होळी खेळताना घ्या त्वचेची काळजी… (Avoid Chemica...

होळी खेळताना घ्या त्वचेची काळजी… (Avoid Chemical Colors In Holi Celebration)


रासायनिक रंगांचा वापर पूर्णपणे थांबविला पाहिजे. खरं तर, सरकारने होळीदरम्यान रासायनिक रंगांचा वापर करण्यावर तातडीने पूर्णपणे बंदी घालणे गरजेचे आहे.


फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीचं दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो. होळी आली की होळीसाठी लाकडं, गोवर्‍या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात.
होळी रे होळी पुरणाची पोळी… किंवा होळीला गोवर्‍या पाच पाच… डोक्यावर नाच नाच…
लाकडं, गोवर्‍या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं, गोवर्‍या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी, मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्वीकार करायचा, हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि समर्पण शिकवते. या उत्सवाला होलिकादहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत.
खरं म्हणजे होळीच्या दुसर्‍या दिवशी त्या शांत झालेल्या होळीची राख अंगाला लावायची, ती का? तर पुढे सुरू होणारा कडक उन्हाळा सहन व्हावा यासाठी. पण हा चांगला विचार अंगाला चिखल लावायचा, घाण पाणी, एकमेकांच्या अंगावर टाकायचं या आणि अशा ओंगळ कृतीमुळे मागे पडला. नैसर्गिक रंग वापरले जायचे, पण हल्ली झालेल्या बाजारीकरणामुळे तेही मागे पडले आणि समोर आले ते रासायनिक रंग… या रंगामुळे दरवर्षी अपघात झालेले ऐकू येतात. असे अपघात होऊ नयेत म्हणून आपण नैसर्गिक रंगाचा वापर केला पाहिजे आणि खालील गोष्टींचीही काळजी घेतली पाहिजे.
होळीच्या रंगांचा दुष्परिणाम होतो, कारण पारंपरिक पद्धतीने खेळल्या जाणार्‍या होळीत फुलांचा वापर रंगांचा स्रोत म्हणून केला जात होता, पण नैसर्गिक रंगांची जागा आता कृत्रिम रंगाने घेतली आहे. हे रंग खरं तर औद्योगिक रसायनं आहेत, उदाहरणार्थ काळा रंग (लेड ऑक्साइड), हिरवा रंग (कॉपर सल्फेट आणि मॅलाशिट ग्रीन), चांदी (अ‍ॅल्युमिनियम ब्रोमाईड), निळा रंग (प्रुशियम ब्ल्यू, कोबाल्ट नायट्रेट, इंडिगो आणि झिंक क्षार) आणि लाल रंग (मर्क्युरी सल्फेट). क्वचित प्रसंगी मायका डस्ट किंवा काचेचे तुकडेही या रंगांमध्ये चकचकीतपणा येण्यासाठी टाकले जातात. ते त्वचेला अत्यंत घातक ठरू शकतात. अशा उत्पादनांच्या विक्रीवरही कुठल्याही प्रकारची बंधने नाहीत. हे सर्व रंग अत्यंत तीव्र आणि गाढ असतात, जे धुतल्यावरही सहजासहजी जात नाहीत. भुकटीच्या रूपात मिळणार्‍या रंगांच्या तुलनेत द्रवरूपात मिळणारे रंग अधिक घातक असतात, ज्याचे थर जांघ किंवा काखेत जाऊन जमा होतात.
या रंगांचा शरीरावरही दुष्परिणाम होतो. खाज सुटणं, कोरडेपणा येणं, त्वचा निघणं यासारखे दुष्परिणाम या रंगांमुळे दिसून येतात. हे रंग काढण्यासाठी त्वचा सतत घासावी लागल्याने शरीरावर चट्टेही पडू शकतात. क्वचित प्रसंगी विषाणू संसर्ग आणि पुरळही उठू शकतात. त्यामुळे कोरडी त्वचा असलेले, तसेच त्वचाविकार असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. रासायनिक रंग शरीराला लागल्याने केस गळू शकतात. हे रंग डोळ्यात गेल्याने डोळे चुरचुरणं, डोळ्यांतून पाणी येणं, बुब्बुळाला इजा पोहोचणं आणि डोळे येणं असा त्रास होऊ शकतो. काही घटनांमध्ये या रंगांचे दुष्परिणाम म्हणून श्‍वास घेण्यात अडचण येणं आणि सायनोसिसही उद्भवू शकतो. दमाही उसळू शकतो.

रंगाचे दुष्परिणाम टाळा
स्वयंपाकघर किंवा बागेतील स्रोतांपासून तयार केलेल्या नैसर्गिक किंवा घरात तयार केलेल्या रंगांचा वापर होळीदरम्यान करण्याची गरज आहे. रासायनिक रंगांचा वापर पूर्णपणे थांबवला पाहिजे. खरं तर, सरकारने होळीदरम्यान रासायनिक रंगांचा वापर करण्यावर तातडीने पूर्णपणे बंदी घालणं गरजेचं आहे.
होळी खेळण्याआधी त्वचा, तसंच केसांवर तेल लावल्यास त्याचे दुष्परिणाम काही अंशी कमी होण्यास मदत होते. नखांची सुरक्षा करण्यासाठी नखांसाठी असलेली आवरणं वापरता येऊ शकतात, जेणेकरून रंग त्यात जाणार नाही. संरक्षक चष्मे वापरल्यास रंगांपासून डोळ्यांचा बचाव होऊ शकतो. जर रंग डोळ्यात गेलाच, तर स्वच्छ पाण्याने डोळ्यांवर हबके मारा आणि नेत्रतज्ज्ञाची भेट घ्या. रंग काढण्यासाठी डोळे जोरजोरात घासू नका. सौम्य साबण आणि पाण्याचा वापर करून तो काढण्याचा प्रयत्न करा. रंग राहिलाच तर तो काढण्यासाठी जबरदस्ती करण्याची गरज नाही, कारण कालपरत्वे तो फिकट होत जातो.

दुष्परिणामाची लक्षणं
अतिरिक्त लालसरपणा, खाज, जळजळणं, फोड येणं, झीज होणं, चेहरा सुजणं, प्रकाश सहन न होणं, केसांचा पुंजका निघणं, असलेल्या त्वचाविकाराने उचल घेणं, तसेच श्‍वास घेण्यास अडथळा येणं, नखाग्रे-ओठ निळसर होणं इत्यादी. रंगांचा उत्सव काळजी घेऊन साजरा करा!