अंकिता लोखंडेच्या लग्नात विघ्न?… डॉक्टरां...
अंकिता लोखंडेच्या लग्नात विघ्न?… डॉक्टरांनी दिला बेडरेस्टचा सल्ला! (Ankita Lokhande Hospitalised Ahead Of Wedding, Advised Bed Rest)

सध्या लग्नसराई सुरू आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळींच्या लग्नाच्या वार्ता ऐकावयास मिळत आहेत. कतरिना आणि विकी कौशल यांच्या लग्नाइतकंच चर्चिलं जात असलेलं अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं लग्न येत्या १४ डिसेंबरला मुंबईत ग्रँड हयात येथे होणार आहे. या लग्नाबाबतही चाहत्यांना बरीच उत्सुकता आहे. असे असताना या लग्नात विघ्न येतेय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

लग्नाला अगदी मोजके दिवस राहिले असताना अंकिताला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले होते. अन् काही वेळातच तिला घरीही पाठविण्यात आले होते. पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, अंकिताचा पाय मुरगळला असून डॉक्टरांनी तिला बेडरेस्ट करायला सांगितले आहे. त्यामुळे लग्नापर्यंत अंकिताची तब्येत ठीक होईल, की लग्न पुढे ढकलावे लागेल, अशी काळजी लोकांना वाटत आहे.

आता अंकिता ठीक आहे आणि घरीच आराम करत आहे. एवढेच नव्हे तर अंकिता स्वतःच्या लग्नासाठी गुडघ्याला बाशिंग लावून आहे आणि दरदिवशी इन्स्टाग्रामवर आपले प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करते आहे. फोटोंत अंकिता आणि विकी जैन पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाखात सुंदर दिसत आहेत.

पवित्र रिश्ताच्या या नायिकेचे खऱ्या जीवनातील लग्न पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुरलेले आहेत. पवित्र रिश्ता या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही पर्वांमध्ये अंकिता मुख्य नायिकेच्या भूमिकेत आहे. पवित्र रिश्ताच्या पहिल्या पर्वा दरम्यान सुशांत सिंह राजपूतसोबत अंकिताचं चांगलंच सुत जुळलं होतं. त्यांचं लग्न होईल असं वाटत असतानाच त्यांच्यातील ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना निराश केलं होतं. अन् आता लग्नाच्या काही दिवस आधी अंकिताच्या पायामुळे लग्नात विघ्न येईल की काय अशी चाहत्यांना काळजी वाटत आहे.



दरम्यान अंकिताने तिच्या इन्स्टा स्टोरीवर व्हील चेअरवर बसलेला तिचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात तिने आपल्या दुखऱ्या पायाचाही फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अंकिता बरी असल्याचे दिसते आहे. त्यामुळे चाहत्यांना निराश व्हावे लागणार नाही. शिवाय लग्न पुढे ढकलण्याबाबत तिच्या घरच्यांकडूनही काही माहिती मिळालेली नाही. तेव्हा लग्न नियोजित तारखेला होईल असे म्हणायला हरकत नाही.