झाशीच्या राणीच्या पुण्यतिथी निमित्त रंगला मुंबई...

झाशीच्या राणीच्या पुण्यतिथी निमित्त रंगला मुंबईत नाट्यप्रयोग (An Amazing Play ‘Parakramachi Jyot’ was Staged On The Death Anniversary Of Jhaansi Ki Rani)

काल शूर स्वातंत्र्यसेनानी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या १६४ व्या पुण्यतिथी निमित्त मुंबईत एक विलक्षण प्रयोग रंगला. ‘पराक्रमाची ज्योत’ हे लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील नाटक डॉ. नेहा मिलिंद वैद्य यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत सादर केलं. लक्ष्मी क्रिएशन निर्मित या नाटकाचे लेखक – दिग्दर्शक प्रमोद पवार असून सुप्रसिद्ध लेखक – कवी रवींद्र आवटी यांचं मार्गदर्शन त्याला लाभलं आहे.

“राणी लक्ष्मीबाई यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन एक आदर्श प्रस्थापित केला. ही ऐतिहासिक ठेव आजच्या पिढीसमोर व्यक्त व्हावी हा या नाटकामागचा उद्देश आहे.” असं ‘पराक्रमाची ज्योत’ सादर करणाऱ्या डॉ. नेहा वैद्य यांनी सांगितलं.

त्या पुढे म्हणाल्या, “कालचा दिवस माझ्या जीवनातील महत्त्वाचा दिवस होता. सर्व नाट्य रसिकांनी माझ्या नाटकाला प्रतिसाद दिला. त्यामुळे माझा उत्साह द्विगुणीत झाला आहे. सिने दिग्दर्शक राजदत्त यांनी मला शाबासकी दिली. प्रयोग बघितल्यावर ते म्हणाले, ‘राणी लक्ष्मीबाईचा इतिहास आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण तू ज्या प्रकारे राणी रंगमंचावर उभी केलीस, त्याला तोड नाही.’ इतक्या मोठ्या माणसाने माझ्या नाट्यकृतीला नावाजलं यापेक्षा मोठी गोष्ट ती कोणती.” डॉ. नेहा वैद्य यांनी या प्रसंगी ‘अनुवेद’चे विशेष आभार मानले.

लेखक व दिग्दर्शक प्रमोद पवार याप्रसंगी म्हणाले की, “झाशीची राणी रंगमंचावर उभी करणं हे एक आव्हान होतं. लक्ष्मीबाईंना अवघं ३० वर्षांचं आयुष्य लाभलं. इतक्या कमी वयात त्यांनी आभाळाएवढा मोठा इतिहास रचला. ब्रिटिशांना नामोहरम केलं. महिलांचं सक्षमीकरण केलं. समाजासमोर एक भव्य आदर्श निर्माण केला. हे सारं रंगमंचावर सादर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. राणी लक्ष्मीबाई रंगमंचावर साकारण्यात डॉ. नेहा मिलिंद वैद्य यांचा सिंहाचा वाटा आहे, हे निर्विवाद!”