कार्तिक आर्यनसोबत फोटो शेअर करुन अनुपम खेरने सा...

कार्तिक आर्यनसोबत फोटो शेअर करुन अनुपम खेरने साधला आमिर खानवर निशाणा (Anupam Kher Takes A Dig At Aamir Khan, Shares Pics With Kartik Aaryan, Calls Himself And Kartik ‘Two Superstars’)

आमिरने आपल्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले. या प्रमोशनवेळी त्याने प्रेक्षकांना हा चित्रपट कसा तयार झाला, तसेच चित्रपटाच्या पटकथेपासून ते दिग्दर्शन आणि गाण्यापर्यंत अनेक गोष्टी सांगितल्या. मात्र एवढे करुनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटाचीही अवस्था अशीच होती. दोन्ही चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर होत होती. याचाच परिणाम चित्रपटांवर झालेला दिसतो. आमिर खानला सुद्धा सतत ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. आता या सगळ्यामध्ये अनुपम खेर यांनीही आमिरवर निशाणा साधत एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

2022 हे वर्ष बॉलिवूड आणि अनेक बड्या स्टार्ससाठी चांगले ठरले नाही. यावर्षी बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत.पण या सर्वात दोन चित्रपट सुपरहिट ठरले ते म्हणजे अनुपम खेर यांचा द काश्मीर फाइल्स आणि कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया 2’. या संदर्भातच अनुपम यांनी आमिरवर निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वीच अनुपम खेर यांनी कार्तिक आर्यनची भेट घेतली. त्यांच्या त्या भेटीचे फोटो अनुपम यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या फोटोंसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “सुपरस्टार्स… एखाद्या अभिनेत्याला सुपरस्टार म्हणणे त्याच्या चित्रपटांच्या कमाईवर अवलंबून असते. म्हणून मी तुमच्यासोबत दोन सुपरस्टारचे फोटो शेअर करत आहे. या वर्षी किमान माझ्यासाठी आम्ही सुपरस्टार आहोत. माझ्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने यावर्षी जगभरात 350 कोटींचा व्यवसाय केला आहे आणि कार्तिकच्या चित्रपटाने 250 कोटींचा व्यवसाय केला आहे.

अनुपम खेर पुढे लिहिले की, “काळ बदलत आहे. लोकांची आवड आणि पद्धतसुद्धा. कोणाला वाटले तरी होते का, की एक दिवस असा येईल जेव्हा माझी मुख्य भूमिका असलेला चित्रपट काश्मीर फाइल्स ३५० कोटींची कमाई करेल. या बदलाचे स्वागत आहे. तुम्हीही या बदलाचे स्वागत कराल अशी आशा आहे. कार्तिकला भेटून खूप आनंद झाला. एक अभिनेता आणि सुपरस्टार म्हणून तो येथे दीर्घकाळ टिकणार आहे.मी जवळपास ४० वर्षे धावत आहे आणि मला अजून बरीच वर्षे धावायचे आहे आणि कार्तिकसारख्या तरुणांशी स्पर्धा करायची आहे! जय हो!”

आमिर खान आणि अक्षय कुमार सारख्या सुपरस्टारचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले तेव्हाच नेमकी अनुपम यांनी ही पोस्ट केली. त्यामुळे अनुपम खेर यांच्या या पोस्टचा संबंध अपयशी ठरलेल्या चित्रपटांशी जोडला जात आहे.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम