अंदमान येथील हॉलीडे पिक्चर्स व्हायरल झाल्याने भ...

अंदमान येथील हॉलीडे पिक्चर्स व्हायरल झाल्याने भडकल्या आशा पारेख! (Asha Parekh Says, ‘I Was Very Upset With Those Holiday Pictures Of Ours’)

काही दिवसांपूर्वीच आशा पारेख, वहिदा रहमान आणि हेलन या त्रिकुटांचे अंदमान येथील मौजमजा करतानाचे फोटो पाहून सगळ्याच चाहत्यांना आनंद वाटला होता. त्यामुळे ते फोटो वेगाने व्हायरल झाले. या तिन्ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि एकत्र वेळ घालविण्याकरिता त्या अंदमानला गेल्या होत्या. तेथे आपल्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेताना त्या दिसल्या. परंतु आशा पारेख यांनी हे फोटो व्हायरल झाल्यामुळे आपली नाराजी व्यक्त करत माझ्याही पेक्षा वहिदा आणि हेलन नाराज आहेत, असे म्हटले आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम /आशा पारेख

आशाजींनी एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये याचं कारण सांगितलं, त्यांचं म्हणणं असं आहे की, ती त्यांची खाजगी सहल होती आणि त्यांच्या खाजगी जीवनामध्ये डोकावण्याची कोणालाही परवानगी नाही. सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात कोणीही आपल्यासोबत सेल्फी काढतं, परंतु जेव्हा आपण आपल्या मित्रांसोबत वा कुटुंबासह असतो तेव्हा आपली स्वतःची खाजगी जागा आणि वेळ असते. त्यात कोणी चोरून फोटो काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला, तर हे एकप्रकारे तुमच्या जीवनात हस्तक्षेप केल्यासारखं झालं नाही का?

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / आशा पारेख

यात उल्ल्खनीय बाब अशी आहे की, हे फोटो निर्माता तनुज गर्ग यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले होते.

आम्ही तेथे तणावमुक्त होण्यासाठी गेलो होतो. आमचे फोटो कोणी काढले ते देखील आम्हाला माहित नाही. कारण आजकाल कोणीही फोटो काढू शकतात, पूर्वी लोक ऑटोग्राफ घ्यायचे आता सेल्फी घेतात. सोशल मीडियाने लोकांच्या खाजगी जीवनावर आपलं वर्चस्व स्थापित केलं आहे. तेथे आलेल्या प्रवाशांनी आमचे फोटो काढले असणार, आम्ही घरी परतल्यानंतर पाहिले, तर तोपर्यंत फोटो व्हायरल झाले होते. मला खाजगी आयुष्य जगायला आवडतं, त्यामुळे मी नाराज झालेच. पण हेलन आणि वहिदा माझ्यापेक्षाही अधिक नाराज झाल्या आहेत. कारण त्या माझ्यापेक्षाही अधिक खाजगी जीवन जगतात.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / तनुज गर्ग

लोकं आमचे फोटो शेअर करून कमेंट देतात की, दिल चाहता हैच्या सीक्वेलमध्ये यांना घेतले पाहिजे. दिल चाहता है कशासाठी, मला ही गोष्टच मुळी कळत नाही. हे म्हणजे ये जिंदगी ना मिलेगी दोबारा यासारखं आहे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / तनुज गर्ग

आपल्या सुट्टीबाबत आशा पारेख यांनी सांगितले की, आम्ही लॉकडाउनच्या आधी मार्चमध्ये अंदमानला गेलो होतो. आम्हाला बाहेर जायचे होते. तणावमुक्त व्हायचे होते. मी पहिल्यांदाच वहिदासोबत स्नॉर्कलिंग करण्यासाठी गेले होते. मी पूर्वी कधी असे केले नव्हते. मला पोहता येत असलं तरी खोल पाण्याची मला खूप भीती वाटते. तरीही मोठ्या हिमतीने मी शेवटी ते केलेच. हा वेगळाच अनुभव होता. समुद्रात आतपर्यंत जाऊन विदेशी माश्यांसोबत पोहण्याचा हा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अवश्य घेतला पाहिजे.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / आशा पारेख