2.5 लाख लीटर पाणी वाचविण्याकरीता अनुष्का शर्मा ...

2.5 लाख लीटर पाणी वाचविण्याकरीता अनुष्का शर्मा विकतेय तिचे मॅटर्निटी कपडे (Anushka Sharma To Sell Her Favourite Maternity Outfits For A Special Cause)

अभिनया व्यतिरिक्त अनुष्का शर्मा अजून एका गोष्टीसाठी बऱ्यापैकी ओळखली जाते, ती म्हणजे, पर्यावरण आणि जनावरांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांच्या हक्कासाठी अनुष्का मोहिम चालवते. सोशल मीडियावरही ती सक्रीय असते आणि लोकांमध्ये जागरुकता निर्माण करते. तिच्या पोस्टवरुन लक्षात येते की ती एक निसर्गप्रेमी आहे. 

सध्या अनुष्का, विराट आणि मुलगी वामिका सोबत इंग्लंडमध्ये आहे. परंतु, तिने पर्यावरणाचं संरक्षण आणि पाण्याची बचत करण्याच्या उद्देशाने एका आगळ्यावेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. अनुष्का शर्मानं तिच्या प्रेग्नन्सीच्या काळात वापरलेले स्टायलिश आणि फॅशनेबल कपडे ऑनलाइन विकण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मिळणारे पैसे ती स्नेहा फाऊंडेशनला देणार आहे. यामुळे २.५ लाख लीटर पाण्याची बचत होणार आहे.

हा विचार आपण प्रेग्नन्सीच्या वेळीच केला होता असं अनुष्का सांगते. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुष्कानं सांगितलं की, आपले कपडे सर्कुलेशन फॅशन सिस्टिममध्ये वापरून तुम्ही पर्यावरणासाठी एक चांगलं काम करू शकता.

पुढे अनुष्का म्हणाली, ‘माझ्या प्रेग्नन्सीच्या काळात मी विचार केला की आपल्या आयुष्यातील हा काळ सर्वात खास असतो. मग याचा उपयोग सर्कुलर इकॉनॉमीसाठी केला तर चांगलं होईल.  म्हणजे बघा, समजा भारतातील शहरांत राहणाऱ्या एक टक्का गर्भवती महिलांनी जरी नवीन कपड्यांऐवजी हे मॅटर्निटी कपडे दरवर्षी खरेदी केले तर, आपण इतक्या पाण्याची बचत करू शकतो, की तेवढे पाणी एक मनुष्य २०० वर्षे पिऊ शकेल.’

अनुष्काचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.