याचा विपर्यास झाला तर काय घ्या, अशी भावना सतत त्यांच्या मनात असते. त्यामुळे भांडण झालं की, ते चूप राहणं पसंत करतात.

अबोला कसा घालवावा?
भिडस्तपणा, भीती, निषेध किंवा परस्परांमधील विसंवाद या अथवा अन्य कोणत्याही कारणांनी अबोला निर्माण झाला तर त्याची परिणीती नातेसंबंध बिघडण्यात होऊ शकते. वारंवार असे प्रसंग संसारात उद्भवले तर नक्कीच त्याचे विपरीत परिणाम होतील. हा अबोला, घरात निःशब्द क्षण उद्भवू नयेत म्हणून पुढीलप्रमाणे काळजी घ्या.

सुसंवाद साधा : नवरा-बायकोमधील प्रेम, जिव्हाळा, नातं यात बाधा येऊ नये म्हणून परस्परांशी सुसंवाद साधणं हा सर्वोत्तम उपाय आहे. म्हणूनच कितीही कडाक्याचं भांडण झालं, तरी एकमेकांशी बोलाचाली बंद करू नये. ही परिस्थिती सकारात्मक पद्धतीने स्वीकारावी. जोडीदार फुरंगटून बसला तर आपण पुढाकार घेऊन सुसंवाद साधावा. म्हणजे त्याचा रुसवा जाऊन अबोला सुटेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील.
खोटं नको : पती-पत्नीमधील संबंध निकोप राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांना सांगा. सासू-सासरे, नणंद-दीर, आई-बाबा यांच्या भल्याबुर्‍या वर्तनाची बाब निःसंकोचपणे एकमेकांच्या निदर्शनास आणून द्या. कोणतीही गोष्ट लपवू नये. खोटं कधी सांगू नये. आपलं खोटं उघडकीला आलं की, संबंध बिघडलेच म्हणून समजा. कारण एकजण खोटं बोलला, की दुसर्‍याला संताप येणारच. खोटं कधी बोलू नये, म्हणजे परस्परसामंजस्य राहील व विश्‍वासपूर्ण संबंध कायम राहतील.
सन्मान करा : सगळ्याच व्यक्तींचे स्वभाव एकसारखे नसतात. जगातील बव्हंशी जोडपी भिन्न स्वभावाचीच आढळतील. तेव्हा आपण ज्या व्यक्तीशी लग्नसंबंध ठेवला आहे, त्याला त्याच्या स्वभावासकट स्वीकारा. त्याच्या वागणुकीचा सन्मान करा. त्याची तुलना अन्य कोणाशी करू नका. एकमेकांचा आदर करा, एकमेकांविषयी प्रेम बाळगा, सन्मानाने वागवा.

मोकळीक द्या : एकमेकांविषयीच्या भावना निकोप ठेवा. त्या वेळोवेळी व्यक्त करा. आपलं नातं दृढ होण्यासाठी त्यामध्ये मोकळेपणा असणं गरजेचं आहे. आपण पाहतो की, दोन झाडं जर एकमेकांना खेटून उभी राहिली की त्यांची वाढ खुंटते. नात्याचंही असंच आहे. तिथे मोकळीक असणं आवश्यक आहे.
विश्‍वास ठेवा : असं म्हणतात की, संसाराचा रथ सुरळीत चालत असेल तर तो विश्‍वासाच्या चाकांवर. विश्‍वास असेल तर नात्याला तडा जात नाही. त्यामुळे एकमेकांवर विश्‍वास ठेवा. लग्नानंतर चांगल्या वर्तणुकीच्या, एकमेकांना सांभाळून घेण्याच्या आणाभाका घेतानाच, एकमेकांवर विश्‍वास ठेवण्याच्या पण आणाभाका घ्या. कोणत्या तरी हिंदी चित्रपटात एक संवाद आहे, ‘विश्‍वास बडी चीज है, अगर हो मन में.’ विश्‍वास ठेवा, म्हणजे नातं दीर्घायू होईल. अर्थात, विश्‍वासाला तडा जाईल, असं वर्तन कोणीच करू नका. म्हणजे तो कायम राहील.
पती-पत्नी यांच्यातील नातं अतिशय पवित्र आणि घनिष्ठ मानलं जातं. हे नातं सुदृढ, घनिष्ठ राहतं, त्याचा पुढील पिढीवर परिणाम दिसून येतो. त्यांच्या अपत्यांवर तसे परिणाम दिसतात. तसे संस्कार त्यांच्यावर दिसून येतात. असे सर्व कुटुंब ज्या समाजात राहतं, त्या समाजात त्यांचं प्रतिबिंब पडतं. ते प्रतिबिंब नितळ राहावं, याची काळजी त्या टिकविणार्‍यांनी घ्यायची असते. त्यासाठी प्रसंगी आपले वर्तन बदलले पाहिजे, स्वभावाला मुरड घातली पाहिजे