‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर य...

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देऊया (Anant Chaturdashi: Ganesh Festival Visarjan)

आज अनंत चतुर्दशी, म्हणजेच शुक्ल पक्षातील चतुर्दशीची तिथी, या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं जातं. गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजतगाजत आनंद साजरा करत आपण श्री गणेशाची मूर्ती घरी आणतो. तिची स्थापना आणि षोडोपचारे पूजाअर्चा करतो. चतुर्थीपासून चतुर्दशीपर्यंत हा गणेशोत्सव साजरा होतो अन्‌ मग बाप्पाला निरोप देण्याचा दिवस उजाडतो. इतके दिवस बाप्पा घरी आल्यानंतर घर कसं माणसांनी आणि आनंदानं भरलेलं असतं. तेच निरोपाच्या दिवशी मात्र बाप्पाने आणखी काही दिवस थांबावं असं वाटत राहतं, किंबहूना कायमच आपल्या घरात राहावं असं आपल्याला वाटतं. परंतु असं म्हणतात की, विसर्जनाशिवाय बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही. असं म्हणण्यामागे काही कारणं आहेत. आज आपण ती जाणून घेऊयात.

Anant Chaturdashi

बाप्पाचं विसर्जन का केलं जातं?

बाप्पाचं विसर्जन का करावं याबाबत एक कथा अशी सांगितली जाते की, गणपती हे जल तत्वाचे अधिपती आहेत. म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजाअर्चा झाल्यानंतर त्यांस पुन्हा जलामध्ये विसर्जित केले जाते. म्हणजेच गणपती हे जेथील अधिपती आहेत, तेथेच त्यांना पोहोचवले जाते.

दुसरी कथा महाभारताशी निगडीत

Anant Chaturdashi

पुराणामध्ये गणेश विसर्जन का करावे, यासंबंधी एक कथा सांगितली आहे ती अशी की, श्री वेद व्यास ऋषींनी गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणपतीस महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली होती आणि गणपती ती कथा लिहून घेत होते. कथा सांगताना व्यासांचे डोळे मिटलेले होते. सलग दहा दिवस व्यास गोष्ट सांगत होते आणि गणपती ती लिहून घेत होते. १० दिवसांनंतर व्यासांनी आपले डोळे उघडले, त्यावेळेस श्री गणेशाच्या शरीराचे तापमान खूपच वाढले होते. गणेशास थंड करण्यासाठी व्यास ऋषींनी त्यास पाण्यात डुबकी मारण्यास सांगितले. त्याने गणेशाचे शरीर शीतल झाले. शांत झाले. तेव्हापासून गणेशास शीतल करण्यासाठी त्याचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते.

Anant Chaturdashi

तेव्हा बाप्पा आपल्याला कितीही लाडका असला तरी त्याला आज निरोप द्यावाच लागणार आहे. पण त्यापूर्वी त्याची विधीपूर्वक पूजा करूया. त्याच्या आवडीचे मोदक व इतर पदार्थ बनवून त्यास त्याचा नैवेद्य दाखवूया. आपल्याकडून त्याची सेवा, पूजाअर्चा करण्यात काही चूक झाली असल्यास त्याची क्षमा मागूया. सुख-समृद्धी, आरोग्य अन्‌ बुद्धी देणाऱ्या आपल्या बाप्पाला नमन करून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात त्याचा निरोप घेऊया.

विसर्जनाच्या वेळीही आपल्याकडून काही चूक होणार नाही, याची दक्षता घेऊया. कारण सध्या करोनाचं संकट दूर झालं आहे असं वाटत असलं तरी सरकारी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. आता कोणत्याच संकटाचं सावट परतून येता कामा नये याची काळजी घ्यावयास हवी.