आर्यन खानला जामीन मिळाला : बॉलिवूड कलाकारांनी आ...

आर्यन खानला जामीन मिळाला : बॉलिवूड कलाकारांनी आनंद व्यक्त केला! (Arayan Khan Granted Bail : Bollywood Celebs Express Their Joy)

मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन दिला आहे. २७ दिवसानंतर हा जामीन मिळाला. तेव्हा आता आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी जाणार हे स्पष्ट झाले. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आर्यनला जामीन मिळाल्यामुळे सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला आहे.

सोनू सूद

आर्यनला जामीन मिळाल्याचे कळताच सगळ्यात पहिले सोनू सूद याने आपली प्रतिक्रिया दिली. ‘वेळ जेव्हा न्याय करते, तेव्हा साक्षीदारांची गरज भासत नाही.’ असं त्यानं त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

मीका सिंह

सुरुवातीपासून शाहरुखच्या बाजूने उभा राहिलेल्या मीका सिंहने आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर ट्वीट करत आर्यन खान आणि इतर आरोपींचे अभिनंदन केले आहे. उशिरा का होईना पण न्याय मिळाला, म्हणजे देवाच्या ठिकाणी न्याय आहे. ईश्वर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबास आशीर्वाद देवो, असे लिहून त्याने आपला आनंद व्यक्त केला आहे.

मलायका अरोरा

मलायका अरोराने आपला आनंद व्यक्त करत आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘देवाचे आभार’ असे लिहिले आहे. सोबतच तिने शाहरूख खानच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर करून – ‘फक्त प्रेम’ असं लिहिलं आहे.

आर माधवन

अभिनेता आर माधवन यानेही आर्यनला जामीन मिळाल्याचे कळताच आनंद व्यक्त केला आहे. “देवाचे आभार. एक बाप म्हणून मी खूप समाधानी आहे. सर्व चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडू दे”, असे ट्वीट आर माधवनने केले आहे.

स्वरा भास्कर

आर्यनला जामीन मिळाल्याची बातमी कळताच स्वरा भास्करने लिहिलं, ‘शेवटी’.

संजय गुप्ता

शाहरुख खानला सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत पाठिंबा दर्शविणारे चित्रपट निर्माता संजय गुप्ता यांनी आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर लिहिलंय, “आर्यनला जामीन मिळाल्यामुळे मी खुश आहे. परंतु एका तरुण मुलाला २५ दिवस तुरुंगात ठेवल्यामुळे मला रागही येत आहे. ही सिस्टम बदलण्याची गरज आहे. आर्यन, देव तुला आनंदी ठेवो आणि कणखर बनवो.”

सुचित्रा कृष्णमूर्ति

‘कभी हां कभी ना’ चित्रपटात शाहरुखची नायिका असलेली अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तिने देखील आर्यनला जामीन मिळाल्याच्या आनंदात आपल्या भावना व्यक्त करताना, आर्यनला जामीन मिळाल्याचे ऐकून खूप बरे वाटले. परंतु केंद्रीय अन्वेषण विभागाला माझी विनंती आहे की त्यांनी एनसीबीचे छापे रेड आणि त्यांच्या पद्धती यांची तपासणी करावी. त्यांनी स्वतःच्या हितासाठी अशा प्रकारे कायद्याचा वापर करू नये.

शेखर सुमन

शेखर सुमन यांनी लिहिले, “शाहरुख आणि गौरी यांना आज हायसं वाटत असेल. त्यांचा कोणताही दोष नसताना त्यांनी खूप त्रास सहन केला आहे. मुलाला जामीन मिळाल्याबद्दल अभिनंदन. नक्कीच त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात कटू अनुभव घेतला आहे आणि आता तो त्याची योग्यता सिद्ध करेल.”

हंसल मेहता

हंसल मेहता ने ट्वीट केलं आहे, “मी आज रात्री पार्टी करू इच्छितो.”

३ ऑक्टोबरला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला २७ दिवसांनी कोर्टातून जामीन मिळाला आहे. अर्थात, किंग खान आणि गौरी खान आणि त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. म्हणूनच चाहत्यांना आर्यनच्या जामिनाची बातमी मिळताच शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर फटाके फोडून त्यांनी आनंद साजरा केला. मात्र, आर्यन अजूनही तुरुंगात असून, तुरुंगातून बाहेर येण्यासाठी त्याला आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे.