वयाच्या ८४ व्या वर्षी ‘लकडाऊन’मध्ये लाडकी आजी झ...

वयाच्या ८४ व्या वर्षी ‘लकडाऊन’मध्ये लाडकी आजी झालेल्या शुभा खोटे (At The Age Of 84, Legendery Shubha Khote Plays Lovable Grandma In Marathi Film ‘Luckdown’)

भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास हा एका शतकाहून मोठा आहे. १९१३ला पहिल्या चित्रपटानंतर भारतीय मनोरंजन सृष्टीचा सुवर्ण काळ सुरु झाला. त्या ५० ते ८० च्या दशकात वावरणारे अनेक कलाकार आज ‘लेजेंड’ म्हणून सिनेसृष्टीत वावरतात आणि अशाच एक लेजेंड म्हणजे ‘शुभा खोटे’. १९५३ पासून ते आतापर्यंत त्या मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहेत.

सीमा या पहिल्या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत त्या सिनेसृष्टीत रुजू झाल्या. ‘मेहमूद’ या अष्टपैलू कलाकारासोबत त्यांची जोडी चांगलीच जमली होती. आपल्या या ६९ वर्षाच्या कारकिर्दीत शुभा खोटे यांनी तब्बल ५६ सिनेमामध्ये काम केलं असून आता यात ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ या चित्रपटाची भर पडली आहे. येत्या २५ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

शुभा खोटे यांची या चित्रपटात महत्वाची भूमिका असून तब्बल ४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर त्या मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. लग्नाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आणि लॉकडाऊनमुळे एकाच घरात अडकलेल्या कुटुंबाची आणि नवविवाहित जोडप्याची गोष्ट ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ या चित्रपटात पाहता येणार आहे. शुभा खोटे या चित्रपटात सर्वांची लाडकी आजी म्हणून दिसणार आहेत. कुटुंबाच्या प्रमुख म्हणून आपल्या नातवाच्या लग्नातली धांदल अनुभवताना त्या दिसणार आहेत.

चित्रपटातील या आजी सगळ्यांना आवडणारच आहेत पण तब्बल ८४ वर्षाच्या खऱ्या आयुष्यातही आजी असणाऱ्या शुभा खोटे या चित्रपटाच्या दरम्यान स्वतःहून आघाडी घेत सेट वर सगळ्यांच्या आधी हजर राहतात. एवढेच नाही तर सेटवर अनेकदा त्यांनी आपल्या हाताने सगळ्यांसाठी जेवण सुद्धा त्यांनी बनवलं होतं.

विनोदी आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असणारा हा चित्रपट संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर या चित्रपटाची निर्मिती इष्णव मीडियाची आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मिता स्मिता खरात असून चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली आहेत. चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे. शरद सोनवणे, दर्शन फुलपगार, अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे.