‘मी होणार सुपरस्टार’ या ज्युनियर्सच्या कार्यक्र...

‘मी होणार सुपरस्टार’ या ज्युनियर्सच्या कार्यक्रमात अंकुश चौधरीचा नवा अंदाज (Ankush Chaudhary To Appear In A Different Look For ‘Mee Honar Superstar’ Program Of Juniors)

सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीला आपण सिनेमा, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रुपात भेटलोय. सध्या अंकुशचा अग्निशमन अधिकाऱ्याच्या रुपातला अंदाज सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. अंकुशचा हा नवा अंदाज कोणत्या सिनेमासाठी नसून स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमासाठी आहे. अंगात नृत्याची आग असणाऱ्या ४ ते १४ वयोगटातील स्पर्धकांना आपलं टॅलेण्ट सिद्ध करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी हक्काचा मंच उपलब्ध करुन देणार आहे.

‘मी होणार सुपरस्टार’ जल्लोष ज्युनियर्सचा या धमाकेदार डान्स रिॲलिटी शोमध्ये अंकुश पुन्हा एकदा सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे. या ग्रॅण्ड रिॲलिटी शोविषयी सांगताना अंकुश म्हणाला, ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा प्रोमो खूप वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलाय. एका वेगळ्या अंदाजात मला प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाली. प्रोमोमागचा विचार मला खूपच आवडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली बच्चेकंपनी आपल्या टॅलेण्टने मंचावर आग लावणार आहेत. त्यामुळेच प्रोमोमध्ये मी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याच्या रुपात आहे. या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धकांसोबतच जजेसही परफॉर्म करणार आहेत. त्यामुळे शूटिंगला मी एक नवी स्टेप शिकण्याचं ठरवलं आहे.

डान्स हा माझ्या अतिशय आवडीचा विषय आहे. या शोमध्ये जरी मी जज असलो तरी मी टीव्हीसमोर बसलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिनिधीची जबाबदारी पार पाडणार आहे. फरक एवढाच असेल की प्रेक्षक या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेतील आणि मी प्रत्यक्ष घेईन. मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. त्यामुळे मी या शोसाठी प्रचंड उत्सुक आहे.’