‘वऱ्हाडी वाजंत्री’ च्या ठेक्यावर कलाकारांनी धरल...

‘वऱ्हाडी वाजंत्री’ च्या ठेक्यावर कलाकारांनी धरला ताल (Artistes Dance To The Tune Of Music In ‘Varhadi Vajantri’ Trailer And Music Launch Event)

खरं तर दिवाळी झाल्यावर तुळशीच्या लग्नापासून संपूर्ण महाराष्ट्रभर विवाह सोहळ्यांची धूम सुरू होते, पण यंदा दिवाळीपूर्वीच ‘वऱ्हाडी वाजंत्री’चा गाजावाजा होऊ लागला आहे. अभिनेते-दिग्दर्शक विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या या चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेणारी आहेत. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे संगे चित्रपटातील इतर कलाकारांनी धरलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’च्या ठेक्यावर महाराष्ट्रातील तमाम सिनेप्रेमींचे पाय थिरकणार आहेत. या चित्रपटाच्या म्युझिक लाँचसाठी अनोखी शक्कल लढवत संगीतकार अविनाश – विश्वजित, शशांक पोवार आणि लोकशाहीरी कला जोपासणारे, बाजीराव मस्तानी, तानाजी द अनसंग वारीअर अश्या अनेक चित्रपटांत पार्श्वगायन करणारे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख आणि वऱ्हाडी वाजंत्री हे टायटल सॉंग गायलेले हरहुन्नरी कलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ हे शीर्षक गीत वाद्य सुरावटीद्वारे प्रत्यक्ष सादर करीत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

या अनोख्या सोहळ्यात सर्व गायक, संगीतकार आणि कलाकारांनी सहभाग घेत शोभा वाढविली. संगीत प्रदर्शनानंतर या चित्रपटाचा खुमासदार ट्रेलर आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे, पंढरीनाथ कांबळी, विजय कदम, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, पूर्णिमा अहिरे, राजेश चिटणीस, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर, सहनिर्माते अतुल राजारामशेठ, दिग्दर्शक विजय पाटकर तसेच पुण्यनगरी समूहातर्फे राघवेंद्र शेठ(ब्रँड हेड), हेमंत जुवेकर निवासी संपादक – पुण्यनगरी यांच्या उपस्थितीत प्रदर्शित होताच सभागृहात हास्याचे कारंजे फुलू लागले होते.

नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांनी स्वराज फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली केली आहे. वैभव अर्जुन परब यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा व संवादलेखन केलं असून, दिग्दर्शन विजय पाटकर यांनी केलं आहे. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटात तीन सुमधूर गाणी असून, अविनाश-विश्वजीत व शशांक पोवार या संगीतकार त्रयींनी ती संगीतबद्ध केली आहेत. ‘वऱ्हाडी वाजंत्री’ हे टायटल साँग शशांक पोवार यांनी संगीतबद्ध केलं असून, गीतकार राजेश बामुगडे हे तिन्ही गीतांचे गीतकार आहेत. लोकप्रिय गायक आदर्श शिंदे, नंदू भेंडे, आनंदी जोशी, मैथिली पानसे–जोशी, गणेश चंदनशिवे यांनी ती गायली आहेत.