केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा धूमधडाक्यात ल...

केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा धूमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला; लेकीच्या लग्नात बाबाच भाव खाऊन गेला (Athiya Shetty Kl Rahul Got Married)

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांचा सोमवारी (२३जानेवारी) खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये धूमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला. सोमवारी संध्याकाळी ४ वाजता या दोघांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नानंतर अथियाचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी मुलगा अहानसोबत मिळून पापाराझींना मिठाई वाटली. यावेळी दोघांनी फोटोसाठी एकत्र पोझसुद्धा दिले. यावेळी सुनील शेट्टी यांनी मुलीच्या लग्नाविषयी पहिली प्रतिक्रिया दिली.

लेकीच्या लग्नानंतर सुनील शेट्टीने जावई के.एल.राहुलबाबत भाष्य केलं. सुनील शेट्टी म्हणाला, “मला के.एल.राहुलचे वडील व्हायला आवडेल, सासरा नाही”. एरव्ही कूल असलेला सुनील अण्णा लेकीच्या सप्तपदीच्या वेळी भावूक झाला.  

विशेष म्हणजे लेकीच्या लग्नासाठी सुनील शेट्टीने केलेला लूक अगदी लक्षवेधी ठरला. त्याने परिधान केलेल्या कपड्यांवरुन त्याचा साधेपणा दिसून आला. लुंगी, कुर्ता सुनील शेट्टीने परिधान केला होता. तसेच त्यावर त्याने माळ घातली होती. इतकंच नव्हे तर पायामध्ये कोल्हापूरी चप्पल सुनील शेट्टीने घातली. तर अहानचाही लूक चर्चेचा विषय ठरला.

अहानने बहिणीच्या लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता व जॅकेट परिधान केलं होतं. सुनील शेट्टी यांच्या साधेपणाचं सध्या कौतुक होत आहे. बहिणीच्या लग्नानंतर अहान म्हणाला, “मी खुश आहे राहुल मला नेहमीच माझ्या भावासारखा आहे, मला खूप आनंद होतो आहे की तो आता तो आमच्या कुटुंबाचा भाग बनला आहे,”

अहानाची खास मैत्रीण कृष्णा श्रॉफने या लग्नाला हजेरी लावली होती. तिच्याशिवाय क्रिकेटर इशांत शर्मा, अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हेसुद्धा लग्नसोहळ्याला उपस्थित होते. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसमध्येच लग्नापूर्वीचे कार्यक्रमही पार पडले होते. यावेळी पाहुण्यांना ‘नो फोन पॉलिसी’चं काटेकोरपणे पालन करावं लागलं होतं.

अथिया आणि राहुलच्या लग्नाचं रिसेप्शन मुंबई आयोजित करण्यात येणार आहे. सुनील शेट्टीला पत्रकारांनी लग्नाचं रिसेप्शन कधी होणार? असं विचारल्यानंतर आयपीएलनंतर रिसेप्शन होईल, असं सुनील शेट्टीने सांगितलं. केएल राहुल आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरीज संपल्यानंतर आयपीएलची सुरुवात होईल. एकूणच वेळापत्रक पूर्णपणे व्यस्त असेल. त्यामुळेच राहुल-अथियाच्या लग्नाचा रिसेप्शन लांबणीवर गेलं आहे. केएल राहुलचं व्यस्त क्रिकेट वेळापत्रक पाहता मे महिन्यात रिसेप्शनचा प्लान आहे. जेणेकरुन फिल्म इंडस्ट्री आणि क्रिकेट विश्वातील दिग्गजांना उपस्थित राहता येईल, असं जवळच्या मित्राने सांगितलं. तसेच अथिया आणि राहुल यांच्या रिसेप्शन पार्टीसाठी तब्बल ३ हजार पाहुण्यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचं कळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमिटमेंट्स आणि व्यस्त वेळापत्रकामुळे अथिया आणि राहुल हनीमुनसाठीही जाणार नाही आहेत. अथियाने नुकताच स्वतःचं यूट्यूब चॅनल लाँच केलं आहे. तर दुसरीकडे राहुल सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सामन्यासाठी तयारी करत आहे. सामना ९ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. असं देखील सांगण्यात आहे की, अथिया आणि राहुल काम संपल्यानंतर युरोप याठिकाणी हनीमूनसाठी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)