मराठी फिल्मफेअर अवॉर्डस मध्...

मराठी फिल्मफेअर अवॉर्डस मध्ये ‘आनंदी गोपाळ’ला १६ नामांकने (‘Anandi Gopal’ Attracts 16 Nominations In Filmfare Marathi Awards)

भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर म्हणून इतिहास घडविणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ या मराठी चित्रपटास १६ नामांकने मिळाली आहेत. प्लॅनेट मराठी प्रस्तुत फिल्मफेअर अवॉर्डस‌‌ २०२० साठी ‘आनंदी गोपाळ’ने ही विक्रमी नामांकने मिळविली आहेत.
समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटात आनंदीबाईंची भूमिका भाग्यश्री मिलिंदने तर गोपाळरावांची भूमिका ललित प्रभाकरने निभावली आहे. उत्कृष्ट निर्मिती-दिग्दर्शन व अभिनेता-अभिनेत्री यांसह विविध तांत्रिक श्रेणींसाठी प्रेक्षकांनी ही नामांकने दिली आहेत.

१८६५ साली जन्मलेल्या आनंदीबाईंचा विवाह, त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे असलेल्या गोपाळरावांशी झाला होता. वयाच्या १४ व्या वर्षी आनंदीबाईंना मुलगा झाला, जो दुर्दैवाने फक्त १० दिवस जगला. कारण त्याला पुरेशी वैद्यकीय मदत मिळू शकली नव्हती. ही खंत बाळगून आनंदीबाईंनी स्वतः डॉक्टर होण्याचे ठरविले. त्यांना या शिक्षणाचे व त्यासाठी इंग्रजी शिकण्याचे प्रोत्साहन गोपाळरावांनी दिले होते. आनंदीबाईंनी अमेरिकेला जाऊन डॉक्टरकीचे शिक्षण घेतले. तिकडे त्या आजारी पडल्या. मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सनातनी समाजाच्या टिकेचे प्रहार सोसून आनंदीबाई डॉक्टर झाल्या व भारतात परतल्या. इथे त्यांना क्षयाने गाठले व त्यातच त्यांचा दुःखद अंत झाला.

आनंदीबाईंच्या खडतर, संघर्षमय जीवनाची कहाणी चितारणारा हा चित्रपट लक्षवेधी ठरला होता. या चित्रपटाच्या खालोखाल ‘गर्लफ्रेंड’ या रोमॅन्टिक मराठी चित्रपटाला १४ नामांकने मिळाली आहेत. या चित्रपटाचा नायक अमेय वाघ असून त्याची गर्लफ्रेंड सई ताम्हणकर झाली आहे. सदर पारितोषिक वितरण सोहळा १४ मार्च रोजी संपन्न होणार असून त्याचे टेलिकास्ट पार्टनर कलर्स मराठी आहेत. फिल्मफेअरच्या फेसबुकवर त्याच दिवशी सायं. ७ वाजल्यापासून हा कार्यक्रम दिसेल. या निमित्ताने कलर्स मराठीचे कार्यक्रम प्रमुख दीपक राजाध्यक्ष यांनी आपण या मराठी फिल्मफेअर अवॉर्डस‌चे विशेष भागीदार म्हणून सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
बॉलिवूडमध्ये फिल्मफेअर अवॉर्डस‌चे खूप प्रतिष्ठा मिळाली आहे. गेल्या काही वर्षात मराठी फिल्मफेअर अवॉर्डस‌ना देखील मराठी चित्रपटसृष्टीत वलय लाभले आहे. त्यामुळे या पारितोषिकांच्या सन्मानाने येथील कलाकार आनंदीत असतात.