दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या व...

दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन (Australian Cricketer Shane Warne Dies Of suspected Heart Attack)

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या मॅनेजमेंट कंपनीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या एका संक्षिप्त निवेदनात वॉर्नचे थायलंडमधील कोह सामुई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती दिली आहे. शेन वॉर्न त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या सर्वोत्तम प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही

दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता. त्यावेळेस या महान गोलंदाजाचे हे शेवटचे ट्विट असेल हे कोणास वाटले नव्हते.

शेन वॉर्न हा जगातील महान गोलंदाजांपैकी एक आहे. तो कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून निवृत्त झाला होता. शेन वॉर्नने १९९२ मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी २००७ मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

वॉर्नने १९९२ ते २००७ दरम्यान १४५ कसोटी आणि १९४ एकदिवसीय सामने खेळले आणि १००१ विकेट्स घेतल्या आहेत.

लेगस्पिनर शेन वॉर्नने जागतिक क्रिकेटमध्ये आपली एक छाप सोडली आहे. ऑस्ट्रेलियासाठी खेळताना त्याने अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बाजावली. क्रिकेटपटू त्याला प्रेमाने ‘वॉर्नी’ म्हणत होते. मैदानावरील खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर वॉर्न समालोचक आणि किकेटतज्ज्ञ म्हणून यशस्वी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्त्व राहिला.