गणेशप्रिय पंचम सामग्रीने सौंदर्य खुलवा (Apply P...

गणेशप्रिय पंचम सामग्रीने सौंदर्य खुलवा (Apply Panchamrut Components And Enhance Your Beauty)

विविध सणांनी नटलेला श्रावण संपताच चाहूल लागते ती श्रीगणेशाच्या आगमनाची. गौरी गणपती म्हणजे तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत. दीड दिवसापासून ते अकरा दिवसांपर्यंत घरोघरी विराजमान असणारे गणराय, प्रत्येक घरातून, प्रत्येक व्यक्तींमधून चैतन्य प्रवाहित करत असतात. गणरायाच्या स्वागतासाठी प्रत्येक व्यक्ती तयारी करत असते. घर आवरण्यापासून ते गणपतीसाठी लागणार्‍या सामानाची यादी करून ते आधीच आणून ठेवलं जातं. शिवाय गणरायासोबत सणाच्या निमित्तानं स्वतःही अपटूडेट राहण्याकडे व्यक्तींचा कल वाढत आहे. केवळ नटणं-मुरडणं कालबाह्य होत चाललं असून स्वतःचा लूक व एकूण अपिअरन्स परफेक्ट ठेवणं नव्या पिढीला जमू लागलं आहे.

निसर्गाचं वरदान जणू या दरम्यान आपल्याला लाभलेलं असतं. श्रीगणेशाच्या पूजेसाठी लागणारं पंचामृतातील साहित्य, पाच पत्री, पंचपुष्प आणि पंचखाद्य आपल्याला निसर्गातून सहजपणे उपलब्ध होत असतं. गणेशप्रिय अशा या सगळ्या पंचम सामग्रीचा आपण आपल्या सौंदर्यवृद्धीसाठीही उपयोग करून घेऊ शकतो, तेही घरच्या घरी.

पंचामृत
गणेशास प्रिय असलेल्या दूध, दही, तूप, मध आणि साखर याने सिद्ध पंचामृतापासून आपण सौंदर्याचा श्रीगणेशा करूया. दूध हे उत्तम क्लिंजर आहे तर दही त्वचेस आर्द्रता प्राप्त करून देतं. तूप त्वचेस मृदू बनवितं, मध त्वचेस उजळवितं आणि साखर त्वचेवरील मृत त्वचा स्वच्छ करतं. पंचामृतातील पदार्थांच्या याच गुणधर्मांचा आपण सौंदर्यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे.
– सकाळी उठल्यावर त्वचा दुधाने चोळून स्वच्छ करा.
– पाणी विरहीत घट्ट दही त्वचेवर चोळा आणि दहा मिनिटानंतर स्नान करा.
– दही आणि दुधाची पावडर एकत्र करून त्याचा लेप त्वचेस लावा.
– तेल न लावलेल्या केसांना दही लावा आणि तासाभरानंतर केस स्वच्छ धुवा.
– तूप त्वचेसाठी उत्तम टॉनिक आहे. तेव्हा आंघोळीपूर्वी नियमितपणे तूप लावा.
– दह्याचं आंबट पाणी घेऊन त्याने केस धुवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने ते साफ करा.
– लिंबाचा रस आणि तूप सम प्रमाणात घेऊन त्वचेस लावा.
– तूप आणि दही एकत्र करून त्वचेस चोळा.

– गरम पाण्यात तूप सोडून त्या पाण्याची वाफ घ्या.
– नाकावर घाम येत असल्यास तूप चोळा.
– गरम पाण्यात मध मिसळून त्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.
– मध व लिंबू रस सम प्रमाणात एकत्र घेऊन त्वचेस लावा.

– मध व दूध सम प्रमाणात एकत्र करून त्वचेस लावल्यास फायदेशीर ठरतं.
– साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून त्वचेवर हळूवार गोलाकार चोळा.
– साखर आणि तूप सम मात्रेत घेऊन त्वचेवर चोळा.
– साखर आणि गुलाबपाणी सम मात्रेत घेऊन गार करा आणि मग त्वचेवर चोळून लावा.
– साखर आणि दह्याचा लेप त्वचेवर लावा.


