स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावं – अनिता दात...

स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हावं – अनिता दाते (Anita Date Expects Women To Be Self-Reliant)

गेली पाच वर्षं लोकांच्या पसंतीस उतरलेली मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आता संपण्याच्या बेतात आहे. या मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेतील राधिका अर्थात अनिता दाते यांच्याशी केलेली बातचीत –

सुरुवात झाल्यापासून आजपावेतो एक मालिका अद्यापही यशस्वी ठरली आहे. गेल्या पाच वर्षांपासून चालू असलेली ही मालिका आहे, ‘माझ्या नवऱ्याची बायको.’ एक बायको, तिचा भ्रमर वृत्तीचा नवरा आणि त्याची प्रेयसी. अर्थात् एका नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आणि त्यातून त्याच्या संसारात, प्रेमजीवनात उठणारी वादळे – अशी या मालिकेची एका ओळीत सांगण्याजोगी गोष्ट. ती लोकप्रिय ठरली आहे. ५ वर्षे लोकांच्या पसंतीस उतरली आहे. करोनाचा बहर होता, तेव्हा ४-५ महिने तिच्या शूटिंगमध्ये खंड पडला होता. तिच्या प्रक्षेपणाची वेळ बदलली, तरी लोकप्रियता टिकून राहिली.
या मालिकेचा नायक गुरूनाथ याच्या वाट्याला तिरस्कार, तर खंबीरपणे त्याच्याशी झुंज देणारी नायिका राधिका हिच्या वाट्याला प्रेक्षकांकडून पुरस्कार मिळत आहे. राधिकाची भूमिका करणाऱ्या अनिता दाते यांच्याशी केलेली ही बातचीत. या बातचितीचा ओघ स्वाभाविकच अनिता दाते यांना येणारे प्रेक्षकांचे अनुभव याकडे होता.

महिलावर्गाच्या भावना
अनिताजी सांगू लागल्या, ”आमच्या मालिकेचं शूटिंग मुंबईसह नाशिक आणि नागपूरला झालेलं आहे. तिथे प्रत्यक्ष भेटून किंवा फेसबुकच्या माध्यमातून अनेक महिलांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. त्यातील बव्हंशी महिला मला सांगायच्या की, त्यांचा नवरा बाहेरख्याली आहे. त्याला धडा शिकवावा म्हणून आमच्या मनात वाईट विचार येत. पण त्यातून आम्ही बाहेर पडलो. अर्थात् त्यांचा संवाद मी निभावत असलेल्या राधिका या पात्राशी असायचा. राधिका एव्हढी भोळी कशी, याबद्दल त्या आश्चर्य व्यक्त करायच्या. त्यातून हेही लक्षात आलं की, आपला नवरा परस्त्रीशी संबंध ठेवू शकतो, यावर अशा बायकांचा विश्वास बसत नाही. आपल्या समाजात, काही ठिकाणी बायकांना शिक्षणापेक्षा घरगृहस्थीचं शिक्षण दिलं जातं. त्यामुळे अशा बायका आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात.”
”सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाही काही स्त्रिया आमच्या संपर्कात आल्या. राधिकाला तिच्या जीवनात जे भोगावं लागलं, ते त्यांच्याही नशिबी आलं. त्यांच्या वाट्याला संसारसुख न येता दुःखच आलं. उलटपक्षी असे बाहेरख्याली पुरुष थोडेफार अलर्ट झाले. आपली बायको आपल्यावर नजर ठेवते की काय, असं त्यांना उगीच वाटायला लागलं.”

सुखवस्तू घरातील
गुरूनाथ राधिकाशी खूपच वाईट वागतो. त्याचाच कित्ता शनाया गिरविते. त्यामुळे हे दोघे प्रेक्षकांचे नावडते आहेत. अन् राधिकाला मात्र कायमच सहानुभूती मिळत आहे. तरीपण राधिकाने गुरूनाथ-शनायाला धडा शिकवला पाहिजे, असा अनिताजींना भेटलेल्या बऱ्याच स्त्रियांनी आपला विचार बोलून दाखविला आहे.
अनिताजी मूळच्या नाशिकच्या आहेत. त्या सुखवस्तू घरातील आहेत. त्यांचं स्वतःचं नाशिकला मोठं घर आहे. त्यांचे यजमान याच क्षेत्रात लेखक म्हणून वावरत आहेत. माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका लवकरच संपण्याच्या बेतात आहे. तेव्हा कोणतं काम हातात आहे? पुढे काय करणार? या प्रश्नांवर उत्तर देताना अनिताजी बोलल्या, ”या मालिकेनंतर तूर्त तरी मी पुढचे काम घेणार नाही. घरी जाऊन रिकामंपण एन्जॉय करणार. स्वयंपाक करणार, कुटुंबीयांच्यासोबत वेळ घालवणार, नाटक-सिनेमा पाहणार. स्वतःसाठी वेळ ठेवणार.” असा मानस त्यांनी व्यक्त केला.

प्रवेश कसा झाला?
या क्षेत्रात प्रवेश कसा झाला याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ”अभिनाची आवड लहानपणापासून होती. मात्र प्रोफेशन म्हणून हे क्षेत्र स्वीकारावं असं कधी वाटलं नव्हतं. ललित कला केंद्रामधून मी नाट्यक्षेत्रात प्रवेश केला. लग्न झाल्यावर, मुंबईत आले. त्यानंतर काही मित्रांच्या सल्ल्यावरून मी हे क्षेत्र प्रोफेशन म्हणून स्वीकारलं.”
ज्या मालिकेने त्यांना यशोशिखरावर पोहचवले त्यातून स्त्रियांनी काय बोध घ्यावा, असे त्यांना वाटते? ”जे राधिकाच्या जीवनात घडलं, ते आपल्या समाजात कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत घडू शकतं. म्हणून त्यांना आपल्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. त्यांनी आत्मनिर्भर झालं पाहिजे. अन् असं काही घडल्यावरच कशाला, प्रत्येकीनं स्वतःला बिझी ठेवून स्वतः पैसे मिळवले पाहिजे. आपल्या हॉबीज् जोपासल्या पाहिजेत. आपली ताकत कशात आहे, हे त्यांना आधीच कळलं पाहिजे. सुरुवातीपासून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व सक्षम व्हायला पाहिजे. दुर्दैवानं असा अनर्थ त्यांच्या जीवनात घडलाच तर तिच्या माहेरच्या माणसांनी तसंच समाजानं तिच्या पाठीशी उभं राहणं अपेक्षित असतं.”
–     रमेश मेश्राम