‘मी वसंतराव’चा अनुभव अनोखा : अनिता दाते (Anita ...

‘मी वसंतराव’चा अनुभव अनोखा : अनिता दाते (Anita Datey Narrates Her Workout To Portray Courageous Mother Of Vasant Rao)

‘मी वसंतराव’मध्ये तुझी भूमिका काय आहे?
या चित्रपटात मी वसंतरावांच्या आईची भूमिका साकारत आहे. यापूर्वी मी अशा प्रकारची भूमिका कधीच साकारली नाही. यात मी एक खमकी आई साकारली आहे. जी कायमच मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्याच्या पडत्या काळात, यशात त्याला पाठिंबा देत आहे. अशा दमदार आईची भूमिका साकारायला मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

पं. वसंतरावांच्या आईची भूमिका साकारताना काही विशेष मेहनत घ्यावी लागली?
ज्यावेळी निपुणने मला या भूमिकेविषयी विचारले, त्यावेळी इतकी मोठी भूमिका साकारण्याची संधी मिळतेय. यात सर्व काही आले. त्यामुळे या भूमिकेसाठी मी त्वरित होकार दिला. भूमिकेचे दडपण आले होते, असे म्हणता येणार नाही, परंतु एक जबाबदारी होती. इतक्या महान व्यक्तीच्या आईची भूमिका साकारायची होती. परंतु हे सगळे सहज शक्य झाले ते केवळ चित्रपटाच्या टीममुळे आणि देशपांडे परिवारामुळे. या सर्व प्रवासात मला त्यांची खूप मोलाची साथ लाभली.
संतरावांच्या आईची देहबोली, बोलण्याची शैली या सगळ्याचा मला थोडा सराव करावा लागला.

राहुल देशपांडे, निपुण धर्माधिकारी, अमेय वाघ आणि चित्रपटातील इतर कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव?
चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करण्याचा अनुभव एकदम अनोखा होता. यापूर्वी मी निपुण आणि अमेयसोबत काम केल्याने त्यांच्या कामाची पद्धत मला माहित होती आणि आमच्यात एक कम्फर्ट झोन होता. तर राहुल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अप्रतिम होता. राहुल यांची गायकी जितकी उत्कृष्ट आहे तितकाच उत्कृष्ट त्यांचा अभिनय आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात मी सगळ्या कलाकारांसोबत झळकणार आहे आणि या सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव जबरदस्त होता. प्रत्येक कलाकाराने आपल्या व्यक्तिरेखेत जीव ओतून काम केले आहे.

‘मी वसंतराव’तील तुझ्या व्यक्तिरेखेने तुला काय शिकवले?
खरं सांगायचे तर फक्त व्यक्तिरेखेने नाही तर या संपूर्ण चित्रपटाने खूप काही शिकवले. माणसात गुण असतील आणि जिद्द असेल तर कितीही संकटे आली तरीही आपले ध्येय साध्य करता येते, हे समजले. या चित्रपटातील माझा एक आवडता सीन आहे. वसंतरावांची आई वसंतरावांना सांगते, आपले पैसे कसे ठरवायचे? हा सीन खूप काही शिकवून जाणारा आहे. या क्षेत्रात प्रत्येक कलाकाराला या गोष्टीचा सामना करावा लागतो. हा पैशांचा व्यवहार करताना आपल्याला तारेवरची कसरत करावी लागते. आपले मूल्य जाणून नेहमी पैशांची मागणी करावी, ही एक मोठी गोष्ट मला या सीनने शिकवली.