‘द कश्मीर फाइल्स’ बघून अनुपम खेरची ...

‘द कश्मीर फाइल्स’ बघून अनुपम खेरची आई झाली व्यथित, म्हणाली, “मी लहान होते तेव्हा शेख अब्दुल्लांनी वल्गना केली होती – मी हिंदुंना भांडी घासायला लावीन.” (Anupam Kher’s Mother Gets Emotional After Watching The Kashmir Files- ‘Sheikh Abdullah had said- I will get Hindus to clean utensils)

विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियापासून ते गल्लोगल्ली या चित्रपटाने धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटातून काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची कथा समोर आणण्यात आली आहे. हा चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर पडणारे दर्शक अतिशय भावूक झालेले दिसतात. त्यांच्या डोळ्यांत पाणी आणि मनात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाबद्दलचा रोष दिसत आहे..

नुकतेच अनुपम खेर यांच्या आईने हा चित्रपट पाहिला अन्‌ त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत घडलेल्या घटनेची आठवण होऊन त्या व्यथित झाल्या. ती आठवण सांगतानाचा आईचा व्हिडिओ अनुपम खेर यांनी ट्वीटरवर शेअर केला असून आता तो व्हायरल होत आहे.

अनुपम खेर यांनी जेव्हा आपल्या आईला ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आवडला का, असा प्रश्न केला तेव्हा त्या म्हणाल्या, ‘तिथं काय झालं ते सगळं मला माहीत आहे. तिथे जे काही घडलं होतं, तेच चित्रपटात दाखवलं आहे. ३० वर्षांपासून आपण हेच पाहत आहोत. माझ्या भावांना चिठ्ठ्या देऊन निघून जाण्यास सांगितलं गेलं होतं. माझ्या धाकट्या भावानं घर बांधलं होतं, तो बिचारा यातच निधन पावला. संध्याकाळी माझा भाऊ ऑफिसमधून आला तेव्हा दारावर चिठ्ठी लावली होती की, आज तुझी पाळी आहे. रात्री ते लोक निघून गेले. रात्री जो ट्रक यायचा, त्यात बसून ते निघून गेले. त्याला एक ग्लास पाणीही प्यायला मिळाले नाही.’

हा व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिलं की, चित्रपट पाहिल्यानंतर आई बराच वेळ गप्पच होती. मी तिला मिठी मारली आणि बाय म्हटले, तेव्हा हळूच ती बोलली – या चित्रपटात काम करून तू चांगलं केलंस. जगभरात राहणाऱ्या काश्मिरी लोकांसाठीचं हे तुझं कर्तव्य होतं.  

त्यानंतर त्या पुढे म्हणाल्या, त्यांनी काय केलं ते सर्व मला माहीत आहे. हा चित्रपट ज्यांनी बनवला त्यांनी आपल्यासारख्या हिंदूसाठी खूप चांगलं काम केलंय. या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांसोबत काय घडलं होतं ते निदान लोकांना कळेल तरी…! अजून बाहेरील लोकांना माहीतच नव्हतं की, आमच्या सोबत काय घडलं होतं? त्या लोकांनी आमचे पैसे, सर्व सामान लुटून नेलं.

प्रत्येकजण फकीर असल्यासारखे त्यांना त्यांच्याच घरांतून बाहेर काढलं होतं. बोलता बोलता त्या मध्येच स्तब्ध झाल्या अन्‌ म्हणाल्या, आम्ही अनाथ असल्यासारखे आम्हाला हाकलून दिलं.

अनुपम खेर यांच्या आई त्यांना म्हणाल्या – हा चित्रपट सगळ्यांनी पाहिला पाहिजे. त्याशिवाय काश्मिरी पंडितांसोबत काय घडलं ते कळणार नाही. या चित्रपटातील सर्व कथानकाबाबत त्यांना माहिती आहे. अब्दुल्लाच्या कुटुंबाचा उल्लेख करत त्या सांगतात, शेख अब्दुल्ला म्हणाला होता की, हे लोक मुसलमानांना भांडी धुवायला लावतात, मी हिंदुंना भांडी घासायला लावीन. माझे मामा त्यावेळी मिनिस्टर होते आणि त्यांच्या घरी भांडी धुण्यासाठी कामवाली बाई यायची… त्यावेळी मी लहान होते. त्याने म्हटले होते, तुम्ही मुसलमानांसोबत जसे वागताहात, मी तुमच्यासोबतही तसेच वागणार. अब्दुल्लाने जे म्हटले तसेच केले. अनाथ असल्याप्रमाणे सगळ्यांना हाकलून दिले. देव अशा लोकांचा जरूर सूड उगवेल.”

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी लोक चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी करत आहेत. लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर १० पैकी १० रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित झाला असून यात अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि इतर अनेक कलाकारांनी अभिनय केला. हरियाणासह इतर काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.