‘मी तुमची ब्रँड एम्बेसेडर नाही, माझे फोटो डिलीट...

‘मी तुमची ब्रँड एम्बेसेडर नाही, माझे फोटो डिलीट करा’, पूमा ब्रॅंडवर बरसली अनुष्का शर्मा (Anushka Sharma Angry On Puma Brand For Posting Her Photos Without Permission)

अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या सडेतोड बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अनेकदा ती सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन आपल्या दैनंदिन आयुष्याबद्दल माहिती देत असते. पण सध्या अनुष्का एका प्रसिद्ध ब्रॅंडवर खूप नाराज झाली आहे. यासंदर्भात तिने एक सोशल मीडिया पोस्टही शेअर केली आहे.

सुप्रसिद्ध ब्रॅंड पूमा इंडियाने अभिनेत्री अनुष्का शर्माचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या फोटोत अनुष्काने पूमाचे टॉप, को- ऑर्ड सेट आणि जॅकेट घातलं आहे. तसेच पूमाने सेलिब्रेटी आपला ब्रॅंड वापरतात असा उल्लेख केला आहे.

अनुष्का शर्माच्या जेव्हा हे लक्षात आले की, आपल्या फोटोंचा वापर हा ब्रॅंड प्रमोशनसाठी करत आहे. तेही आपल्या परवानगी शिवाय तेव्हा तिला या प्रकाराचा खूप राग आला. पूमाची कानउघडणी करण्यासाठी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली व त्यात लिहिले की,‘हॅलो पूमा इंडिया. मला वाटतं की तुम्हाला कदाचित ही गोष्ट चांगलीच माहित असेल की माझ्या परवानगी शिवाय तुम्ही माझे फोटो तुमच्या प्रमोशनसाठी वापरू नाही शकत. कारण मी तुमची ब्रँड एम्बेसेडर नाही. कृपया आधी ते फोटो तिथून काढून टाका’.

पण यानंतर पूमाने एक कॉन्फिडेन्शल करारपत्राचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अरे अनुष्का आम्ही लवकर पोहोचायला हवे होते! मग आपण गोष्टी पुढच्या स्तरावर नेल्या पाहिजेत का?’ हे करार पत्र अनुष्का आणि पूमा इंडिया मधील आहे. या सर्व प्रकारामुळे ही त्यांची प्रमोशनल अॅक्टिव्हिटी असल्याचा दावा युजर्स करत आहेत.