पंचखाद्य
पंचामृतापश्‍चात श्रीगणेशास प्रिय असणारं बदाम, अक्रोड, मनुका, खडीसाखर आणि गूळ हे पंचखाद्य सौंदर्यकारक कसं आहे ते पाहूया. या खाद्याचे गुणधर्म सांगायचे तर बदामाच्या सेवनानं आणि बाह्य आच्छादनानं त्वचेचा पोत सुधारतो. अक्रोड त्वचेवरील मृत त्वचा दूर करते. मनुका नवी त्वचा येण्यास उपयुक्त ठरते तर खडीसाखर त्वचेस ऊर्जा देते. आणि गूळ त्वचेस तजेलदारपणा देतो. यांचा सौंदर्यासाठी वापर करताना –
– बदाम दुधात उगाळून त्वचेवर लावा.
– बदामाची पावडर दह्यात एकत्र करून त्याचा लेप लावा.
– बदाम दुधात उकळून वाटून त्वचेवर लावा.
– बदामाची पावडर मधात एकत्र करून त्वचेस लावा.

– वाटीभर पाण्यात 10 मनुका रात्रभर भिजवा. सकाळी ते पाणी प्या.
– मनुकाचे पाणी त्वचेस चोळा.
– मनुकाचं पाणी केस स्वच्छ करण्यासाठी वापरा.
– खडीसाखर तुपात वाटून काळ्या डागांवर लावा.
– लिंबाच्या रसात खडीसाखर वाटून ती काळवंडलेल्या त्वचेवर लावा.
– खडीसाखरेच्या गार पाण्यात स्वच्छ सुती कपडा बुडवून त्याने चेहरा टिपून घ्यावा.
– गुळाच्या पाण्याने चूळ भरा.
– गूळ नखांवर घासा.
– काळवंडलेल्या त्वचेवर गूळ चोळा.

पंचपत्री
गणपतीस दुर्वा, बेल, तुळस, आंब्याची पानं आणि केवडा अशी पत्री अर्पण केली जातात. सौंदर्योपचारासाठी या पत्रींचा जरूर वापर करावा. यातील दुर्वा प्रकृतीस उत्तेजना देतात. तसंच दुर्वांचा रस रोगप्रतिकारक शक्ती वृद्धिंगत करतो.
बेलामुळे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम राहतं तर तुळस रक्त धातू शुद्ध करते. केवडाही उत्तम सौंदर्यवर्धक पत्री आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्तानं या सर्व पत्री आपल्या घरी आलेल्या असतात. त्यामुळे निश्‍चितच आपण त्यांचा वापर करून घेऊ शकतो.
– दुर्वांचा रस त्वचेवर लावा.
– दुर्वांचा रस काळवंडलेल्या त्वचेवर चोळा
– दुर्वांचा रस खडीसाखरेत कालवून लावा.
– दुर्वा स्वच्छ धुऊन त्वचेवर चोळा.

 –बेल पाण्यात भिजवून ते पाणी त्वचेवर चोळा.
– बेलाच्या पाण्याने केस स्वच्छ धुवा.
– तुळशीच्या पानांचा रस दह्यात कालवून त्वचेवर लावा.
– आंब्याच्या पानांचं पाणी आंघोळीसाठी वापरा.
– आंब्याची पानं पाण्यात उकळवून ते पाणी त्वचेवर लावा.
– केवड्याचं पान पाण्यात उकळवा आणि ते पाणी त्वचेवर लावा.
– केवडा जल डोळ्यांखाली चोळा.
– केवडा जल केस स्वच्छ करण्यासाठी वापरा.

खरं तर, या मोसमात निसर्गाने बहाल केलेल्या या देणगीचा केवळ सौंदर्य नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही अतिशय चांगला फायदा होतो. तेव्हा कुठल्याही दुष्परिणामाचं गालबोट लागू न देणार्‍या या सौंदर्यवर्धक पंचमांचा या वर्षी नक्की वापर करून पाहा.
– स्वप्निल वाडेकर
(सौंदर्य, आरोग्य व आहार तज्ज्ञ)