Apps

दोन संसार


– भा. ल. महाबळ

मोहनजी आमच्या लीलानं नशीब काढलं. तुमच्या पदव्या, बुद्धीसंपदा, फर्ममधील तुमची वरची भल्या पगाराची जागा पाहून माझ्या मनात धास्ती निर्माण झाली होती. लीलाहून कितीतरी वरचढ स्थळं तुम्हाला सांगून आली असणार. आमचं भाग्य थोर म्हणून तुम्ही लीलाला पसंत केलंत.
लीला व मोहन यांचा रीतसर, सुशोभित मंडपात, दोनही कुटुंबांच्या संमतीने विवाह झाला आहे. या दोघांचा प्रेमाचा, गोडीचा संसार चालू आहे. तरीही मोहनने एक वेगळा, संसार मांडला आहे. दोनही संसार, परस्पर संमतीने सुखात चालू आहेत. कसे? ती हकिगत सांगतो. ऐका.
.. लीलानं केस सोडले. लीलाचे मोकळे सोडलेले केस मोहन रंगून, गुंगून पाहत होता. मोकळ्या सोडलेल्या केसामुळे लीला नेहमीपेक्षा दसपट सुंदर दिसत होती. लीला केस विंचरत होती. मोहनचे डोळे केसात गुंतले होते. तेवढ्यात लीलानं विंचरलेले केस एकत्र बांधले व त्यावर क्लिप अडकवली. भरलेल्या अन्नाच्या ताटावरून, भुकेल्या व्यक्तीला जबरदस्तीनं उठवल्यावर ती जशी संतापेल तसा मोहन खवळला, “लीला, मोकळे केस बांधण्यापूर्वी माझी परवानगी का घेतली नाहीस?”
लग्नाला फक्त दोनच महिने झाले होते. मोहनचं आपल्यावरचं ओतप्रोत प्रेम लीला आकंठ अनुभवत होती. आपण दोन महिन्यांपूर्वी लग्न केलं, त्याऐवजी दोन वर्षांपूर्वी का केलं नाही असा त्राग्याचा विचार लीलाच्या मनात फुगडी घालत असे! त्यामुळे मोहनचा, ‘मोकळे केस बांधण्यापूर्वी माझी परवानगी का घेतली नाहीस?’ हा लाउडस्पीकरवरचा प्रश्‍न लीलाला समजलाच नाही. पिंजर्‍यातील मंजूळ आवाज काढणारा पोपट अचानक डरकाळी का फोडत आहे? ती अजीजीच्या स्वरात म्हणाली, “सॉरी. यापुढे रोज केस बांधण्यापूर्वी तुझी परवानगी घेईन.”
“मी मुळीच, कधीही परवानगी देणार नाही. आणि आता बांधलेले केस मोकळे सोड. केस मोकळे सोडल्यावर तू अप्सरा दिसतेस. केस बांधतेस आणि अप्सरेची लीला होतेस.”
लीलाला समजलं. केस मोकळे सोडल्यावरची लीला मोहनच्या डोळ्यांना सुखवते. तिनं खुलासा दिला, “मोहन, मला कामं करायची असतात. केर काढणं, कपडे मशीनमध्ये धुण्यासाठी टाकणं, भाजी चिरणं, स्वयंपाक करणं हे सारं केस मोकळे सोडून कसं करता येईल? मोकळे केस अडथळा आणतात. स्वयंपाक करताना मोकळे केस पुढं आले आणि जळाले तर?”
मोहनच्या जिवाचा थरकाप झाला. मोकळे केस कामात अडचण निर्माण करतात हे त्याला माहीतच नव्हतं. लीला पुढं म्हणाली, “केस मोकळे ठेवले की त्यांचा गुंता होतो. गुंता सोडवताना काही केस तुटतात. तुटके केस तुला पाहायला आवडतील?”
