बिग बॉसच्या अंतर्गत घोटाळ्यांचा आसिम रियाजने ती...

बिग बॉसच्या अंतर्गत घोटाळ्यांचा आसिम रियाजने तीन वर्षांनी केला खुलासा(Asim Riaz Discloses The Internal Scams Of Bigg Boss After Three Years)

बिग बॉस हा वादग्रस्त शो म्हणून प्रसिद्ध आहे. या शोमध्ये स्पर्धक अनेकदा एकमेकांवर चिखलफेक करत असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा अनेक गोष्टींचा खुलासा त्यांच्याकडून केला जातो. विजेतापदावरुन हाणामारी होत असते. अशातच नुकत्याच संपलेल्या बिग बॉस 16च्या सीझनचा विजेता एमसी स्टॅनच्या विजेतेपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शोमध्ये फारसा सक्रिय नसलेला स्टॅन विजेता कसा होऊ शकतो असा प्रश्न बिग बॉसच्या चाहत्यांना पडला आहे. अशातच आता बिग बॉस 13 चा उपविजेता ठरलेल्या आसिम रियाजने या शोबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. आसिम रियाजच्या वेळी दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला विजेता झाला होता. पण आपल्याला फसवून त्याला विजेते केल्याचे वक्तव्य आसिमने केले आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आसिमने सांगितले की, सुरुवातीला मला बिग बॉसमधून काढून टाकले होते. त्यासाठी मी माझी बॅगसुद्धा भरुन ठेवली होती. पण पुन्हा मला त्यांनी बोलवून घेतले. शोच्या विजेत्यापदाबद्दल बोलतना आसिम म्हणाला, “माझ्यावेळीही त्यांनी काय केलं? मी जिंकावं असं त्यांना वाटत नव्हतं. आजही आपण वोटिंग लाइन ओपन करू १५ मिनिटांसाठी. ज्याला जिंकवायचं आहे जिंकवावं जनतेने. पण त्यांनी आम्हाला यावर विश्वास ठेवायला लावला की त्यांनी जे काही केलं ते योग्य आहे. पण खरं तर त्यांनी माझी हार आधीच ठरवलेली होती. फक्त हे स्पष्टपणे सांगितलं नाही. ती निव्वळ फसवणूक होती.”

आसिमच्या या वक्तव्यामुळे मात्र तो सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. आजवरच्या बिग बॉसच्या इतिहासात सिद्धार्थ शुक्लाच योग्य विजेता असल्याचे चाहते म्हणत आहेत. तर काहींच्या मते सीझनला 3 वर्षे उलटूनही आसिम अजून तेच धरुन बसल्याने लोक त्याची खिल्ली उडवत आहेत.

आसिमच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. शिवाय लवकरच तो कंगणा रणावतच्या लॉकअप 2 मध्ये दिसणार आहे.