कपूर कुटुंबातील अर्जुन, अंश...

कपूर कुटुंबातील अर्जुन, अंशुला, रियासह करण बुलानीला कोरोनाची लागण (Arjun Kapoor, Anshula Kapoor, Rhea And Karan Boolani Test Positive For Covid-19)

बॉलिवूड सेलिब्रिटींवर कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांच्यानंतर आता ‘कपूर’ कुटुंबातील अर्जुन कपूर, अंशुला कपूर, रिया कपूर आणि करण बुलानी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण आता घरी क्वारंटाईन आहेत.

बोनी कपूर यांचीही तब्येत ठीक नव्हती, परंतु त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे समजते.

अर्जुन कपूर आणि अंशुला यांना यापूर्वीही कोरोना झाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अर्जुन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यावेळी त्याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली होती. मागच्या वेळीही अर्जुनने स्वतःला घरी क्वारंटाईन केले होते.

आज (29 डिसेंबर) अंशुलाचा वाढदिवस देखील आहे आणि नेमकी आजच ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंशुलाला वाढदिवस साजरा करता येणार नाही आहे आणि म्हणूनच अर्जुनने सोशल मीडियावर आपली बहिण अंशुलासाठी पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलंय, “नेहमी एक चांगल्या मनाची व्यक्ती हो. सर्वोत्तम हो. नेहमी आनंदी राहा आणि हसत राहा. मी सदैव तुझ्यासोबत आहे. अंशुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या वर्षी तुला जे पाहिजे ते सर्व मिळो.”

रिया कपूरने देखील आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘होय, पूर्ण खबरदारी घेतल्यानंतरही मी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. ही माझी खाजगी बाब आहे, पण मला कळत नाही की, हा इतका मोठा मुद्दा का बनवला जात आहे. ही माहिती फक्त सरकारी आणि मेडिकलशी संबंधित लोकांसाठी आहे, जेणेकरून ते त्यांचे काम करू शकतील, इतर कोणत्याही गॉसिप साईटसाठी नाही.’

रियाने पुढे लिहिले की, ‘मी आणि माझे पती क्वारंटाईन आहोत आणि पूर्ण खबरदारी घेत आहोत. डोकेदुखी आहे. पण आशा आहे की, आम्ही लवकर बरे होऊ. आमच्या आरोग्याबद्दल विचारणा करणाऱ्यांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद.’ आता कपूर कुटुंबातील बाकीच्यांच्या तब्येतीची चिंता चाहत्यांना लागली आहे. जान्हवी, खुशीचा कोरोना रिपोर्ट येणे बाकी आहे. जान्हवी नुकतीच सहलीनंतर घरी परतली आहे.