मोहनचं अंतःकरण तुटलं. लीलाच्या केसांना इजा पोहोचता कामा नये. त्यानं माघार घेतली, “लीला, मला समजलं. यापुढं केस विंचरण्यापूर्वी मला बोलव. मला मोकळे केस पाहायला मिळतील. तुझ्या मोकळ्या केसातून मी हात फिरवीन. मग तू विंचर. पाहिजे तसे बांध. केसात मधूनमधून भांग पाड.”
लीलाचा चेहरा फुलला. मोहनचं आपल्याकडं एवढ्या बारकाईनं लक्ष आहे तर! चेहरा असा फुलला होता की कसं फुलावं हे फुलांनी लीलाच्या फुगलेल्या गालांकडून शिकावं व लीलाच्या गालांवरची चमकही फुलांनी चोरावी.
लग्नानंतर मोहनच्या ध्यानी आलं की आपल्याला लीलाचं वेडच लागलं आहे. ऑफिसमधील जबाबदारीची, वेळ आणि डोकं खाणारी कामं त्याला घरी आणावी लागतात. पण मनात लीला असेल तर कामं कशी होणार? मोहनला जाणवलं, बरं तर बरं! आपण कॉलेजात असताना आपलं लग्न झालं नाही. आपण एमकॉम, एमबीए व एलएलबी या पदव्या सहज व वरच्या श्रेणीत मिळवल्या. याचं एकमेव कारण आपलं लग्न झालं नव्हतं. लीला तेव्हा आयुष्यात असती व तिनं केस मोकळे सोडले असते तर आपण कॉलजच्या पहिल्या वर्षातच, वर्षानुवर्षे, मुक्काम टाकून बसलो असतो!
तेवढ्यात त्याला बापूसाहेबांचे शब्द आठवले, “मोहनजी आमच्या लीलानं नशीब काढलं. तुमच्या पदव्या, बुद्धीसंपदा, फर्ममधील तुमची वरची भल्या पगाराची जागा पाहून माझ्या मनात धास्ती निर्माण झाली होती. लीलाहून कितीतरी वरचढ स्थळं तुम्हाला सांगून आली असणार. आमचं भाग्य थोर म्हणून तुम्ही लीलाला पसंत केलंत.”
मोहनला बापूसाहेबांच्या शब्दांचं ओझं झालं आहे. वधूवरसूचक मंडळाच्या यादीतील स्थळं बापूसाहेबांनी पाहिली आणि त्या स्थळांतून आपलं स्थळ निवडून, खरं तर, बापूसाहेबांनीच आपल्यावर उपकार केले आहेत. मोहनला मुली सांगून येत होत्या. मोहनचे आईवडील मोहनसाठी मुली पाहतच होते. पण लीला सांगून आली याचं सर्व श्रेय बापूसाहेबाकडेच जातं. लीलाला पाहिलं आणि ती मोहनच्या मनात मुक्कामाला आली. मोहनचे कान, डोळे तृप्त होत होते व पुन्हा तहानलेले राहत होते. लग्नाच्या दिवसापासून तृप्ती व अतृप्तीचा हा खेळ चालू होता.
घरी आणलेलं ऑफिसचं काम करताना मोहनला एक अफलातून कल्पना सुचली. आपण हे काम किचनमध्ये बसून केलं तर? किचन ही लीलाची राजधानी आहे. जास्त करून राणीसाहेब किचनमध्ये असतात. आपण ऑफिसचं काम किचनमध्येच करायचं. मधूनमधून लीलाकडं पहायचं. डोळे थंड होतील व मन प्रसन्न राहील. कामाचा ताण जाणवणार नाही. काही वेळा भर उन्हात, रस्त्यावरून चालणं भाग पडतं. पण रस्त्यावर टप्प्याटप्प्यावर झाडं असतील तर झाडांखालून चालताना उन्हाचा ताप जाणवत नाही. लीलाकडं मधूनमधून पहायचं आणि ऑफिसचं ताणाचं काम करायचं.
