‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात...

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवं वळण (Arundhati’s Life Takes A Turning Point In Marathi Serial ‘Aai Kuthe kay kartey’)

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला. मात्र यश आणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचं चांदणं येऊ पाहतंय. अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरातूनच होणार असं ठामपणे सांगितलं. त्यामुळेच अरुंधतीची हळद, मेहंदी आणि विवाह देशमुखांच्या घरातच होणार आहे.

घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अरुंधतीने स्वत:च्या आवडी-निवडी बाजूला ठेवल्या. मात्र आशुतोषमुळे अरुंधतीच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले. गाण्याची आवड जपता जपता आशुतोषच्या रुपात तिला आयुष्याचा साथीदार मिळाला. अरुंधतीच्या आयुष्यात नवा अध्याय सुरु होतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अरुंधतीच्या मनात संमिश्र भावना नक्कीच आहेत. ज्या घराने इतकं भरभरुन प्रेम दिलं त्या घरातून पाठवणी होताना तिचेही डोळे पाणावलेत.

या खास प्रसंगी अरुंधती म्हणजेच मधुराणी गोखले म्हणाल्या, समाजामध्ये अशा पद्धतीचं लग्न स्वीकारलं जातयं हा बदल स्वागतार्ह आहे असं मला वाटतं. अरुंधतीला नटायची, दिखावा करायची आवड नाही. लग्न छोटेखानी करावं अशी तिची इच्छा होती. मात्र सुलेखा ताईंचा मान आणि सर्वांच्या आग्रहाखातर ती लग्नासाठी छान नटलीय.