साधी विक्रेती झाली करोडपती (An Ordinary Salesgi...

साधी विक्रेती झाली करोडपती (An Ordinary Salesgirl Rises to Crorepati)

साधी विक्रेती ते करोडपती हा उषाताईंचा प्रवास कष्टाचा होता; पण आनंदाचाही होता. केवळ स्वतःची प्रगती करून त्या थांबल्या नाहीत. त्यांनी प्रकल्पाशी जोडल्या गेलेल्या ‘अस्मिता’ भगिनींची मोट बांधली.

उषाताई भानुशाली या साध्या गृहिणी. मोठी झेप घेण्याची स्वप्नं होती; पण योग्य ते मार्गदर्शन नसल्याने आहे त्या पारंपरिक व्यवसायावर समाधानी होत्या. महिलोपयोगी उत्पादनं विक्रीचा त्यांचा हा उद्योग होता. काही कंपन्यांची उत्पादनं विकून त्या उदरनिर्वाह करत होत्या. पण फारसं यश मिळत नव्हतं. “एका मैत्रिणीने मला नेटसर्फच्या उत्पादनांच्या थेट विक्रीविषयी सुचवलं आणि मी त्यांच्या ‘अस्मिता’ या प्रकल्पाशी जोडले गेले. सुरुवातीला एक जोडधंदा म्हणून मी याकडे पाहत होते. पण मी त्यात पुढे गंभीरतेने काम करू लागले. खूप कष्ट केले. एकेक पायरी सर करत यशाचा कळस गाठला. अन् आता या उत्पादनांची थेट विक्रेती बनून मी करोडपती झाले आहे. या प्रकल्पाने मला प्रतिष्ठा आणि पैसा मिळवून दिला. माझ्या कुटुंबीयांना माझा अभिमान वाटतो आहे,” उषाताई अभिमानाने सांगत होत्या.

प्रमुख मार्गदर्शक
साधी विक्रेती ते करोडपती हा उषाताईंचा प्रवास कष्टाचा होता; पण आनंदाचाही होता. केवळ स्वतःची प्रगती करून त्या थांबल्या नाहीत. त्यांनी प्रकल्पाशी जोडल्या गेलेल्या ‘अस्मिता’ भगिनींची मोट बांधली. अन् त्यांचाही आर्थिक उद्धार केला. मुंबई आणि आसपासच्या 300-400 अस्मितांच्या त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम करतात आणि प्रकल्पाचे तारू उत्तमरीत्या चालवतात. त्यांच्या प्रेरणादायी वाटचालीने कित्येक महिलांना काम मिळालं, उत्पन्न मिळालं नि स्वतःची स्वतंत्र ओळख मिळाली आहे. “अनेक महिलांना ‘अस्मिता’च्या माध्यमातून आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मी मदत करते. त्यांना सक्षम आणि आत्मविश्‍वासपूर्ण जीवन जगण्यास मदत करणं, हे माझं उद्दिष्ट आहे,” असंही त्या सांगतात.

पर्सनल केअर, होम केअर, हेल्थ केअर आणि कलर कॉस्मेटिक रेंज अशी महिलांना उपयुक्त असलेल्या उत्पादनांची थेट विक्री या महिला उद्योजक करतात. हा घरबसल्या करण्याचा उद्योग आहे. मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद या मोठ्या शहरांसोबतच ठाणे, सोलापूर, नाशिक, सातारा इत्यादी लहान शहरांतही या उद्योजिकांनी मोठं यश मिळवलं आहे. इतकं की, नेटसर्फच्या पटलावर आजघडीला 4 लाख अस्मिता आहेत. विक्रेतीचे हे काम करण्यासाठी काही खास पात्रता वगैरे लागत नाही. वयाची 18 वर्षं पूर्ण केलेली, स्वप्नाळू, कष्टाळू आणि आपल्या पायावर स्वतंत्रपणे उभी राहण्याची उमेद असलेली तरुण-प्रौढ महिला इथे भरती होऊ शकते. तिच्याकडे चांगली संभाषण कला आणि उमेद असली पाहिजे. उत्पादनांच्या विक्रीसंबंधी इथे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि योग्य ते मार्गदर्शनही केलं जातं.

गृहिणी झाली विक्रेती
सिक्कीमच्या बुद्धाराणी लिंबू या महिलेचं उदाहरण उषाताईंनी दिलं. ती साधी गृहिणी होती. आधी या उत्पादनांची ग्राहक होती. पुढे स्वतःच थेट विक्रेती बनली अन् आपल्या ओळखीपाळखीतील महिलांमध्ये या उत्पादनांची विक्री करू लागली. “सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणतीही वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक पात्रता नसताना किंवा विक्रेती पदाची पार्श्‍वभूमी नसताना मी यश मिळवलं आहे. नेटसर्फचा पाठिंबा आणि प्रशिक्षणाने हे मिळालं असून, आता मी महिन्याला 51 हजार रुपये कमावते. आजवर मी 17 लाखांचा व्यवसाय केलेला आहे. आमच्या सिक्कीममध्ये वाहतुकीची साधनं व्यवस्थित नाहीत. तरी मी गावोगाव फिरते आणि ग्रामीण महिलांना माझं उदाहरण देऊन त्यांचा आत्मविश्‍वास वाढवते. त्यांना या कामासाठी प्रोत्साहित करते,” असं बुद्धाराणी सांगते.

आपल्या महाराष्ट्रात या ‘अस्मिता’ प्रकल्पाने एक चांगला पायंडा पाडला असल्याचं उषाताई भानुशाली यांनी सांगितलं. कॉस्मेटिक रेंजच्या उत्पादनांना ‘रंग दे’ असं नाव दिलं आहे. यांचा प्रसार त्या गावागावांतील आदिवासी महिलांमध्ये करतात. अन् विकल्या गेलेल्या प्रत्येक वस्तूसोबत सॅनिटरी नॅपकिनचं एक पाकीट भेट म्हणून देतात. मागासलेल्या स्त्रियांमध्ये आरोग्याची जाणीव करून देण्याचा हा पायंडा असून, आजवर 2 हजार आदिवासी महिलांना या नॅपकिनचं वाटप करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. विक्री व्यवसायावर केवळ स्वतःचं पोट न भरता, इतर गरजू स्त्रियांच्या जीवनात परिवर्तन करण्याचं, त्यांचं नेतृत्व करण्याचं उषाताईंचं कार्य प्रेरणादायी आहे.

– दीपक खेडकर