मोहननं आपला विनंती अर्ज लीलापुढं सरकावला. आपल्यात मोहन झाडाची सावली पाहतो हे कळल्यावर लीला बेहद्द खूष झाली. तिनं डायनिंग टेबलावरच्या वस्तू हलवल्या, टेबल मोकळं केलं व मोहनला हवं त्या ठिकाणी ते ठेवलं. मोहननं कामाचे कागद व टॅब टेबलावर ठेवून तो खुर्चीत बसला. किचनमधील ओट्यावर काम करणार्‍या पाठमोर्‍या लीलाला पाहत पाहत त्यानं ऑफिसच्या कामाला आरंभ केला. त्याच्या ध्यानी आलं की काम उरकण्याचा आपला वेग वाढला आहे. कामाचा ताणही जाणवत नाही.
ओट्यावर काम करणार्‍या लीलालाही कल्पना सुचली. आपण अधूनमधून मोहनपुढं चहाचा कप ठेवला तर? चहा देताना आपण केस मोकळे सोडून जायचं. लीलानं तसं केलं. कप तोंडाला लावताना आपण चहा नाही तर अप्सरेनं दिलेलं अमृत पितो आहे व अमृताची चव चहाप्रमाणे आहे हे मोहनला जाणवलं. ऑफिसात वरचे साहेब आले की तो ज्याप्रमाणे नम्रतेनं उठे तसा तो लीलाजवळ गेला व त्यानं तिच्या चमकदार रेशीम केसामधून आपला हात फिरवला. चहा पिऊन खूष झालेल्या मोहनच्या जिभेला हातांचा आनंद ओळखता आला.
एके दिवशी मोहननं तक्रार केली, “लीला, तू ओट्यावर पोळ्या लाटतेस व करतेस. हे दृश्य मला पाहत राहावसं वाटतं. तू एकाच वेळी कणकेचा गोळा करतेस, तो गोळा तू पोळपाटावर ठेवतेस, लाटतेस, पोळी लाटताना तू तव्यावरची पोळी फिरवतेस, उलटतेस. त्याच वेळी तू पोळी लाटण्याचं जवळ जवळ पुरं झालेलं काम पूर्ण करतेस. तव्यावरची भाजलेली पोळी खाली उतरवतेस व पोळपाटावरची लाटलेली पोळी तव्यावर चढवतेस व कणकेचा गोळा पोळपाटावर लाटण्यासाठी घेतेस. तुझी कमाल आहे! तुझी प्रत्येक मोहक हालचाल मला पाहता येते. पण तू पाठमोरी असतेस. तुझी गोड हालचाल मी पाहतो. त्यावेळी तुझा चेहरा दिसत नाही. कारण तू पाठमोरी असतेस. तुझे डोळे, नाक, ओठ, हनुवटी हे सारं मला पाहता आलं असतं तर काय मजा आली असती!”
लीलानं या तक्रारीचं निवारण केलं. लीलानं ओट्यावरची मांडणी थोडी बदलली व ओट्यासमोरच्या भिंतीवर उंच आरसा बसवला. डायनिंग टेबलापुढची मोहनची खुर्ची थोडी हलवली. पाठमोर्‍या लीलाचे सतेज डोळे, सरळ नाक, लालसर ओठ हे सारं आरशानं पकडलं होतं. लीला म्हणाली, “मोहन, तुला आरशात मी समोरून दिसेन. आरशाबाहेर तू मला पाठमोरी, पोळ्या लाटताना पहा.”
मोहनचे दोन वेगळे संसार, तेही लीलाच्या खुषीच्या संमतीने चालू झाले, दोनही संसार सुखाचे आहेत.
मोहनचा एक संसार आहे, डायनिंग टेबलावरून काम करताना, पाठमोर्‍या, पोळ्या लाटणार्‍या लीलाशी.
मोहनचा दुसरा संसार आहे आरशातील लीलाच्या हसर्‍या प्रतिबिंबाशी. आरशातील लीलात मोहनला तिचा पूर्ण चेहरा व दिमाखदार देहलता गवसते!